(१)
विद्युत्प्रकाशाच्या झगझगाटानें दीपावलीचें सत्यस्वरूप, अन्त:स्वरूप प्रकट होत नाहीं. न्यूयॉर्क
मधला टाईमस्क्वेअर, प्रत्येक रात्रीं मध्यान्हाला लाजवणा-या विद्युत्प्रकाशाच्या वणव्यानें पेटलेला
असतो. पण तेथे दिवाळीचे मंगल दर्शन, मला माझ्या तीन वर्षाच्या न्यूयॉर्क मधील वास्तव्यांत
कधीही झाले नाहीं.
मिणमिण तेवणारी पणतींतील प्रशांत-ज्योति, हीच दिवाळीची प्राणज्योति, अमर ज्योति होय.
जीवनांत देखील महत्त्वाकांक्षांचा झगझगाट निर्मांण करणे ही जीवनाची खरी दिवाळी नव्हे.
ख-याखु-या सहानुभवाचे, जिव्हाळयाचे , प्रेमाचे, सोज्वळ स्नेहाचे, अल्प-स्वल्प क्षण, अजाण
अर्भकांचे निरागस हास्योद्गार, उपेक्षितांचे, दलितांचे जातां येतां पुसलेले अश्रु, विशुद्ध स्नेहभावाने
केलेले व झालेले क्षणजीवि सुखसंवाद, निसर्गातल्या व मानव्यांतल्या सौंदर्यदर्शनानें अंत:करणाला
निमिषमात्र झालेल्या गुदगुल्या, या आणि असल्या 'अमृत अनुभवां'च्या इवल्याशा पणत्या हे
जीवनांतल्या दिवाळीचें सनातन स्वरूप आहे.
लहानगी अर्भके या चिरंतन जीवनाच्या अमरज्योति आहेत. त्या चिमुकल्या, छोटुल्या पणत्यांची
पंक्ति ही जीवनाच्या अमृतत्वाची दीपावली होय!
त्या अमरज्योतींना वंदन करून आपण उगवत्या दीपावलीचे स्वागत करूं या.
(२)
सत्याची, सौंदर्याची आणि सौजन्याची लहानगी आणि इवलाली, अल्प आणि स्वल्प,
इषत् आणि त्रुटित अशी अनन्त दर्शने निसर्गात आणि जीवनांत अवतीर्ण होत असतात.
या दीपकलिका अखंडतेनें, अविरतपणें उदित होतात; अस्तंगत झाल्यासारख्या वाटतात, पण पुनश्च
पुनर्जात तेजानें अन्तरंगांतल्या व निसर्गांतल्या क्षितिजावर चमकूं लागतात.
पणतींतील इवलीशी ज्योत हीच दिवाळीच्या महोत्सवाची प्राणशक्ति होय. प्रकाशाचा अमाप पसारा
म्हणजे दिवाळी नव्हे.
दर दिवशी मध्यान्हीला सर्वत्र प्रकाशच प्रकाश असतो; त्याला आपण दिवाळी म्हणतो कां?
अल्पस्वल्प अंध:कार आणि त्या अन्ध:काराला जिंकणारी मातीच्या पणतींतली इवलीशी जळती वात,
हें दिवाळीचे खरें स्वरूप आहे.
अल्पदु:खाच्या पार्श्वावर क्षणसुखाची लकेर, 'असत्' च्या स्थंडिलावर 'सत्' चा अल्प आविर्भाव;
मृत्यूच्या कृष्णमेघावर अमृतत्वाची विद्युल्लेखा व सायंकाळच्या गाढ अंध:काराला उजळणारी
पणतींतील अल्प ज्योति हीं दिवाळीची खरींखुरी दर्शनें आहेत.
(३)
पृथ्वीचा मानदंड असणा-या हिमालयाची भव्यता, इवल्याशा हिमबिंदूतही संपुटित झालेली असते.
