'ज्ञानदूत' हा एक स्वर्गीय देवदूत आहे. एका 'तारे'चे बोल ऐकत ऐकत तो शरदऋतूमध्यें,
प्रत्येक दिवाळीला महाराष्ट्र-शारदेसाठीं एक अभिनव महावस्त्र घेऊन येतो.
या वर्षीची ही पांचवी भाऊबीज तो दैवी संपत्तीच्या 'अमित' वैभवाने साजरी करीत आहे.
आजच्या महाराष्ट्रीय जीवनांत स्फूर्ति उत्पन्न व्हावी- हें या ज्ञानतेंजाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
स्फूर्ति म्हणजे चैतन्य !
स्फूर्ति म्हणजे प्रत्येक हांकेला होकार, प्रत्येक आवाहनाचा स्वीकार !
स्फूर्ति म्हणजे अस्मिता - राष्ट्रीय, जागतिक आणि वैश्विक अस्मिता !
स्फूर्ति म्हणजे मानवी जीवनातल्या मूलभूत व महनीय मूल्यांचा अविरत साक्षात्कार !
स्फूर्ति म्हणजे आत्म-तत्त्वाचा अखंड आठव.
आजच्या जीवनांत स्फूर्तीचा अभाव ठळकपणें प्रतीत होतो.
स्फूर्ति ही चैतन्याची, जीवंतपणाची खूण आहे.
आजच्या जीवनातल्या बहुतेक सर्व क्रिया यांत्रिक, कृत्रिम स्वरूपाच्या झाल्या आहेत. सर्वत्र
कृत्रिमपणाचें साम्राज्य पसरले आहेत.
आजकालच्या शिक्षणक्रमांत नुसत्या माहितीला, इन्फर्मेशनला, विशेष महत्त्व आलें
आहे. Inspiration चें, स्फूर्तीचें स्थान Information ने, माहितीनें बळकावलें आहे!
जीवनांत क्षणाक्षणाला नित्य-नवी स्फूर्ति निर्माण करील, तें खरें शिक्षण.
कृत्रिमता म्हणजे काय?
बाह्य प्रेरणेमुळे जी कृति घडते, ती कृत्रिम असते. अंत:प्रेरणेने जी कृति घडते, ती साहजिक असते. पहिल्या वर्गासाठीं, परिक्षेतल्या गुणांसाठीं मिळविलें जाणारें जें ज्ञान, तें कृत्रिम होय; आणि जिज्ञासेच्या तृप्तीसाठी
जें मिळविले जातें तें ज्ञान 'साहजिक' होय.
बाह्य आणि आंतर् या शब्दांचा अर्थ अधिक स्पष्ट झाला पाहिजे.
'शरीराच्या बाहेर असेल ते बाह्य' हें लक्षण तर्काच्या कसोटीस उतरत नाही.
अर्थात् 'शरीराच्या आंत आहे तें आंतर', हेंही लक्षण ग्रहण करणें कठीण आहे.
अस्थी, मज्जासंस्था, पचनेंद्रियें या अंतरंगातल्या, 'आंतर' वस्तू आहेत, असें वाटत नाही.
शरीराच्या आंत असून देखील या वस्तू, जीवा नजीकच्या आहेत, त्यांना अंतस्थ-ता आहे,
हें पटत नाहीं.
'करण' म्हणजे इंद्रिय. अंत:करण म्हणजे आंतलें इंद्रिय. कर्मेंद्रियें पांच, ज्ञानेंद्रियें पांच व मन एक,
हीं एकादश इंद्रियें होत. तसें पाहिलें तर, तीं सर्व बाहेरचीच वाटतात.
'पायूपस्थंहस्तपादंवाक्' गुदद्वार, उपस्थ, हात, पाय व जिव्हा, हीं पंच कर्मेंद्रियें आणि श्रोत्र, त्वक्,
नेत्र, रसना व घ्राण हीं पंच ज्ञानेंद्रियें प्रसिद्धच आहेत. सर्व इंद्रियें बहिर्मुख आहेत. तीं
बाहेर पहातात. (परांचि खानि - कठ उपनिषद)
मन हें इंद्रिय 'आंतर् इंद्रिय' आहे, असें म्हटलें, तर त्यात बरेंचसें सत्य आहे.
सामान्यत: मन म्हणजेच अंत:करण, असें समजले जातें; पण वेदांत-दर्शनाच्या परिभाषेंत
अंत:करणाचे चार घटक सांगितले आहेत:
अहंकार, बुद्धि, मन आणि चित्त.
अनुभवाला एक-सूत्रता देणें, हे अहंकाराचें कार्य आहे. बुद्धि ही अन्वय-व्यतिरेकात्मिका आहे. तिला साम्य व भेद समजतात. मन हें सुखदु:खाचें आश्रयस्थान आहे; आणि चित्त हें कार्याला प्रवृत्त करतें.
चित्त हें इच्छाशक्तीचें अधिष्ठान आहे.
अंत:करणाचे हे चार घटक अंत:करणाच्या प्रत्येक स्पंदांत, प्रत्येक कार्यांत समन्वयानें उपस्थित
असतात. अंत:करणाच्या किंवा आंतल्या इंद्रियाच्या, प्रत्येक उन्मेषात अहम् असतो, अन्वय-व्यतिरेक असतो, सुखदु:खाची भावना असते व प्रत्यक्ष कृति असते. या चार प्रकारांचें प्रमाण कमी अधिक
असूं शकते.
