(२)
हा ग्रंथ स्वत: ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणें ‘सिद्ध अनुवाद’ आहे; म्हणजे स्वत:सिद्ध असलेल्या
आत्म-तत्त्वाचा ऊहापोह यांत आहे. पण, सर्व सिद्धांसाठीं एका सर्वश्रेष्ठ सिद्धानें केलेला हा ‘अनुवाद’ आहे,
असें म्हणणेंही युक्त होईल! कारण, हा ग्रंथ अध्यात्माचा उच्चोत्तम धवलगिरी आहे. येथें चंडोल गति हवी.
या ग्रंथाला ‘अनुभवामृत’ हें नांव स्वत: ज्ञानेश्वर माऊलीनें सहेतुक दिलें असून त्या नांवांत त्याचें सर्व
तर्हेचे तत्त्वज्ञान गर्भित आहे.
ज्ञानदेव स्वत: सांगतात कीं हे अनुभवामृत असें श्रीमंत आहे कीं अगोदर जीवनमुक्त असलेले जीव याचें
सेवन केल्यावर अमृतरूप होऊन जातील.
ज्ञानदेवो म्हणे श्रीमंत हे अनुभवामृत ।
सेऊनि जीवनमुक्त हेचि होतु।। प्र. १०,१९.
अमृतानुभव असाहि पर्याय प्रचलित आहे. ‘नित्यानंदैक्यदीपिका’ ही प्रासादिक व तेजाळ टीका लिहिणारे
परमहंस शिवकल्याण यांनींही तो स्वीकारला आहे, पण स्वत: ज्ञानेश्वरांचा ग्रंथांतर्गत स्पष्ट निर्णयच
असतांना दुसरा पर्याय किंवा विकृती स्वीकारण्याचें प्रयोजन काय?
हे अनुभवामृतच आहे. कारण अनुभव हेच अमृत होय असा या ग्रंथाचा संदेश आहे. जे अमृत असेल त्याचा फक्त अनुभव हा अभिप्राय नसून प्रत्येक व सर्व अनुभव, स्वभावत: अमृतमयच आहेत, ही माऊलीची भूमिका आहे.
सर्व अनुभवांचे स्वरूप-अंत:स्वरूप, यथार्थ स्वरूप व मूलस्वरूप अमृतमय आहे; साक्षात् अमरत्व आहे, अशी ज्ञान- राजाची शिकवण आहे. ‘अमृतानुभव’ म्हणण्यात हा अर्थ स्पष्ट होत नाही. मृतेतराजा म्हणजे अमृताचा, अमरत्वाचा अनुभव असा अर्थ तेथे प्रकटतो. अमरत्वाची प्रतीति खरी, पण मृतत्वाचा, जडत्वाचा त्याग केल्यावर असा काहीसा ध्वनि त्या नांवांत आढळतो.
अमृताचा अनुभव म्हणजे ‘मृत’ या कल्पनेची, देहबुद्धि किंवा जडत्व-बुद्धि यांची प्रथम धारणा नंतर त्यांचा त्याग व नंतर आत्मतत्वाचे ग्रहण, अशा शृंखलेची व्यंजना, ‘अमृतानुभव’ या शब्दांत आहे. पण ज्ञानेश्वरांचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत हा आहे, की मृत, जड, अज्ञानरूप, विषयरूप असे काहीच नाही.
स्वरूपत:, सर्व अनुभव हेच अमृत होय. अविद्या, अज्ञान, माया, भ्रम हे पदार्थच नव्हेत. मात्र अनुभवाचे यथार्थ स्वरूप ओळखले पाहिजे. ते ओळखले की, अनुभव अमृतमयच नव्हे अमृत-मात्र आहे!