तो इवलासा हिमबिंदु, हिमकण देखील एखाद्या क्षणीं इन्द्रधनुष्य, सूर्यास्त किंवा संपूर्ण नभाचा नीलिमा स्वत:च्या हृदयांत सामावून धरूं शकतो.
आकार व महत्त्व यांचे प्रमाण पुष्कळवेळां व्यस्त असतें.
बहिर्मुखतेला, चर्म-चक्षूला आकारांचें महत्त्व पट्कन समजते.
अन्तर्मुख व्यक्तिला, मूल्यग्राहक प्रतिभेला अन्तस्तत्त्वाच्या साक्षात्काराची ओढ असते.
(४)
अल्पांचे व स्वल्पांचे महत्त्व आपणास ओळखत नाही. स्वल्पविराम घेण्याची वृत्ति आणि शक्ति असणें,
ही मानवी जीवनातील उत्कृष्ट कला आहे; पण आपण त्या कलेकडे नेहमी दुर्लक्ष करतो.
स्वल्प या शब्दाचे दोन अवयव आहेत. सु आणि अल्प.
स्वल्प म्हणजे अत्यन्त थोडे, अगदि लहान 'अण्वन्तो हि धर्म:।' धर्मं हा अणुरूप आहे; आणि
या अणु-स्वरूप धर्मांचें अत्यल्प स्वरूप, महान् संकटापासून संरक्षण करूं शकते असें गीता सांगते.
स्वल्पमप्यस्य धर्मस्य,
त्रायते महतो भयात्। - गीता २-४०
अर्थ हा शब्दांचा - शब्दसमुहांचा प्राण आहे. शब्द आकृति तर अर्थ अन्त:शक्ति होय.
अर्थ हा अणुरूप, सूक्ष्म असतो; आकृति स्थूल असते, विशाल असते.
अर्थ हा आत्मा तर शब्द हें शरीर होय.
शिव आणि शक्ति, ब्रह्म आणि प्रकृति यांच्या तादात्म्य संबंधांचे शब्द आणि अर्थ हें प्रतिक सुप्रसिद्धच आहे.
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये।
जगत: पितरो वन्दे पार्वंतीपरमेश्वरौ।।
हें कालिदासानें केलेलें रघुवंशाचे मंगलचरण सर्वश्रुत आहे.
शब्दाचा अर्थ जसा सूक्ष्म, तसा जीवनाचा श्रेष्ठतम अर्थ किंवा परमार्थं हा देखील
अणु प्रमाण, सु-सूक्ष्म असतो.
उच्चोदात्त अनुभूति या केव्हांही दीर्घ सूत्रात्मक, परिष्कारात्मक, अनुषंगात्मक नसतात.
(५)
इषत् म्हणजे अल्प किंवा किंचित्. ईश्वरी साक्षात्काराचा अनुभव हा देखील एक इषत् प्रत्यय आहे.
जीवनांतील 'समाधि-धने' ही नेहमीच 'किंचित काव्ये' असतात.
कालत: विचार केला तर साक्षात्काराचा अनुभव हा क्षण मात्रच असतो. त्याचे कालदृष्टीनें मापन कधीच होऊ शकत नाही. तरीही, त्याची 'प्रत्यक्षता' निमिषमात्रच टिकणारी असते, हे त्रिकाल सत्य आहे.
जीवन्मुक्तांच्या जीवनांत पेट घेतलेले असे अनेक 'क्षण' चमकत असतात.
या लहानग्या, धाकुट्या दीपकलीकांची दीपावली म्हणजे मानव्याची, उच्चोत्तम अवस्था,
जीवनमुक्तावस्था होय.
लहानगे, इवलेसें, अल्प, स्वल्प, इषत् व किंचित या परिमाणांनी मोजले जाणारे दीप्तीचें
आणि 'ज्ञप्तीचें' किरण जेव्हा मानवी अन्त:करणाला, मानवाच्या अंतरंगातल्या जाणीव शक्तिला
कुरवाळतात, तेव्हां तेव्हां मानवी जीवनाची अर्थवत्ता व सफलता साकार झाल्याचा अनुभव येतो.