(३)
अनुभवामृत हा एकमात्र ग्रंथ असा आहे कीं ज्याच्या अध्ययनानें व मननानें आत्मविकासाची अंतिम कोटि जें सच्चिदानंदपद, चिरंजीवपद तें ज्ञानत: ज्ञानयोगपद्धतीनें अनुभवता येते.
केवळ ज्ञानयोगानें मोक्ष कसा मिळतो? कसा मिळूं शकेल? याचा प्रत्यय व मार्गदर्शन, अनुभवामृत या एकाच मराठी ग्रंथांत एवढ्या तर्कशुद्ध पद्धतीने केलेले आढळेल.
ज्ञानाबरोबर, भक्तिभाव व कर्मकौशल्य आपोआप साथ देत राहतातच. तथापि, अंतिम स्फुरता ‘ज्ञान-मात्र’ आहे व त्यामुळे ज्ञानमार्ग व विचार-योग यांचाच अवलंब अखेर बिंदू गाठीपर्यंत असणें क्रमप्राप्त आहे.
येथे ज्ञानयोग श्रेष्ठ की भक्तियोग, की कर्मयोग वा राजयोग असा लढा निर्माण होत नाहीं व ज्ञानेतरयोग हे कमी महत्त्वाचे ठरत नाहीत.
सर्व दृष्टि व अवस्था, योग व प्रयोग सारख्याच महत्त्वाचे आहेत पण अनुभवाचे पृथक्करण करीत करीत अपरोक्ष अनुभूतिपर्यंत जावयाचे असेल तर ज्ञानमाऊलीने एक विशुद्ध विचार-साधना प्रस्थापित केली आहे. ही साधना अनुभवामृतांत साकारली आहे.
अनुभवामृतांत पहिल्याच ओवीत ‘देवो देवी’ हे पद निक्षेपून त्या दोघांना ‘निरूपाधिके’ हे विशेषण लावून ज्ञानेश्वरांनी आपले वैशिष्ट्यपूर्ण असे तत्त्वज्ञान उद्घोषित केले आहे.
पुरूष व प्रकृति, ब्रह्न व माया या अंतिम द्वंद्वांमध्ये प्रकृती किंवा माया ही उपाधि समजली जाते पण ज्ञानेश्वरांची भूमिका ही आहे की ‘उपाधि’ या कल्पनेला अर्थवत्ता किंवा अस्तित्व देखील शक्य नाही! अपरोक्षात किंवा स्व-स्वरूपांत कोठल्या प्रकारच्या भेद-प्रतीतीचा संभवच नाही.
श्री प्रकाशानंद, ‘सिद्धांत मुक्तावली’त म्हणतात त्याप्रमाणे-
प्रतीती मात्रमेवेदम् भाति विश्वम् चराचरम्।
प्रतीतव्य प्रतीत्योश्च भेद: प्रामाणिक: कुत:।।
सर्व विश्व ही एक विशुद्ध ‘प्रतीति’ आहे. प्रतीति आणि प्रतीतव्य या मधील भेदाला अवसरच नाही - त्या भेदाला प्रमाण काय? जे प्रमाण असेल तेहि पुन: प्रतीतीरूपच असणार.
‘निरूपाधिके’ हा एकच शब्द पहिल्या ओवीत मोजून ज्ञानेश्वरांनी आपल्या उच्चेत्तुंग तत्त्वज्ञानाच्या धवलगिरीचे जणू काय ओझरते दर्शन घडविले आहे.
उपाधि म्हणजे काय? उपाधि शब्दाचे अनेक अर्थ आहेत; कारण, निमित्त, पदवी, गुण किंवा धर्म, अनुषंग.इ. सामान्यत:, आगंतुक गुण किंवा धर्म म्हणजे उपाधि, असे समजले जाते. वाचस्पति मिश्रांनी ‘उपाधि’ या शब्दाची व्याख्या करताना विपरित रूप दर्शविते ती. असे तिचे लक्षण केले आहे.
‘अन्यथास्थितस्य वस्तुन: अन्यथा प्रकाशनरूप: उपाधि:।’
‘न्यायदर्शनां’त उपाधि शब्दाचे विवेचन अत्यंत सूक्ष्मतेने झाले आहे.
