को जागरति
को जागरवान्
को जागर्ति? जागा कोण आहे?--
हा प्रश्न करीत प्रतिवर्षीं कोजागिरी येत असते.
मी व तुम्ही - आपण जागे आहोंत काय?
महा्राष्ट्र जागा आहे काय?
दसरा किंवा दीपावलि यांचेपेक्षांही 'कोजागिरी' अधिक प्राचीन आहे.
ऋग्वेदांतील ६० व्या मंडलांतील कांही उल्लेखांवरून एक न्याय्य अनु्मान निघतें. अश्वयु्गमास म्हणजे अश्विन. या महिन्यांतील पौर्णिमेला एक पाकयज्ञ करावयाचा असतो. नवे तांदुळ व गोदुग्ध यांची प्रस्तुत पाकयज्ञात हव्रिर्द्रव्य म्हणून आवश्यकता असते.
सूत्रकारांनी व निबंधकारांनी सात सांवत्सरिक पाकयज्ञांचा निर्देंश केला आहे. अष्टक, पार्वण, श्राद्ध, श्रावणी, आग्रयण, चैत्री व अश्वयुजी.
धर्मसिंधु्कारांनी कोजागिरीच्या दिवशीं लक्ष्मी व इंद्र यांचे पूजन, नारिकेल-उदकपान, नवान्न-भक्षण इ. विधींचे उल्लेख केलेले आहेत.
आज आपण 'आग्रयण' काय व कसें करणार? आग्रयण म्हणजे प्रथम जे हवन किंवा संतर्पण
करावयाचें, पहिल्या धान्यांचा जो पाकयज्ञ करावयाचा, त्यांचे नाव आग्रयण. आजच्या महाराष्ट्रांत
पहिलें धान्य, नवें धान्य कोणाच्या दृष्टीला पडतें?
धान्य व वस्त्र कसें मिळेल याबद्दल आज आपण जागें झालें पाहिजे.
स्वाभ्रिमानानें, आत्मीय तेजानें आपण आज जगत आहों काय? उद्यां जगूं शकूं काय?
जीवनाचा अर्थ काय? जीवनाचें साफल्य कशांत आहे? याबद्दल आपण जागें झालें पाहिजे.
या प्रश्नांबद्दल स्वत:ला जागृत करण्याचा हा दिवस आहे.
महा्राष्ट्राचें, भारताचें, अखिल मानवतेचें नेतृत्त्व परिवर्तित झालें पाहिजे.
भीति, अविश्वास, संशय या कनिष्ठ भावनांनी आजचें जागतिक नेतृत्त्व निष्पन्न केलें आहे. धैर्य, प्रेम,
श्रद्धा या त्रैगु्ण्यानें निर्मिलेलें नेतृत्त्व मानवजातीला आज आवश्यक आहे. असलें नेतृत्त्व निर्माण
करणें हें आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.
संन्यास म्हणजे सम्यक् न्यास.
जीवनांतल्या मूल्यांचा अनु्क्रम व्यवस्थित लावणें - याचा अर्थ धर्म.
अग्रपू्जेचा मान अग्रतत्वाला, अग्र वस्तूला, अग्र व्यक्तीला देणें हेंच जीवनाचें तत्त्वशास्त्र.
आपली चूक होते - प्रमाद होतो तो येथेंच - पहिलें स्थान द्वितीय, तृतीय, पंचम मूल्यांना आपण
देत रहातों. द्रव्य, अधिकार, सत्ता, कीर्ति यांना आपण अग्रपू्जेचा मान देतों. सत्यलोलुप होण्याऐवजीं
सत्तालोलुप होतों. अनासक्त नेता, त्यागी, तत्त्वनिष्ठ पुढारी हीच मानवतेची आशा आहे.
संन्यस्त श्रमण हेच जगदु्द्धार करूं शकतील.
आईन्स्टाईन, रसेल, वेल्स, शॉ, जेराल्ड हर्ड, आल्डस हक्सले यांच्यासारखे पाश्चिमात्य तत्त्वज्ञ हेंच
सांगून राहिले आहेत.
संन्यास म्हणजे जीवनाशीं भ्याड विन्मु्खता नव्हे.
संन्यास म्हणजे मानवी जीवनाच्या महा्मू्ल्यांचा यथाक्रम स्वीकार व सत्कार. आद्य शंकराचार्यांनीं
याच विधायक संन्यासाचा विचार, आचार व प्रचार केला.
कर्मयोगाचें अधिष्ठान व आंतररहस्य संन्यस्त वृत्तींत आहे.
धैर्य हा सर्व योगांचा आत्मा होय.
धैर्य शब्द हा धी शब्दावरील विकृति आहे.
धैर्य हा भावनेचा परिणाम नसून अचल बुध्दिनिष्ठेचा परिपाक आहे.
महाराष्ट्रीय प्रज्ञा म्हणजेच महाराष्ट्राची धीरगंभीर मनस्विता, मराठ्यांचा मानदंड असणारी बुध्दिनिष्ठा.
जो पुरुष विचार करूं शकत नाहीं त्याला मूर्ख म्हणतात. जो विचार करूं इच्छित नाहीं - त्याला
हेकट, हटवादी म्हणतात. जो विचार करूं धजत नाहीं - त्याला गुलाम म्हणतात.
प्रत्येक महा्राष्ट्रीय विचार करूं शकतो, विचार करूं धजतो, पण पुष्कळ वेळा विचार करूं इच्छित नाही.
आपल्या महा्राष्ट्रीयांत हा एवढाच - पण केवढा प्रचंड! - दोष आहे.
उपेक्षाबुद्धि, उदासीनता हा महान् दुर्गुण आपल्या विकासाच्या व वैभवाच्या आड येत आहे.
आपली स्वयंप्रज्ञा, आपलें मनोधैर्य याबद्दल जागृति ठेवूं या.
पण आपल्या दोषांबद्दल व दुर्गु्णांबद्दल अधिक जागृत राहूंया.
यजु्र्वेद म्हणतो -
भूत्यै जागरणम् ।।
विकास व वैभव पाहिजे असेल तर जागें झालें पाहिजे - जागे राहिलें पाहिजे.