मानवाच्या सर्व प्रवृत्ती सुखार्थक असतात, म्हणून सुखदु:खाचें अधिष्ठान जें मन त्यालाच अनेक
वेळां अंत:करण ही संज्ञा दिली जाते.
अंत:करण म्हणजे आंतील इंद्रिय, म्हणजेच मन. पण, मन देखील एक इंद्रिय आहे. इंद्रियांच्या
सर्व मर्यादा मनालाही आहेत.
एकंदर इंद्रिये अकरा. त्यांतील दहा इंद्रियांशीं तुलना केली तर, मन हें 'आंतर-इंद्रिय' म्हणतां येईल, हें खरे.
तथापि अंतस् शब्दाचा खरा अर्थ, अंतिम अर्थ, चरम अर्थ, मनस्-तत्त्वानेंही व्यक्त होत नाही.
यन्मनसा न मनुते। (केन उपनिषद) जें तत्व मनाच्या पकडी पलीकडचें आहे, किंबहुना ज्या शक्तीमुळे मनस् -तत्त्वाला अर्थ येतो, तें खरें अंतस्-तत्त्व होय.
उपनिषत्कारांनीं त्याला 'अंतर्यामी' अशी संज्ञा दिली आहे.
अंतर्यामी, आत्मन्, आत्मतत्त्व या शब्दांनी आपणांस विशेष कांही बोध होत नाहीं. एक अस्पष्ट, अंधुक, धूसर असा अर्थ-मेघ मनांत तरंगूं लागतो, इतकेच.
आत्म - तत्त्वाचीं लक्षणें सांगावयाचीच तर 'सत्, चित्, आनंद'; 'सत्यं, शिवं, सुंदरम्' अशा शब्दांनीं
सांगितली जातात. आत्मतत्त्व म्हणजे अत्यंत आंतले, मुळांतले स्वरूप होय. अंत:शरीरे ज्योतिर्मयो आत्मा (मुंडक उपनिषद).
मानवमात्रांतले अत्यंत आंतले, मूलस्वरूप, सत्यमय, चैतन्यमय म्हणजे मंगलमय किंवा शिवमय, आणि आनंदमय असे आहे. सत्य, चैतन्य किंवा मांगल्य, ही आंतली, मुळांतली, मूलतत्त्वें म्हणजें
'मूल्यें' आहेत. मूलभूत किंवा मूलरूप असणारीं तत्त्वें म्हणून त्यांना 'मूल्यें' असें म्हणावयाचें.
या मौलिक तत्त्वांच्या, म्हणजे मूल्यांच्या प्रकाशांत जीवन व्यतीत करणें, हा 'दिवाळी'चा खरा अर्थ आहे. मूल्यांच्या ज्योती या ख-या पणत्या होत. मूल्यांचें ज्ञान नसेल, भान नसेल, ध्यान नसेल, तर जीवन अंध:कारमय होईल.
असतो मा सत् गमय।
तमसो मा ज्योतिर्गमय।
मृत्योर्मा अमृतं गमय।। - बृहदारण्यक - १, ३, २८.
या तीनही पंक्तींचा अर्थ एकच आहे. सत् आणि अमृत याही ज्योती आहेत. असत् व मृत्यू हीं
अंध:काराचीं रूपें आहेत. ज्योति हा स्फुरतेचा, स्फुरणाच्या सातत्याचा वस्तुपाठ आहे.
प्रकाशाच्या लहरीवर लहरी अखंडतेनें उद्भवत असतात. प्रकाशाची प्रत्येक नवोनव लहर त्या
ज्योतीला आकार देत असते.
जीवनाचेंही असेच आहे. स्फुरण नसेल, नवचैतन्य क्षणाक्षणाला सळसळत नसेल तर ते 'प्रेताचे'
'जगणे' होय. स्फूर्ति हा एकच शब्द ज्ञानेश्वरांनी आत्मतत्त्वाचें स्वरूप सांगण्यासाठी वापरला आहे.
'नाहीं स्फूर्तिमात्र वाचूनी' - (अनुभवामृत प्र. ७, २४५)
'स्फूरद्रूपचि' - (अनुभवामृत प्र. ७, २४६)
जीवमात्रांत व जातमात्रांत एक ध्रुव-ज्योति आह -, (ऋग्वेद, मंडल ६, ९, ५).
प्रत्येक जीवन ही एक पणती आहे. त्या पणतींत एक इवलीशी अमर-ज्योति तेवत आहे.
सर्व सृष्टींमध्यें या पणत्या व या दीपकलिका चिरंतन तेजानें चमकत असून त्या दीपावलीचा एक
नित्योत्सव साजरा करीत आहेत.
दीपावलीचा हा प्रतिसांवत्सरिक व नैमित्तिक उत्सव विश्वातल्या अखंड नित्योत्सवाचे एक
लहानसें प्रतीक व प्रात्यक्षिक आहे.
ज्या जीवाला, एखाद्या धगधगीत स्फूर्तीनें पेटवलें असेल, त्याला सर्वदा व सर्वत्र दिवाळीचा
महोत्सवच दिसणार व भेटणार.