साधना सूत्रे

श्री गणपती

विघ्नकृत व विघ्नचरण अशी मंगलमूर्तीची दोन नांवे गाणपत्य-तंत्रात-प्रसिद्ध आहेत. 

विघ्नकृत किंवा विघ्न-कर्ता हें मंगलमूर्तीचें पूर्वांग आहे. विघ्नहर्ता हें मंगलमूर्तीचें उत्तरांग आहे.

 

विघ्न करण्याची शक्ति व विघ्न हरण्याची युक्ति एकाच देवतेच्या ठिकाणी असणें क्रमप्राप्त व समुचित आहे. जो रचील तोच खचील. जो रचनेची प्रक्रिया जाणील त्यालाच ती रचना उलगडतां येईल. आसुरी शक्तींना, विघ्नें उत्पन्न करूनच, पराजित करावयाचें असते. विघ्नें उलगडणें, 

नाहींशी करणें  - कुणाला शक्य आहे?

 

जो विघ्नांचें अंत:स्वरूप जाणतो, विघ्नांच्या घटकांचा 

अनुक्रम, व्युत्क्रम व प्रतिक्रम जाणतो, त्याला, आणि केवळ त्यालाच.

 

विघ्न शब्दाचे विश्लेषण - विघ् + न असे आहे. विघ् धातूचा अर्थ विघटन करणे, विभाग करणे असा होतो. विघ्न म्हणजे विभाग, व्यतिरेक, उकल, फोड.

 

व्यतिरेक व अन्वय या तत्त्वशास्त्राच्या दोन पद्धति किंवा प्रक्रिया आहेत. प्रथम व्यतिरेक व नंतर अन्वय. व्यतिरेक केल्याशिवाय, विभाग केल्याशिवाय, विघ्न केल्याशिवाय अन्वय, संयोग, मांगल्य साधणार कसें?  व्यतिरेक व अन्वय करते ती बुद्धि. बुद्धीचे कार्यच हें आहे - भेदसिद्ध व अभेदसिद्ध.

प्रथम भेद करून त्या भेदांना अधिष्ठान - भूत असणारा अ-भेद हुडकणें, ओळखणें व प्रकटविणें हा बुद्धिचा स्वभाव - धर्म आहे. 

बुद्धीची, आद्य श्री शंकराचार्यांनी केलेली, व्याख्याच अशी आहे - अन्वय - व्यतिरेकात्मिका बुद्धि:।

 

मंगलमूर्ति श्री गणपति हें बुद्धि देणारें, दैवत आहे. कारण त्याचे स्वरूप प्रत्यक्ष बुद्धिमय किंवा अन्वय - व्यतिरेकात्मक आहे. जी शक्ति अन्वय व व्यतिरेक करते, विघ्न म्हणजे व्यतिरेक जी करते व मांगल्य म्हणजे अन्वय जी करते ती विघ्नकर्ती व विघ्नहर्ती गणपति देवता होय.

 

बुद्धिलाच भेद - प्रतीति होते व बुद्धिलाच अभेद-दर्शन होतें. द्वैत निर्माण करणारी बुद्धि व अद्वैत सिद्धि प्रकट करणारीही बुद्धीच. मंग् धातूचा अर्थ हालचाल करणें, चलन वलन करणें, जाणें, पुढे जाणें, प्रगत रहाणें असा आहे. मंगल म्हणजे जे गतिमान आहे, चैतन्ययुक्त आहे, निर्जीव नाहीं, निश्चेष्ट नाहीं, तें. 

 

मंगलमूर्ति म्हणजे चैतन्य मूर्ति. जें खंडित आहे, तें अमंगल, अखंड म्हणजे मंगल. जें क्षत आहे, तुटलेंले आहे, तें अभद्र  असतें. मंगल असणारे तांदूळ अ-क्षता असतात व त्या तांदुळांनाच मंगलाक्षता असें म्हणतात. जी मूर्ति पूर्ण चैतन्याचें प्रतीक, तीच मंगलमूर्ति. जें सूत्र अ-खंडित सौभाग्य म्हणजे, अखंड पति सहवास देतें तें मंगलसूत्र होय. जड-ता म्हणजे भग्न-ता, चैतन्य म्हणजे पूर्णता, किंवा अ-भग्न-ता. जड-ता ही फक्त बुद्धीला पण व्यतिरेकी, वि-घटक बुद्धीलाच प्रतीत होते. 

 

सचेतन-ता चैतन्य हे फक्त अन्वय-क्रियात्मक बुद्धीलाच प्रतीत होतें. संपूर्ण बुद्धि, विघटक व संघटक बुद्धिभेद-निष्पादक व अभेद-प्रापक बुद्धि म्हणजेच ब्रह्मणस्पति भगवान् श्री गजानन होय. विघ्न देणारे म्हणजे वि-घटन करणारे, जडत्व भासविणारें प्रतीक, भगवान् श्री गजानन आहे. त्याचप्रमाणें, विघ्नहरण करणारें, सं-घटन करणारें, चैतन्य व्यक्तविणारें प्रतीकही भगवान ब्रह्मणस्पति हेंच होय. 

