महाराष्ट्राच्या भव्य शब्दसृष्टींतून एक शब्द सूर्यफुलासारखा निवडतां येईल. हा शब्द खरोखरच
सूर्यासारखा जन्मभर, जीवनभर नवचैतन्य व प्रकाश देत राहील. तो शब्द म्हणजे 'सुद्धां'.
'सुद्धां' हा शब्द सह-भाव व अंतर्भाव दर्शवितो; समावेशक, व्यापक, संग्राहक अशा मन:प्रवृत्तीचें 'सुद्धां'
हे एक बोलके प्रतीक आहे.
बहिष्करण, विरोध, वेगळीक, दुजेपण या शब्दांमध्यें सूचित असलेली भावना 'सुद्धां' हा शब्द करतो.
सर्व प्रकारच्या मतभेदांना, विविध व विरोधक दृष्टिकोनांना प्रत्येकाचें स्वत:चें असें एक स्वयं-भू
स्थान आहे, असा या शब्दाचा संदेश आहे.
'च' व्यतिरेक-वाचक आहे. 'सुद्धां' अन्वय-बोधक आहे. 'च' हा शब्द, 'सुद्धां' या शब्दाच्या प्रतिध्रुवाचा
ज्ञापक आहे. 'च' विच्छेदक आहे. 'सुद्धां' संयोजक आहे.
ज्ञानोत्तर कर्म केलें'च' पाहिजे किंवा सिद्धावस्थेंत व्यवहार केला'च' पाहिजे, हा 'च'कारात्मक सिद्धांत
सदोष आहे. वस्तुत: सिद्धावस्थेंत, जीवन्मुक्तावस्थेंत, स्थित-प्रज्ञाच्या भूमिकेंत 'च' काराला स्थानच
नाहीं. विशेषत: इतर व्यक्तींना त्या अवस्थेबद्दल 'चकार' शब्द काढता येत नाही.
लोकमान्य टिळक कर्मयोगाचें महत्त्व प्रतिपादितात, तें जीवन्मुक्तांची लक्षणा करण्यासाठीं होय, जीवन्मुक्तांना उपदेश करण्यासाठीं नाही ! स्थितप्रज्ञ कर्मप्रवण असतात अशी एक लक्षणा करून
आपण सर्वांनी, सामान्यजनांनी कर्मप्रवण राहावें अशी गीतारहस्याची शिकवण आहे.
'जीवन्मुक्ताने कर्म केलें'च' पाहिजे,' असें म्हणणें, म्हणजे केवळ निरीक्षक व विमर्शक असणा-या
व्यक्तींनी सिद्धांना व जीवन्मुक्तांना नीतिपाठ शिकविण्यासारखे आहे.
पूर्ण-प्रज्ञाला अल्प-ज्ञ व्यक्तीनें, सर्वज्ञाला अंशमात्र ज्ञान असलेल्या पुरुषानें, आचरण-शास्त्र समजावून
देणें हास्यास्पद नव्हे काय?
'तूं कर्म केलें'च' पाहिजेस,' असा हुकूम प्रत्यक्ष परमेश्वर देखील एखाद्या स्वयंपूर्ण, स्वयंप्रज्ञ,
स्वयंप्रकाश व्यक्तीला देऊं शकत नाहीं. कारण ती व्यक्ति स्वत:च परमेश्वर-स्वरूप असते. सत्पुरुषाचा सहजाचार व नीतीचा, धर्माचा, अध्यात्माचा उगम व कलश आहे.
कोठलेंही मानवी धर्मशास्त्र, नीतिग्रंथ किंवा सदाचार-सूत्र स्थित-प्रज्ञांना, जीवन्मुक्तांना, गुणातीत
व्यक्तींना नियामक बंधनें देऊं शकत नाहीं, धार्मिक किंवा नैतिक नियम शिकवूं शकत नाहीं, कारण
त्यांच्या जीवनावरून, आचारावरून सर्व धर्मशास्त्रें व नीतिशास्त्रे उद्भूत होत असतात.
