साधना सूत्रे

विजयादशमी : नवा अर्थ

श्रौत अग्नीच्या दोन भार्या प्रसिद्ध आहेत - एक स्वाहा, दुसरी स्वधा. 

अग्नीत झालेलें हवन स्वाहा ही देवतांना पोहोंचविते व स्वधा पितरांना पोहोंचविते. 

उज्ज्वल मानवी देहाच्या ठिकाणीं ज्या इंद्रिय-शक्ति आहेत त्या देवताच होत.

 

जे आनुवंशिक संस्कार आहेत ते पितर होत.

उदरांत अग्नि आहे व अन्नाचें त्यांत हवन होत असतें.

 

हृदयांत अग्नि आहे, त्याला उत्कट-उज्वल भावना सारख्या समर्पण कराव्या लागतात.

बुध्दीचें अग्नि-तेज नवोनव, उच्च्-उदात्त विचारांच्या समिधांनीं उद्दीपित ठेवावें लागतें.

इच्छाशक्तीच्या अग्निवेदींत धगधगीत ध्येयांचा हविर्भाग द्यावा लागतो.

जीवन हा एक महायज्ञ आहे.

 

दैनिक आचरणाची यज्ञ-ज्वाला, उत्कट भावना, उच्च्-उदात्त विचार व श्रेष्ठतम ध्येयें यांनी प्रज्वलित ठेवली पाहिजे.

'संयम'  अग्नीत सर्व उपभोगांची आहुति प्रथम देऊन नंतर यज्ञ-शिष्ट असा सुखाचा अनुभव घेतल्यानें जीवन सर्वांगाने प्रदीप्त होतें व रहातें.

सर्वांगानें दहाही इंद्रियांचा संयम साधणें व त्यांच्यावर विजय मिळविणें ही जीवनांतली खरी विजयादशमी होय. 

प्रत्येक शमीच्या व आपट्याच्या पानांत अग्नि-तेज सुप्त् असतें. शमीची व आपट्याची 'जाति' एकच आहे.

 

 

शमी वृक्षाच्या काष्ठ-घर्षणानें यज्ञांतील आहवनीय अग्नि निर्माण करण्याची प्रथा सु-प्रतिष्ठित आहे. म्हणून शमीचें अथवा आपट्याचें पान आहवनीय अग्नीचें प्रतीक होय. शिवाय, 'सुवर्ण' हें अग्नीचें एक नांव आहे.

दस-याच्या दिवशी ही पानें वाटतांना हें अग्नीतेज, हा स्फुल्लिंग, ही यज्ञज्वाला, हें सुवर्ण एकमेकांस द्यावयाचे व घ्यावयाचे असतें.

- धुं.गो.विनोद

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search