साधना सूत्रे

अल्पांचें व स्वल्पांचें अंत:स्वरूप

पृथ्वीचा मानदंड असणा-या हिमालयाची भव्यता व दिव्यता इवल्याशा हिमबिंदूतही संपुटित झालेली असते.

तो इवलासा हिम-बिंदू, हिम-कण देखील एखाद्या क्षणीं इन्द्रधनुष्य, सूर्यास्त किंवा संपूर्ण नभाचा नीलिमा स्वत:च्या हृदयांत सामावून धरूं शकतो.

आकार  व महत्त्व यांचे प्रमाण पुष्कळ वेळां 'व्यस्त' असतें. 

बहिर्मुखतेला, चर्म-चक्षूला आकाराचें महत्त्व पटकन् समजते. अंतर्मुख वृत्तीला, मूल्य-ग्राहक प्रतिभेला, अंतस्तत्त्वाच्या साक्षात्काराची ओढ असते.

अंतर्मुख तात्त्विक दृष्टीला दीपावलीचे रहस्य कशांत आढळेल बरें?

अल्पांचें व स्वल्पांचें महत्त्व आपण ओळखीत नाहीं. स्वल्प-विराम घेण्याची वृत्ति आणि शक्ति असणें ही मानवी जीवनांतील सर्वोत्कृष्ट कला आहे. पण आपण त्या कलेकडे नेहमी दुर्लंक्ष करतो.

'स्वल्प' या शब्दाचे दोन अवयव आहेत - सु आणि अल्प.

स्वल्प म्हणजे अगदीं थोडें, अत्यंत लहान. 

अण्वंतो हि धर्मां:। - धर्म अणुरूप आहे आणि या अणु-स्वरूप धर्माचें अत्यल्प स्वरूप देखील महान्  संकटापासून संरक्षण करूं शकते असें गीता सांगते.

'स्वल्पमप्यस्य धर्मस्य, त्रायते महतो भयात्।' -  गीता, अध्याय २-४०

अर्थ हा शब्दांचा, शब्द-समूहांचा प्राण आहे. शब्द आकृति तर अर्थ अंत:शक्ति होय.

अर्थं हा अनुरूप, सूक्ष्म असतो; आकृति स्थूल असते, विशाल असते.

अर्थं हा आत्मा तर शब्द हे शरीर. 

शिव आणि शक्ति, ब्रह्म आणि प्रकृति यांच्या तादात्मसंबंधाचें, शब्द आणि अर्थं हें प्रतीक सुप्रसिद्धच आहे.

वागर्थाविव संपृक्तौ वागर्थंप्रतिपत्तये।

जगत: पितरौ वंदे, पार्वतीपरमेश्वरौ।।

हें कालिदासानें केलेलें रघुवंशाचें मंगलाचरण सर्वविश्रुत आहे. 

शब्दाचा अर्थ जसा सूक्ष्म तसा जीवनाचा श्रेष्ठतम अर्थ किंवा परमार्थ हा देखील अणु-प्रमाण, 

सु-सूक्ष्म असतो.

जीवनातील सौंदर्यस्थळें ही नेहमीं अल्प आणि स्वल्प असतात.

उच्चोदात्त अनुभूति या केव्हांही दीर्घसूत्रात्मक, परिष्कारात्मक, अनुषंगात्मक नसतात.

ईषत् म्हणजे अल्प, किंचित्.

साक्षात्काराचा अनुभव हा देखील एक ईषत् प्रत्यय आहे. 

जीवनांतील 'समाधिधनें' ही नेहमींच किंचित्काव्यें असतात. कालत: विचार केला तर, साक्षात्काराचा अनुभव, हा क्षणमात्रच असतो. त्याचें अंत:स्वरूप व परिणाम मात्र कालातीत असतात. त्याचें 

कालदृष्टीनें मापन कधींच होऊं शकत नाहीं. तरीही त्याची प्रत्यक्षता निमिषमात्रच टिकणारी असते, 

हें त्रि-काल सत्य आहे.

जीवन्मुक्ताच्या जीवनांत, पेट घेतलेले असे अनेक 'क्षण' चमकत असतात. या लहानग्या, धाकुट्या 

दीपकलिकांची दीपावली म्हणजेच मानव्याची उच्चोत्तम अवस्था, जीवन्मुक्तावस्था होय.