'सदाचार किंवा सत्स्वरूप झालेल्या पुरुषांचा आचार, हें धर्म - मूल आहे', हा श्रीव्यासांचा व भगवान
मनूचा सिद्धांत सुप्रसिद्धच आहे.
सदाचार म्हणजे सत्पुरुषांचा आचार. हें नीतिशास्त्राचें, धर्मशास्त्राचें व मोक्षशास्त्राचें उगमस्थान आहे,
गंगोत्री आहे. अर्थातच, गंगेच्या उगमस्थानाने कोठें असावें, कसें असावें हें तिच्या मुखाजवळ असणा-या,
समुद्र-संगमाच्या जवळपास असणा-या एखाद्या ओहोळानें ठरविणें हें अयोग्यच काय, पण असंभवनीय
आहे. ईश्वरस्वरूप असणा-या महामानवांना त्यांच्या जीवनाबद्दल, आचरणाबद्दल धडे देण्याचें धाडस
करणें, हे कुशाग्र व तैलबुद्धीच्या माणसांनादेखील समुचित नव्हे.
बुद्धीची कुश-अग्रता म्हणजे तीक्ष्णता, 'च' कार निर्मितीच्या कार्यास अत्यंत उपयुक्त आहे. 'च' काराने
भेदनिष्पत्ति होते. सूक्ष्म भेद निर्माण करण्याची आवश्यकता नि:संशय आहे. तत्त्वशास्त्र, न्यायदर्शन,
नीति, समाजशास्त्र इत्यादि अनेक विचारक्षेत्रांत सु-सूक्ष्म भेद निर्माण करण्याची शक्ति अत्यंत उपयुक्त
ठरते. भेद-दृष्टीशिवाय कोठलेंही शास्त्र संप्राप्त, संवर्धित व साकार होणार नाहीं.
विशेष-ज्ञांच्या (Specialists च्या) आजच्या युगांत भेद दृष्टीचा व भेदसिद्धीचा विकास झाला आहे. तो उपकारक नाहीं, असे कोण म्हणेल? हा विकास म्हणजे 'च' काराचाच परिणाम आहे.
तरीही, सर्व भेदांना अर्थवत्ता देणारा, सर्व 'च' कारांना अर्थवत्ता देणारा 'सुद्धां' शब्द अधिक महत्त्वाचा
आहे. कारण अभेदाच्या अधिष्ठानाशिवाय कोणत्याही प्रकारचा भेद सार्थ होऊं शकत नाहीं, अर्थवान्
होऊं शकत नाहीं. 'सुद्धां' हा शब्द अभेद, अन्वय, एक-ता हे अर्थ प्रकट करतो.
दोन वाक्यांमध्यें, दोन भूमिकांमध्यें व दोन व्यक्तींमध्यें अनेक प्रकारची साम्यें किंवा अद्वैत असलें,
तरच भेद-दर्शनाची व भेद-प्रतीतीची शक्यता असते.
असंबद्ध किंवा नि:संबद्ध असणा-या क्षेत्रामध्यें भेद, विरोध व वैविध्य यांपैकी काहींच शक्य
होत नाहीं. परस्परांपासून सर्वार्थानें व सदैव निराळीं राहणारी अशीं तीं वर्तुळें राहतील.
सर्व प्रकारच्या भेदांना आधार देणारी, सार्थ करणारी अभेदाची अद्वैताची भूमिका अपरिहार्य आहे.
'सुद्धां' या शब्दाने हा मूलभूत व सूक्ष्म अभेद दर्शविला जातो. 'सुद्धां' शब्द अंतर्भाव वाचक आहे...
बहिष्कार - निषेधक आहे. 'सुद्धां' शब्दाने सर्व प्रकारच्या बहिष्कृतींची बहिष्कृति होते.
