(४)
अपरोक्ष-अनुभवांत भेद-प्रतीति नाही, द्वैत-ग्रह नाही व त्रिपुटि-भाव नाही.
स्वभावांत म्हणजे आपल्या मूळ, स्व-स्वरूप अपरोक्ष प्रत्ययांत निराकार स्वयंपूर्णता आहे. या अवस्थेत अज्ञानाचा नव्हे, ज्ञानाचाही लोप व्हावयाचा असतो म्हणूनच केवळ अज्ञान-धांडोळा करून न थांबता ज्ञानेश्वरांनी अनुभवामृतांत ज्ञानाचेही विसर्जन केले आहे.
ज्ञान व अज्ञान या दोहोंनाहि मूलभूत अधिष्ठान भूत अशी सत्-ता, अशी संवित्, अशी स्फुरत्ता, आपले स्व-स्वरूप म्हणून कशी अनुभवावी ही विशुद्ध, वैचारिक प्रक्रिया अनुभवामृतांत ज्ञानेश्वरांनी सुस्पष्ट केली आहे.
जगाच्या एकंदर वाङ्मयांत, तत्वशास्त्राच्या अखिल इतिहासांत मानवी अनुभवाचे इतके सूक्ष्म, मूलगामी व तर्कविशुद्ध पृथक्करण करणारा दुसरा ग्रंथ पाहू लागले, तर अनामिका सार्थवती होईल अशी भीती वाटते.