आपण भारतीय लोक श्री मंगलमूर्तीचे, म्हणजे चेतना-चिंतामणीचे उपासक आहोत.
ही मंगलमूर्ति, हा चेतना-चिंतामणि या भारत-राष्ट्राचा गण नायक आहे, वि-नायक आहे. तो प्रतिवर्षी,
भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थीला, ‘तुरीय’ तिथीला घरोघरीं आगमन करून, सर्व विघ्नांचा नाश करतो.
‘तुरीय’ तिथि म्हणजे अवस्था त्रयाच्या देह-त्रयाच्या, गुण-त्रयाच्या, काल-त्रयाच्या पलीकडील अशी
इंद्रियातीत स्थिति, किंवा कालातीत तिथि-तेव्हां आणि तेथें मंगलमूर्तीचा अवतार होतो! आगमन होतें!
‘मंगल’ म्हणजे काय? मंग् या धातूचा निरुक्तार्थ चलनवलन करणें, हालचाल करणें, गतिमान असणें
किंवा विकासक्षम राहणे, असा आहे. ‘मंगल’ म्हणजे, जे चैतन्ययुक्त आहे, स्फुरणस्वरूप आहे तें.
मंगल-मूर्ति म्हणजे साकारलेले मांगल्य,स-देह चैतन्य. या दृष्टीनें सर्व स-चेतन पदार्थ किंवा व्यक्ति
या मंगल-मूर्ति आहेत; मंगल-मूर्तीचीं स्वरूपें आहेत, दर्शनें आहेत, साक्षात्कार आहेत.
विश्वांतील प्रत्येक वस्तूंत आणि व्यक्तींत मांगल्य आहे. पण तेथें तो एक सर्वांना समान असणारा
एक ‘सामान्य’ गुण आहे.
अनेक व्यक्तींमध्ये आढळणा-या एखाद्या ठळक गुणामुळे, ‘जाति’ ही कल्पना वैचारिक व्यवहारासाठी
निर्माण झाली आहे. जाति ही अनेकानेक व्यक्तींवर अधिष्ठित आहे. ‘जाति’ अशी स्वतंत्र वस्तु नाही.
‘सामान्य’ आणि ‘विशेष’ असे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. सामान्य हे जातिवाचक असते आणि
‘विशेष’ हे व्यक्तिवाचक असते. तर्कशास्त्राच्या इंग्रजी परिभाषेत सांगावयाचे तर, जाति हे
Universal आहे व व्यक्ति हे Particular आहे.
जाति या, एखाद्या गुणाच्या वेगळेपणावर, आगळेपणावर अवलंबून असतात. व्यक्ति या प्रत्यक्ष
असतात, मूर्तिमंत असतात. मांगल्याची जाति व व्यक्ति, ही दोन्ही तत्त्वें संपूर्णतेनें व स्वयंपूर्णतेनें
प्रणवरूप गजाननाच्या, किंवा ब्रह्मणस्पतीच्या मंगलमूर्तीत अवतीर्ण झाली आहेत. यालाच पाश्चात्य तर्कशास्त्रांत
Concrete Universal म्हणतात. एकाच व्यक्तींत सर्व जातीच्या जाति पूर्णपणे
अवतीर्ण होणें, किंवा एकमात्र व्यक्ति सर्व जातीची प्रतिनिधि असणें, दुसरी व्यक्तीच अस्तित्वांत नसणें.
सर्व जाति म्हणजे एकच व्यक्ति, असा प्रकार अपवादरूप कां होईना पण असूं शकतो त्याला Suigener
असे म्हणतात. सूर्य ही अशी एक व्यक्ति आहे. तिच्यात सूर्य जातीच्या सर्व व्यक्ति समाविष्ट आहेत.
दुसरा सूर्य नाहीं. मंगलमूर्तीचे असेंच आहे. एका मंगलमूर्तीत सर्व मांगल्य समाविष्ट आहे.
सूर्य जसा एक तशी मंगलमूर्ती एकच.