'समवाय' या तत्त्वाचे लौकिक दर्शन घडविणारा 'सुद्धां' हा शब्द आपण सदैव ध्यानांत ठेवूं या.
दीपावलीच्या पंचदिनात्मक, पंचविध स्वरूपांत 'समवाय' तत्त्वाचा विनियोग उत्कृष्टपणें साधला आहे.
धनत्रयोदशी, नरकासुर, महालक्ष्मी, बलि-प्रतिपदा व यमद्वितीया या पांच प्रतीकांत प्रथम दर्शनीं
देखील किती तरी भेद स्पष्ट होतात. कुठें धन-त्रयोदशी, कुठें नरकासुर, कुठें लक्ष्मी-पूजन, कुठें विक्रमशाली दानशूर बलिराजा व कुठें बंधू-भगिनींचें परस्पर प्रेम!
या पंचपाळयांत मानवी जीवनांतील सर्व भेद, सर्व मूल्यें व अर्थ समन्वित झाले आहेत.
'दीपावली' हा शब्ददेखील समवायाचा व 'सुद्धां' या शब्दांतील महान् अर्थाचा ज्ञापक आहे.
अनेक दीपांतले भेद व विविध-त्व 'अवलि' या एका शब्दानें एकत्रित केले आहेत.
संग्रह व समवाय हे आर्यांच्या संस्कृतीचे व्यावर्तक विशेष आहेत. अनार्यांच्या चालीरिती व कांही
दैवतेंसुद्धा आर्यांनीं आत्मसात् केली आहेत.
अमावस्येस करावयाच्या पिंड-पितृ-यज्ञाचा दीपावलीच्या मंगल पंचकांत अंतर्भाव झाला आहे.
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज हे दिवाळीचे मुख्य पंचांग (पंच-अंग) होय. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन व भाऊबीज यांच्याबरोबर नरकचतुर्दशी व अमावस्या यांचा 'सुद्धां' समावेश झाला आहे. अमंगलात 'सुद्धां' मांगल्य निर्माण करता येते हा वस्तुपाठ दीपावली हिंदुमात्राला सदैव शिकवीत आहे.
दीपावलीच्या मंगलोत्सवाचा जनक, यमदेव ही वैदिक देवता आहे. वैदिक यमदेवतेचें स्वरूप केवळ
मृत्यु- दाता असें नाहीं. यम म्हणजे नियति, ऋत व सत्य यांचा आद्यप्रणेता व स्वामी होय.
मृत्यूबरोबर अमरत्वाचा 'सुद्धां' नियंता, यमदेवच आहे. असे हे वैदिक यमदेवाचें समावेशक स्वरूप
आहे. (ऋग्वेद १०, १६, १)
वैवस्वत किंवा आकाश हा ज्याचा पिता व शरण्य किंवा उषा ही ज्याची माता असा हा यमराज
पित्यासारखा व्यापक व मातेसारखा प्रकाशक आहे.
वैदिक कालीन आर्य लोक बारा महिन्यांत एकंदर सात पाक-यज्ञ करीत असत. त्यांतल्या पार्वण
या पितृ-यज्ञाचे विधान अश्विन अमावस्येस होत असे.
अमावस्येला पिंड-पितृ-यज्ञाला, बलि या असुराला आणि यम या मृत्युदेवतेला, त्यांच्यामधला संग्राह्य
अंश ग्रहण करून त्यांना महामांगल्य देणारे दीपावली हें वैदिक व भारतीय संस्कृतीचें एक
अद्भुतरम्य प्रतीक आहे.
या दिवाळीपर्यंत महाराष्ट्र'च' तेवढा वेगळा पडला होता. तो 'सुद्धां' आता एक-भाषिक झाल्यासारखा आहे. भाषिक अन्यायाची अमावस्या संपत आली आहे व तिचे जागी संयुक्त महाराष्ट्राच्या भाग्यलक्ष्मीचे
पुण्यपूजन सुरू होत आहे.