महाराष्ट्र संस्कृतीची विविध वैशिष्ट्ये ही श्री ज्ञानेश्वरांच्या मानस-सरोवरात बहरलेली सुवर्ण कमले होत.
महाराष्ट्राच्या आंतर-जीवनाची जान्हवी श्री ज्ञानेश्वरांनी रेखाटलेल्या विशाल पात्रांतून वाहत आली आहे.
महाराष्ट्राचे स्वातंत्र्यप्रेम, महाराष्ट्राच्या भक्तियोगाचे ज्ञान वैशिष्ट्य, महाराष्ट्राचा नामनिष्ठ भागवत धर्म, महाराष्ट्राची कणखर तितिक्षा, महाराष्ट्राचे स्वावलंबन, महाराष्ट्रीय आचारांतले प्रखर बुद्धीप्राधान्य, हे सर्व सांस्कृतिक विशेष, श्रीज्ञानेश्वरांच्या जीवनाचे, जीवनाकार्याचे व त्यांच्या प्रतिभाविलासाचेही ठळक विशेष, व्यावर्तक गुणधर्म आहेत.
श्रीज्ञानेश्वरी ही महाराष्ट्रीय संस्कृतीची ऐतिहासिक गंगोत्री व श्रीज्ञानेश्वर हेच महाराष्ट्राचे परमपूज्य पितृतीर्थ होत.
‘ज्ञानान्मोक्ष:’ ही घोषणा करणार्या आद्य श्री शंकराचार्यांचे मार्गदर्शन स्वीकारून श्री ज्ञानेश्वरांनी, आध्यात्मिक अनुभवांत विशेषत: आवश्यक व उपयुक्त असणार्या बौद्धिक, दार्शनिक दृष्टीकोनाची प्रतिष्ठापना केली.
श्री ज्ञानेश्वरी हा वैदिक अध्यात्मशास्त्राचे विवेचन करणारा एक दर्शनग्रंथ आहे. भावतरल भक्तीच्या सामसंगीताला ऋग्वेदीय ‘प्रज्ञानाचे’ भास्वर अधिष्ठान, वादक बुद्धीवादाची ज्ञाननिर्विशिष्ट ‘बैसका’ श्री ज्ञानेश्वरीने निर्माण केली.
श्री ज्ञानेश्वरी हे आत्मविद्येचे एक व्याकरण शास्त्र आहे. ‘शुद्ध कसे विवेकावे व शुद्ध कसे व्यवहारावे’ हे ज्ञानेश्वरी शिकल्याने समजते. श्री ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मविद्येच्या डोळस अध्ययनाची एक मार्गदर्शिका आहे.
श्री ज्ञानेश्वरीत सु-सुक्ष्म आंतर अनुभूतींची ‘वृत्तविचिकित्सा’ आहे. मानवतेच्या अढळ, अंतिम आकांक्षांचे तौलनिक, तारतम्यप्रधान व्यवस्थापन आहे.
महानुभावी पंथांतले काहीसे तर्कशैथिल्य, कित्येक आंधळे आचारधर्म यांचे महाराष्ट्राच्या जीवनावर आभाळ येऊ लागले होते. शिवाय इतस्तत: पसरलेली यावनी संस्कृती या अनिष्ट छायामेघांना साहाय्यकच ठरत होती. अशावेळी श्री ज्ञानेश्वरांनी वैदिक प्रज्ञान दृष्टीची पुन:श्च प्राणप्रतिष्ठा केली. मोक्ष विद्येचे दर्शन, शासन ग्रंथ सादर केला व महाराष्ट्राच्या जीवनाला, अध्यात्माला व संस्कृतीला ‘ज्ञान’ च्या महनीय ऐश्वर्याचा रत्नालंकार चढविला.
ब्रह्मनिष्ठ भारतीय संस्कृतीची `ब्रह्मपुत्रा' यज्ञ, योग, ज्ञान, भक्ति व कर्म अशा पंच अप: प्रवाहांनी परिपुष्ट आहे.
श्री ज्ञानेश्वरीत या पंच ‘आपां’चा पंचप्रवाहांचा - प्रयागराज सिद्ध झाला आहे.