लहानगें, इवलेसें, अल्प, स्वल्प, ईषत् व किंचित् या परिमाणांनीं मोजले जाणारे दीप्तीचे आणि ज्ञप्तीचे 

किरण जेंव्हा जेंव्हा अंत:करणाला, आंतल्या जाणीव शक्तीला, कुरवाळतात; तेंव्हा तेंव्हा मानवी 

जीवनाची अर्थवत्ता व सफलता साकार झाल्याचा अनुभव येतो.

सत्याची, सौंदर्याची आणि सौजन्याची लहानगी आणि इवलालीं, अल्प आणि स्वल्प, ईषत् आणि 

त्रुटित अशी अनंत दर्शनें निसर्गात आणि जीवनांत अवतीर्ण होत असतात.

या दीपकलिका अखंडतेनें, अविरतपणें उदित होतात; अस्तंगत झाल्यासारख्या वाटतात, पण पुनश्च 

पुनर्जात तेजानें अंतरंगातल्या व निसर्गातल्या क्षितिजावर चमकूं लागतात.

पणतींतली इवलीशी ज्योत हीच दिवाळीच्या महोत्सवाची प्राणशक्ति होय; प्रकाशाचा अमाप पसारा 

म्हणजे दिवाळी नव्हे.

दर दिवशीं मध्यान्हाला सर्वत्र प्रकाशच प्रकाश असतो. त्याला आपण दिवाळी म्हणतो कां?

अल्प स्वल्प अंध:कार आणि त्या अंध:काराला जिंकणारी मातीच्या पणतींतली इवलीशी जळती वात

हें दिवाळीचें खरें स्वरूप आहे.

अल्प दु:खाच्या पार्श्वावर क्षणसुखाची लकेर; 'असत्' च्या स्थंडिलावर 'सत्' चा अल्प आविर्भाव; मृत्यूच्या 

कृष्ण मेघावर अमृतत्वाची विद्युल्लेखा व सायंकाळच्या गाढ अंध:काराला उजळणारी पणतीतील

अल्प अल्प ज्योति हीं दिवाळीची खरीखुरीं दर्शनें आहेत.

दिवाळी हें जीवनाचें यथार्थं, वास्तववादी प्रतीक आहे. 

विद्युत्प्रकाशाच्या झगझगाटानें दीपावलीचें सत्यस्वरूप, अंत:स्वरूप प्रकट होत नाहीं. न्यूयॉर्क मधला 

टाईम्स् स्क्वेअर, प्रत्येक रात्रीं, मध्यान्हाला लाजवणा-या विद्युत् प्रकाशाच्या वणव्यानें पेटलेला असतो. 

पण, तेथें दिवाळीचें मंगल दर्शन मला तीन वर्षांत केव्हांही झालें नाहीं. मिणमिण तेवणारी पणतींतली 

प्रशांत ज्योति, हीच दिवाळीची प्राण-ज्योति, अमरज्योति होय.

जीवनांत देखील महत्त्वाकांक्षांचा झगझगाट निर्माण करणें ही जीवनाची दिवाळी नव्हे.

ख-याखु-या सहानुभवाचे, जिव्हाळयाचे, प्रेमाचे, सोज्वळ स्नेहाचे अल्प स्वल्प क्षण; अजाण अर्भकांचे निरागस हास्योद्गार; उपेक्षितांचे, दलितांचे जाता येता पुसलेले अश्रू; विशुद्ध स्नेहभावानें केलेले व 

झालेले क्षणजीवी सुखसंवाद; निसर्गांतल्या व मानव्यांतल्या सौंदर्य दर्शंनानें अंत:करणाला निमिषमात्र 

झालेल्या गुदगुल्या; या आणि असल्या अमृत अनुभवांच्या किंवा अनुभूतींच्या इवल्याशा पणत्या हे जीवनांतल्या दिवाळीचे सनातन स्वरूप आहे. लहानगी अर्भके या चिरंतन जीवनाच्या अमर-ज्योति 

आहेत. त्या छोटुल्या, चिमुकल्या पणत्यांची पंक्ति ही जीवनाच्या अमृतत्वाची दीपावलि होय.

त्या अमरज्योतींना वंदन करून आपण उगवत्या दीपावलींचें स्वागत करूं या.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search