गुणविशेष एकत्रित आले, सम-केंद्रित झाले, स-देह झाले म्हणजे त्यांची व्यक्ति होते.
व्यक्तित्व नसेल तर गुणविशेषांचे ‘मनन’ होते, ‘दर्शन’ होत नाही. त्या गुणांना प्रत्यक्षता नसते.
वैशेषिक दर्शनाचे प्रणेते कणाद यांनी केलेली व्यक्ति या पद-अर्थाची व्याख्या अशी आहे-
गुणविशेषाश्रयो मूर्ति: व्यक्ति:।
गुणविशेषांचे आश्रयस्थान म्हणजे व्यक्ति.
अनेक व्यक्तींमध्ये समान असणारा जो धर्म तो ‘सामान्य’ धर्म होय.
सर्व मानवांमध्ये बुद्धि हा ‘सामान्य’ गुण आहे. मानवाचे किंवा मानव्याचे ते लक्षण आहे.
सर्व प्राण्यांमध्ये व मानवांमध्यें अनेक सामान्य गुण आहेत. पण ‘बुद्धि’ हा मानवाचा विशेष, गुण आहे,
असें व्यास, वसिष्ठ या पौर्वात्य आणि प्लेटो, अरिस्टॉटल या पाश्चिमात्य तत्ववेत्त्यांनीं अनेक शतकांपूर्वी सांगितलें आहे.
फक्त मानवांमध्येंच तो विशिष्ट गुण आहे म्हणून त्या गुणामुळे मानवाची एक स्वतंत्र ‘जाति’ सिद्ध झाली.
पण त्या जातीला प्रत्यक्षता किंवा खरेपणा मानवाच्या व्यक्तिमत्वानें प्राप्त करून दिला आहे.
व्यक्ति ही प्रत्यक्ष असते. जाति, गुण व गुणवैशिष्टये, ही समन्वयव्यतिरेकात्मक अशा
बुद्धिव्यापा यानें निर्माण होत असतात. त्यांचे अस्तित्व मुख्यत: बौद्धिक जगांत असतें.
एकंदर विश्व-जात आणि जात-विश्व, मानवी 'बुद्धी' ज्या बिंदूमध्ये, परिपूर्ण व परिणत झालें आहे.
सृष्टीच्या विकासक्रमाची अतिकोटी म्हणजे मानवी प्रज्ञा होय. पण बुद्धि हें एक इंद्रिय आहे.
ती स्वत: अतीन्द्रिय शक्ति नव्हे. अतीन्द्रिय शक्ती ग्रहण करण्याची पात्रता; तिच्या पूर्ण विकसित अवस्थेंत येते.
श्री गजाननाची प्रज्ञा ही मानवी बुद्धीला अतीन्द्रिय शक्ती प्राप्त झाल्यानंतरची कोटी आहे.
मानवी बुद्धीचा दैवी प्रतिभेमध्यें समुत्कर्ष म्हणजेच ब्रह्मणस्पतीची किंवा गजाननाची प्रतिभा होय.
ऋतंभरा प्रज्ञा, ‘प्रातिभ’ श्रेणी असें पतंजलींच्या योगसूत्रांत या कक्षेचें नाव आहे.
मानवी बुद्धीच्या जडतेला अतीन्द्रिय शक्तीचा स्पर्श झाल्याब्ररोबर तिच्या ठिकाणीं चैतन्य, दिव्य मांगल्य प्रकट होते.
ब्रह्मणस्पतीची किंवा गणपतीची मंगलमूर्ति हे विशुद्ध, केवळ मांगल्याचें उदाहरण व प्रतिक आहे.
सर्व देवदेवता मंगल आहेत, मांगल्यवाचक आहेत. पण, श्री विनायक हे साक्षात् मंगल-मूर्ति आहेत.
मांगल्याचें तें प्रत्यक्ष ‘दर्शन’ आहे. केवळ ‘मनन’ नव्हे, चैतन्याचें, चित्कलेचें तें स्वयंपूर्ण
व परिपूर्ण बिम्ब आहे.