प्रज्ञानाची छटा वैशिष्ट्याने, ठळकपणे चमकत असली तरी, श्री ज्ञानेश्वरीत तदितर मार्गाचे, विशेषांचे व दृष्टिकोनांचे सम्यक विवेचन आहे.
श्री ज्ञानेश्वरीत भावार्थाचेही दीपन आहे. ‘भावार्थ दीपिका’ हे तर ज्ञानेश्वरीचे नामांतर आहे. पण तेथेही एक सूक्ष्म श्लेष आहे. नुसता ‘भाव’ हा दीपनविषय नसून, ‘अर्थ’ उजेडांत आणावयाची उपमा देखील किती सूचक व अर्थगर्भ आहे, हे ध्यानांत घेण्यासारखे आहे.
श्री ज्ञानेश्वरीचा नित्यपाठ प्रत्येक महाराष्ट्रीय जीवनमात्राला वैदिक, औपनिषद, दार्शनिक व गीतानिर्दिष्ट जीवनपरंपरेशी परिचित ठेवील. त्याची प्रज्ञा, प्रखर व प्रसन्न करील.
सोज्वळ बुद्धिनिष्ठेला, शास्त्रीय दृष्टिकोनाला, डोळस अध्यात्माला श्री ज्ञानेश्वरी हे एक प्रकट आवाहन आहे.
बौद्धिक कूटप्रश्नांच्या सहस्त्रकांना संगति व समाधान देण्याचे सामर्थ्य श्री ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठांत आहे.
‘अंतर्मुख’ जीवन सुरू झाले की मनोवितानांत संशयपिशाच्यांचे सैतानी थैमान सुरू होते - होणे नैसर्गिक व आवश्यकही आहे.
‘ज्ञानशक्ती’ धर्मयुद्धाचे नियम आदरून, अज्ञानाशी झगडत असते.
सुप्त संस्कारांची, निद्रिस्त अज्ञवृत्तींची हत्या ज्ञानाला करवत नाही. उठवून, जाग देऊन, समोर उभे करून, ज्ञानशक्ती त्यांना पराजित करू पहाते.
‘केवलं ज्ञानरूपम’ असे श्रीसद्गुरूदेव, आपल्या शिष्याचे, शिष्योत्तमाचे संशय विपर्यय करून यांना केवळ वरदहस्ताने सहसा शांत करीत नसतात. राजकारणांत, ज्याप्रमाणे युद्धाशिवाय स्वातंत्र्य नाही, त्याप्रमाणे, धर्मकारणात स्वत:च्या अज्ञानाशी, अंतर्विश्वाशी, कश्मल कर्माशयाशी झुंज घेतल्याशिवाय मोक्ष नाही - अंत:शांति नाही.
ज्ञानेश्वरीची नित्यसंगति, प्रथमावस्थेत संशयपिशाच्चंचे रान उठवील, अध्यात्मांचे वयर्थ भासवील, महापुरूषाच्या आचरणांत भेसूर विसंगतीचे उठाव दिसतील, गुरूद्रोह निष्पन्न ‘अहंकार’ आपले क्षुद्र समाधान साधील पण ज्या अर्धस्फूट ज्ञानशक्तीने ही भूते उठविलेली असतात, तीच ती ज्ञानशक्ती स्फुटतर पक्वतर होऊ लागली की, आपोआपच गाडली जातात. संशय फिटत जातात, महापुरूषांचे आचरण निष्कलंक व सुसंगत वाटू लागते. त्यांची साक्षित्वाची व नि:संगतेची दुर्ज्ञेय भूमिका स्पष्टतर होऊ लागते.
ज्वालाग्राही, स्फोटक द्रव्ये खच्चून भरलेला एखादा कंदूक आपल्या लाडक्या लहानग्याचे हातामध्ये असावा, त्या कंदूकाशी खेळत बसण्याचा अजाण प्राणघातक बालहट्ट त्याने घेतलेला असावा, जर तो कंदूक दूर सरकला तर, सरकेल की, काय या कल्पनेने सुद्धा एक द्रावक किंकाळी त्या कमलकोमल कंठातून निघण्यासाठी सिद्ध असावी. अशा प्रसंगी आपल्या पंचप्राणांची सावधानता एकवटून या अल्लड अर्भकाची माउली, आपल्या चिमुकल्या चांदाचे लाड, काही क्षण - काही मोजके क्षणच - पण चालूही देते.