यद्व्यभिचारित्वेत साधनस्य साध्यव्यभिचारित्वम् स: उपाधि:।
तार्किक शिरोमणि रघुनाथ भट्टाचार्यांनी आपल्या सुप्रसिद्ध ‘दीधीति’ नामक ग्रंथाच्या अनुमानखंडांत उपाधि या पदावर सर्वोत्कृष्ट विवरण केले आहे. त्यांनी उपाधि शब्दाचा निरूक्तार्थ असा केला आहे. त्यांच्या मते उपाधि हा शब्द योगरूढ असून ‘उप समीपवर्तिनि आदधाति संक्रामयाति स्वीयम् धर्मम् इति उपाधि:।’, जवळच्या पदार्थात आपला गुण संक्रमित करतो तो उपाधि. संस्कृतमध्ये उपाधि शब्द पुल्लिंगी आहे. स्फटिकाजवळ जपा नावाचे तांबडे पुष्प असेल तर स्फटिक तांबडा दिसतो. स्वत: स्फटिकाला तांबडा रंग नसताना तो जपा कुसुमाच्या सान्निध्यामुळे तांबडा दिसतो. तांबडे फूल हा उपाधि व स्फटिक हे उपाधेय. उपाधि हा अविद्येमुळे भासमान होतो, असे ‘वेदान्तदर्शन’ मानते.
उपाधीनाम्च अविद्या प्रत्युपस्थापितत्वात् - (ब्रह्नसूत्र १५-३-२).
ही अविद्या ‘नैसर्गिकी’ आहे व म्हणूनच हे सर्व लौकिक व वैदिक म्हणजे यज्ञादिक व्यवहार होऊ शकतात.
‘सत्यामेवच नैसर्गिकक्याम् अविद्यायाम लोक वेद व्यवहारावतार: इति ।’ - ब्रह्नसूत्र (१५-३-२) वरील शंकरभाष्य पहावे.
अविद्येमुळे उपाधि होते. या उपाधीचेच स्वरूपांतर बुद्धि किंवा अंत:करणचतुष्टय किंवा अंत:करणपंचक होय. बुद्धि हा एकच शब्द संपूर्ण अंत:करणाचा वाचक म्हणून वापरला जातो. अहंकार, बुद्धि, मन व चित्त हे चार पदार्थ अंत:करणाचे घटक होत; त्यांतच अंत:करण म्हणून एक पांचवा पदार्थही कल्पिला जातो. त्याला अंत:करणपंचक असेही म्हणतात. पण आपण, एक ‘बुद्धि’ एवढाच शब्द वापरू.
या बुद्धिचे स्वरूप शंकराचार्य अन्वय-व्यतिरेकात्मक आहे असे मानतात. व्यतिरेकाने जगदाभास होतो. व अन्वयाने परमात्म-रूप प्रतीतीत येते. बुद्धीचा ‘विवेक’ हा मुख्य गुण आहे. सुरेश्वराचार्य आपल्या नैष्कर्म्य-सिद्धीत (१४,४) म्हणतात,
‘बुद्धौ एव विवेकोऽयम् यत अनात्मतया भिदा
बुद्धिमेव उपमृद्गति कदलीं तत्फलं यथा।।’
विवेक हा बुद्धित अभिव्यक्त होतो. बुद्धि हे अनात्मतत्त्व आहे. बुद्धि म्हणजे आत्मा नव्हे हे खरे पण अनात्मबुद्धिीचा नाश करणारा विवेक बुद्धितच प्रकट होतो, व बुद्धिचा उपाधि विवेकाच्या उदयानंतर आपोआप अस्तंगत होतो. केळीला फळे आली व ती पूर्ण पक्व झाली की स्वत: केळीचे झाड नष्ट होत असते.
अनुभवामृत ग्रंथाच्या परिशीलनाने बुद्धिचा हा विवेकगुण समुदीत होईल. या ग्रंथाचे प्रथम एकदा समग्र पारायण करावे. नंतर रोज फक्त एका प्रकरणाचाच अभ्यास करावा. असे दहा दिवसांचे फलाहारपूर्वक अनुष्ठान करावे. अकरावा दिवस सिद्धान्त-निदीध्यासांत घालवावा. स्वप्नांतर्गत साक्षात्कारादि अनुभव अकराव्या रात्री अवश्य येतो.
बुद्धीत विवेकसूर्याचा उदय होतो.