साधना सूत्रे

जय मंगलमूर्ते!

भविष्यत्कालच्या भाग्यारूढ भारताला व आजच्या किंकर्तव्यमूढ हिंदू जनतेला, स्वत:च्या अंत:सामर्थ्याची स्फूर्ति देणारें आर्यसंस्कृतीचे एक अत्यंत तेज:पुंज प्रतीक म्हणजे श्रीमन्महागणपति होय.

गणांचा, युद्धप्रवण रणधीरांचा जो अधिपती, तो गणपती. 

मानवसमाजाच्या आद्य कविद्रष्टारांनी आपल्या ऋग्वेदीय ब्रह्मणस्पतिसूक्तांत, महायुद्धाची अधिष्ठात्री देवता म्हणून श्रीगणपतीच्या कल्पमूर्तीचा उल्लेख केला आहे.

सार्वजनिक स्वातंत्र्याच्या महन्मंगलाची संप्रािप्त् करविण्याचें दैवी सामर्थ्य श्रीमन्महागणपतीमध्यें स्वत:संसिद्ध असल्यामुळें हें उपास्य दैवत सर्व मंगलावाप्तीचें महाकारण म्हणून आर्यांच्या 

यज्ञसंस्थेमध्यें पुण्याहवाचकत्वानें समाविष्ट झालें आहे.

भगवान् पतंजलींनी क्लेशकर्मविपाकाशयानें अपरामृष्ट, अकलंकित असलेल्या पुरूष विशेषाला 'ईश्वर' 

अशी संज्ञा देऊन त्याच्या ठिकाणीं सर्वज्ञबीजाची कल्पना केली आहे आणि त्या परम ईश्वराचें 

वाचक ओंकार स्वरूप किंवा प्रणव मंत्राची शब्दमूर्ति असल्याचा निर्णय दिला आहे. 

क्षात्रतेज व ब्राह्मबीज, सार्वजनिक स्वातंत्र्य, वैयक्तिक मोक्ष या दोन्ही ध्येयांचा समन्वय श्रीमन्महागणपतीमध्यें झाला आहे.

शुंडाविशिष्ट गजानन ही ओंकाराची, प्रणवाची स्थूल-विकृत नव्हे-आविष्कृति आहे. प्रतिनिधित्वानें ही स्थूलमूर्तिं, 'अपूर्वम्, अनपरम्, अनंतरम्, अबाह्यम, अस्थूलम्, अनणु, अदीर्घम, अह्रस्वम्' अशा 

वेदोपदिष्ट परात्पर परब्रह्माच्या साक्षात्काराचें सहजसुलभ उपकरण आहे.

श्री गणेशसंप्रदायाचें वाङ्मय हा एक अथांग महोदधि आहे: आधुनिक संशोधकांना त्याच्या किना-यावरील एकाददुसरा वालुकाकणच उपलब्ध झाला आहे. गाणपत्यांचें उपासनाशास्त्र ही गुह्याग्दुगुह्यतम अशी प्रतीकविद्या आहे. बहुजन समाजांत या राजविद्येचा आज लोप झाला असला तरी तिचे एकाकी 

प्रतिनिधि कोठें कोठें आढळतात. मला स्वत:ला हरिद्वार येथें व कुंभकोणम् येथें महान अधिकारी गाणपत्यांच्या दर्शनश्रवणाचा लाभ झाला होता.

 

पाश्चात्य संस्कृतीच्या संसर्गानें किंवा उपसर्गानें, भारतीयांची अध्यात्मविद्या लुप्तत्प्राय होऊं लागली आहें. 

गणेशाथर्वशीर्षांतील रक्षामंत्रांत, सर्व बाजूंनीं, वरून, खालून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून, पुढून, पूर्वेकडून व पाठीमागून म्हणजे पश्चिमेकडून माझे रक्षण कर - 'अव पश्चात्तात्'  अशी प्रार्थना उपासक करीत असतो. मला नेहमीं वाटतें कीं, हिंदूमात्रानें 'अव पश्चात्तात्' पश्चिमेकडून, पाश्चात्यांच्या निरधिष्ठान जडवादापासून, हे मंगलमूर्ति आमचें रक्षण कर, अशी प्रार्थना विशेष उत्कटतेनें केली पाहिजे!

पुन: असेंही वाटतें, भारतीयांच्या अध्यात्मनिष्ठेंत अज्ञान, मिथ्याभिनिवेश म्हणजे दंभ, असत्य इत्यादि अनिष्ट छाया किती घनदाट आहेत! त्यापेक्षा प्रामाणिक जडवाद अधिक स्वीकरणीय व उपकारकच ठरेल.

शेवटीं सर्वतो मां पाहि पाहि समंतात्-सर्व बाजूंनीं माझें रक्षण करा, हीच श्री मंगलमूर्तींचे चरणी

प्रार्थना करूं या.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search