साधना सूत्रे

अनुभवामृतांतील तात्त्विक कोटिक्रम

(५)

ज्ञान व अज्ञान यांना मूलभूत असते ती स्फुरत्ता. ही स्फुरत्ताच स्व-स्वरूपाची अखंड अनुभूति होय. सामान्यत; अज्ञानाचा नाश ज्ञानाने होतो, पण ज्ञानाचा नाश अज्ञानाने होऊ शकेल काय?

ज्ञान झाल्यावर त्याची विस्मृती होऊ शकेल. पण विनाश कसा होईल?

ज्ञान व अज्ञान परस्पर सापेक्ष आहेत, पण त्या सापेक्षतेत दोन्ही पदे सममूल्य नाहीत!

ज्ञानाने अज्ञानाचा बोध होतो. पण अज्ञानाने ज्ञानाचा बोध होऊ शकणार नाही.

अज्ञान ज्ञानाला आवरण शक्तीने व विक्षेप शक्तीने झाकळू शकेल पण ते मालवू शकणार नाही. 

वृत्ति-ज्ञान व अज्ञान ही सापेक्ष असली तरी स्फुरत्ता, स्व-स्वरूप स्थिती, हा अनुभव त्यांचे अलीकडचा व पलीकडचा, अतीत व अतिक्रांत आहे, आणि तरीही, तो अनुभव विशुद्ध ज्ञानमात्रतेचा आहे. अज्ञानमात्रतेचा नाही. वृत्तिज्ञान लोपले तरी निखळे ‘ज्ञान’ हा स्फुरत्तेचा स्वभाव आहे, व असणार; अज्ञान किंवा अंध:कार नाही व नसणार.

म्हणोनि ज्ञाने उजळे । कां अज्ञानें रूळे ।

तैसें नव्हे निर्वाळें । ज्ञानमात्र जे।। - (प्र.४,ओवी१७.)

परि ज्ञानमात्रे निखळे । तेंचि कीं तया कळे ।

काय देखिजे बुबुळे । बुबुळा जेवी ।। - (प्र. ४, ओवी १८.)

यामुळे, जे ज्ञानाने प्रकाशित होईल, प्रकट होईल, किंवा अज्ञानाने झाकले जाईल, असे नसणारे ते (स्व स्वरूप; स्फुरत्ता स्वरूप) केवळ शुद्ध ज्ञानमात्र आहे. परंतु ते केवळ शुद्ध, ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्याला त्याची निराळी जाणीव कशी होईल? होइल असे म्हणाल तर ज्याप्रमाणे डोळयाने स्वत:ला पहावे, तशी होईल. निराळा विषय म्हणून कधीच होणार नाही.

अनुभवामृतांत, विशेषत: अजातवाद, स्फूर्तिवाद, चिद्विलासवाद व दृष्टिसृष्टिवाद  यांच्या तात्विक कोटिक्रमांचा आढळ होतो. सृष्टि-दृष्टिवाद, अवच्छेद-वाद, बिंब-प्रतिबिंबवाद, आभास-वाद व कल्पना -वाद यांचा परामर्श ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी घेण्यांत आला आहे.

श्री ज्ञानेश्वरांनी सर्व वादांचा व उपपत्तींचा समन्वय लावून अनुभवामृतांत स्व-स्वरूपानुभवाचे ‘संविद्रहस्य’ सांगितले आहे. 

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिभेवर, विश्वैक धामाने प्रथम आपला प्रसादचंद्रमा पूर्णत: फुलवून त्यांच्या स्फूर्तिकलेची पौर्णिमा केली, आणि नंतर जणूकाय ती प्रफुल्ल गुरूपौर्णिमाच ‘अनुभवामृताच्या’ शब्दसरस्वतींत नित्यत्वाने बिंबित करून ठेविली आहे. 

गेली चाळीस वर्षे महाराष्ट्र जनतेला संतवाङ्मयाचा गाढ परिचय करून देणारे माझे परमस्नेही श्री. प्रल्हादबुवा सुबंध, अनुभवामृताचे पुनश्च आंशत: प्रकाशन करीत आहेत.

त्यानिमित्ताने हे चार शब्द मला लिहिण्याची संधि मिळाली.

नैष्ठिक ब्रह्मचर्याचे प्रतिज्ञापालन, संतवाणीचा व संतवृतीचा अखंड अभ्यास, आध्यात्मिक जिज्ञासेची धाराप्रवाही उपस्थिती , या त्रैगुण्याने सालंकृत असलेले प्रल्हादबुवा अनुभवामृताचे प्रकाशन करून पुनश्च महाराष्ट्राला ऋणाईत करीत आहेत.

प्रत्येक मराठी हृदयाने कृतज्ञतापूर्वक या ग्रंथाचे स्वागत करावे, अध्ययन करावे व स्वत: धन्य व्हावे, ही माझी प्रार्थना आहे.

म्हणोनी ज्ञानदेवो म्हणे। अनुभवामृते येणे।

सणु भोगिजे सणे। विश्वाचे नि॥ - अनुभवामृत, प्रकरण १०, ऒवी २१

ज्येष्ठ शुद्ध एकादशी, शके १८७८

ता. १८ जून १९५६

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search