अगदी हेच चित्र श्री गुरूमार्गात आढळून येते. गुरूमाऊली आपल्या प्रियोत्तम शिष्याला अहंकाराच्या विदारक पकडीत तो असतानासुद्धा त्याला अणुमात्र न दुखवता, स्वत: अनंत यातना सोसून त्याचे लाड-कोड पुरवीत पुरवीत पुन: त्याचे संरक्षणच करते. ही प्रक्रिया इतकी नाजूक, इतकी कलाकुसरीची असते, इतका अंत:संशय या भुमिकेला आवश्यक असतो की, संप्रदायविशिष्ट श्री गुरूंनाच तो शक्य होतो.
श्री गुरूमाऊलीच्या स्नेहार्द्र कूर्मदृष्टीने नकळत पुष्ट होता होता या व असल्या अनेक महान दिव्यांतून साधक अखेरचा विजय मिळवू शकतोच आणि मग त्याला गुरूशिष्य संबंधांतील आंतर रहस्ये उलगडू लागतात.
श्री गुरूदेवांना कर्तव्यबुद्धी व कर्तव्यक्षेत्र नसते. स्वभावसहज आचार हाच त्यांचा परमोच्च नीतिधर्म.
बाह्य जगांतल्या अनेक उत्तेजक प्रसंगामुळे ज्या प्रेरणा मिळतील त्याना प्रत्युत्तर म्हणून श्री गुरूदेवांचे, अवधूतांचे व जीवन्मुक्त लोकसेवकांचे आचार घटत असतात.
पूर्वकर्मार्जित अहंकेंद्राचा, जीवात्मभावाचा काही महानुभावांचे ठिकाणी, कर्मबंधाने देहप्राप्ती झाल्यानंतरही, शुद्ध चैतन्याची पूर्णानुभूती झाल्यावर अवतारप्रक्रिया सिद्ध होऊ शकते.
श्रीराम-कृष्णादि अवतारांचे लौकिक कार्य व सिद्ध सद्गुरूंचे लौकिक व्यवहार तत्वत: एकाच आंतररचनेचे असतात.
काही सद्गुरूंच्या जीवनाला पूर्वकर्मांचा पार्श्व नसतो. काहींच्या जीवनाला तो असला तरी पूर्णत: अस्तमित झालेला असतो. हे सत्य, हा सिद्धांत काहीसा वैचित्र्यपूर्ण वाटला तरी अवतार प्रधान आर्यसंस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला त्याचे ग्रहण होणे फारसे कठीण नाही.
श्री गुरूंना ‘देव’ ही संज्ञा कर्मबंधाचे अतीत्व दर्शविण्यासाठीच लावली जाते. देवाने माणसाचा ‘अवतार’ घेणे व माणसाने देवामध्ये स्वत:चा ‘उर्ध्वतार’ करणे या दोन्हीही प्रक्रिया स्वभावत:च व फलत: एकच आहेत.
सिद्ध-चैतन्याला कर्तव्यप्रधान नीतीमत्तेची बंधने नसतात. केवल बहि:प्रेरणांनी त्याचा आविष्कार सिद्ध होत असतो.
श्री गुरूदेवांना कर्मजन्य अहंकेंद्र जन्मत:च नसते किंवा असले तरी लुप्त झालेले असते, त्यामुळे त्यांचे आचरणांत पुष्कळ वेळा लौकिक एकसूत्रतेचा अभाव आढळतो. त्यांचे हेतू व कृति, आचार व विचार यांचे बाह्यस्वरूप सारखेच असते. भेद असतो, तो, त्या आचारांच्या कारक-तत्वांत, मूल हेतूंत व अंत:करणशच्या पार्श्वस्पंदात, बहिर्मुख दृष्टीला, लौकिक दृष्टीच्या मीमांसकाला, अहंकाराने अंध झालेल्या उन्मत्त शिष्यसाधकाला, सिद्ध-सद्गुरूंचे अलौकिक हेतू, आंतर-स्पंद कसे ओळखणार?