ब्रह्मन् म्हणजे ज्ञान, मंत्र अथवा स्तुति. ब्रह्माचा अर्थात् ज्ञानाचा जो पति तो ब्रह्मणस्पति ! 

 

ज्ञानाचा पति याचा अर्थ विविध ज्ञानांचा, वृत्तिवनांचा, खंड-ज्ञानांचा जो एकंकार तो ज्ञानपति किंवा ब्रह्मणस्पति. ब्रह्मणस्पति सूक्तांचा कर्ता गृत्समद हा एक ऋग्वेदकालीन द्रष्टा होता. पांच हजार वर्षांअलीकडे त्या महान् द्रष्ट्याचा काल येऊंच शकत नाहीं.

 

मंगलमूर्ति श्री गजाननाचें आदि स्वरूप, ऋग्वेदीय गृत्समदानें प्रथम न्याहाळिलें व ऋगवेदाच्या दुस-या मंडलांत निवेदित केलें. २३, २४, २५ व २६ या सूत्रांत गृत्समदाचे द्रष्टत्व व कवित्व पराकोटीला पोंचलें आहे.

 

मेघाति काण्व व कण्वो घौर या दोन द्रष्ट्यांनी ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात ब्रह्मणस्पति-स्तवन केलें आहे आणि सातव्या मंडलांत वसिष्ठ ऋषींनींही ब्रह्मणस्पतीला मंत्रांजलि वाहिली आहे. दहाव्या मंडलांत, शिरिंबिठोभारद्वाज यांचीही मंत्रप्रतिभा, ब्रह्मणस्पतीला आळवतांना सासिन्नली आहे, प्रफुल्लित झाली आहे.गृत्समद, मेघाति, कण्व, वसिष्ठ व भारद्वाज या द्रष्ट्र पंचकाने, 

मंगलमूर्ति ब्रह्मणस्पति हें प्रतीक, वैदिक व भारतीय संस्कृतीला प्रथम सादर केंलें. 

 

पंच द्रष्ट्यांनी, पंचसहस्त्र वर्षांपूर्वी प्रतीत केलेल्या या वैदिक, दिव्य -भव्य प्रतीकाचें स्वागत, स्वीकार व संरक्षा, अगदी या क्षणापर्यंत, भारताबाहेर बृहत् भारतांत व भारतांत अव्याहत-पणें होत आली आहे.

 

भारतीय संस्कृतीनें व भारतीय मानवतेनें पंच प्राणांची पंचारति करून या सुखकर्त्या व दु:खहर्त्या देवतेला अगदी या क्षणापर्यंत अव्याहतपणें आळविलें आहे. बुद्धीचें व मांगल्याचें हें अधिष्ठान गृत्समद ऋषींनी खालील सुप्रसिद्ध ऋचेनें मानवाच्या इतिहासांत प्रथम आवाहिलें होतें.

 

गणानाम् त्वा गणपतिं हवामहे ।

कविं कवीनाम् उपश्रवस्तमम्।।

ज्येष्ठ राजम् ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पत ।

आ न: श्रृण्वन् ऊतिभि: सींद सादनम्।।

 

हे ब्रह्मणस्पते, तूं गणांचा गणपति आहेस. अनेक समूहांचा समूहपति आहेस. तूं कवींचा कवि म्हणजे ज्ञात्यांचा ज्ञाता आहेस. तुझी कीर्ति सर्वोत्तम आहे. तूं राजांचा आदि-राज व दीप्तिमतांचा अधिराज. 

तूं सर्व प्रकारच्या ज्ञानांचा, मंत्रांचा व स्तोत्रांचा अधिपति आहेस. तुझ्या दिव्य संरक्षक शक्तींनी संयुक्त होत असताना तूं आमच्या सदनांत म्हणजे वसति-स्थानांत ये, स्वस्थपणें सुखासीन हो, व आमचे स्तवन श्रवण कर.

 

-गृत्समद, ऋग्वेद १।२३।१

 

भारद्वाज द्रष्टा म्हणतो - हे ब्रह्मणस्पते, ज्या महत् तेजानें, अग्नि, सूर्य व हें विराट विश्व प्रकाश-मय झालें आहे त्या दिव्य तेजानें आम्हांलाही तूं प्रसन्न व प्रकाशमय कर.

 

अग्निर्येन विराजति

सूर्यो येन विराजति

विराट् येन विराजति

विराज ,समदं कुरु।

-भारद्वाज, ऋग्वेद, खिल १०।१२८।१२.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search