लोकोत्तर चेतोव्यवहार, अलौकिक पुरूषांचे मनोव्यापार, सिद्ध सद्गुरूंचे संकेत कोण ओळखू शकेल? असा मार्मिक प्रश्न भवभूतीने उपस्थित करून त्याचे नकारार्थी उत्तर स्वत:च सुचित केले नाही काय?
गुरू-शिष्य संबंधात श्री गुरूदेवांच्या आचरणांतील कारक तत्वे नजरेआड झाल्यामुळे प्रामाणिक पण अल्पज्ञ शिष्यसाधकांपुढे महान पेचप्रसंग उपस्थित होतात. श्री गुरूदेवांच्या आचरणाचा अन्वयार्थ पुष्कळ वेळा लागत नाही. त्यांचे अभिप्राय व हेतू सुस्पष्ट होत नाहीत व त्यामुळे आदरवृत्तीतील एकेक मात्रा कमी होऊ लागते.
अहंकार-जड साधकाला वाटते की, ‘मला दिसत नसलेली, कळत नसलेली गोष्ट असणे शक्यच नाही. मला ज्या गोष्टींचे विलोभन आहे, आकर्षण आहे त्या गोष्टींचे विलोभन व आकर्षण श्री गुरुदेवांनाही असलेच पाहिजे. माझे दोष, माझी वैगुण्ये, माझे प्रमाद, माझे ठिकाणी आहेत त्याअर्थी श्री गुरूदेवांचे ठिकाणीही ते असलेच पाहिजेत.’ असल्या रोचक व वाचक अनुमानांची प्रमाणे म्हणून तो शिष्य स्वत:च्या व श्री सद्गुरूदेवांच्या आचरणांतील केवळ बाह्य अंगे तुलनेसाठी विचारात घेतो.
‘मी इंद्रियतृप्ती साधीत आहे. श्रीगुरूदेवही इंद्रियनिष्ठ जगताना दिसतातच, मग मी बद्ध का? व ते मुक्त कसे?’ ही त्याची समस्या!
श्री गुरुदेवांचे हेतू कारक तत्त्वे निराळी असतात. त्यांचे आचरण अहंकेद्राने निर्णित होत नाही. बरीच उत्तेजके (stimulants) त्यांच्या इंद्रियग्रामाला कार्यप्रवृत्त करीत असतात. विशुद्ध प्रकाशाने उद्दीप्त झालेला त्यांचा देह, बाह्य प्रकृतीच्या उत्क्रांतीला पोषक अशा केवळ प्रतिक्रिया देत असतो. या प्रतिक्रियांत अहंकार, बुद्धी, मन व चित्त हा अंत:करणात्मक कर्माशय जागृत नसतो व म्हणून बाह्यत: तेच व तसेच दिसणारे आचार, स्वभावत: अगदी वेगळे, म्हणजे अनासक्त व निष्काम असतात.
या वस्तूस्थितीचे प्रमाण म्हणून एक ठळक लक्षण सांगता येईल. श्री गुरूदेवांच्या सर्व वासना, मंद अ-तीव्र असतात. त्यांच्या वासनांना ‘आग्रह’ नसतो. सफल किंवा निष्फल झाल्यातरी त्यांना हर्ष-विषाद बघवत नाहीत. स्थितप्रज्ञांच्या, प्रज्ञेचे, बुद्धीचे लक्षण भगवान व्यासांनी ‘अनाग्रह’ असे दिले आहे.
सिद्ध सद्गुरूंना वासनाच नसते असे नव्हे. वासनेचा ‘अभाव’ ही मुक्ती नव्हे. वासनेतले बंधक बीज दग्ध होणे ही मुक्ती होय. त्यांना काही वासना असतात. पण त्या स्वेच्छा-प्रारब्धांतल्या नसतात. प्राकृतिक समष्टिक उन्मनीच्या उत्तेजकांनी निर्माण केलेल्या असतात. श्री गुरूदेव वासनाहीन नसतात व त्यामुळे शिष्याची सहज दिशाभूल होते.
...