साधना सूत्रे

श्रीराम हा श्रीहनुमानाचा अवतार?

श्री हनुमान हे ‘बुद्धिमंतांचे वरिष्ठ’ आहेत असें रामरक्षेत बुधकौशिक ऋषि म्हणतात. जो द्रष्टा असेल त्यालाच ‘लक्ष्य’ गुण दिसू शकतात. श्री हनुमानांचा प्रज्ञागुण बुधकौशिकालाच दिसू शकला. त्यांचा वाच्यगुण सेवावृत्ति हा सर्वांना ठाऊक आहे. सामान्य विचारवंतांना व विवेचकांना श्री हनुमान हे बुद्धिमंतांचे वरिष्ठ आहेत ही गोष्ट क्वचितच ध्यानांत येते. श्री हनुमान हे सेवक, आज्ञा-कारक निष्ठावंत, एकाग्र, शक्तिमान , गतिमान वगैरे आहेत. ही त्यांची वैशिष्ट्यें व गुणविशेष सर्वांना मान्य आहेत. पण ते प्रकृष्ट प्रज्ञेचे महर्षी आहेत हा सिद्धांत सहज लक्षांत येणारा नाहीं. त्याचें आकलन व्हावयास बुध-कौशिकच हवा. श्री हनुमान यांचा योग म्हणजे सेवा-योग. सेवाधर्म: परमगहनो योगिनामप्यगम्य:। योग्यांना अगम्य असणारा असा हा ‘योग’ आहे. ‘सेवा’ म्हणजे योग; योग म्हणजे एकात्मता निष्पन्न करणें किंवा होणें. सेवा शब्दांत ‘सेव’ हा धातू आहे, सेव् धातूचा अर्थ ग्रहण करणें असा आहे. सेवा करणें म्हणजे ग्रहण करणें, ग्रहण करून एकात्मता सिद्ध करणें. अत एव: योग - म्हणजे सेवन किंवा सेवा आणि सेवा म्हणजे योग. सेवा म्हणजे नोकरी, चाकरी, गुलामी हे अर्थ आनुषंगिक परिस्थिति-जन्य आहेत. सेवा शब्दाचा निरुक्तार्थ, मूलार्थ, धात्वर्थ ‘ग्रहण करणे’ असा आहे. ईश-सेवा म्हणजे ईशभावाचें सेवन, ईशभाव ग्रहण करणें. गुरु-सेवा म्हणजे गुरुत्व-ग्रहण, गुरुत्व-सेवन, गुरूंच्या ठिकाणीं असलेल्या सद्गुणांचे, उच्च भूमिकांचें स्वात्मीकरण. गुरु गुण आत्मसात करणें म्हणजे गुरु-सेवा. श्री हनुमान सेवक होते म्हणजे ग्रहणशील होते, सेवनशील होते. ते काय सेवन करीत? राम-तत्त्व सेवन करीत. श्री हनुमान हे महान् तत्त्वज्ञ होते, द्रष्टे होते, तत्त्व ग्रहण किंवा तत्त्वसेवन करणारे होते. भगवान् श्रीरामचंद्रांनी, स्कंद पुराणांत (ब्राह्मखंड, सेतुमाहात्म्य) श्री हनुमानाला तत्त्वोपदेश केला आहे. “तू तत्त्व-ज्ञानांत स्थिर होऊन रहा. देहभाव सोडून दे. आत्मतत्त्व हें स्वयंप्रकाश आहे. तेंच तुझें स्वभावस्वरूप आहे. हें पहा, शरीराच्या संगतीनें उत्कृष्ट अन्नाची विष्ठा होते, स्वच्छ जलाचे मूत्र होते. शरीराचा जन्म मलांतच आहे; पण तेंच धर्माचें साधन आहे. शरीरांचा क्षय होणारच; पण, आत्म-तत्त्व अविनाशी आहे....” सीतामाउलीनें हनुमानाला विचारलें, “तुझ्या हृदयांत राम कोठें आहेत, तें दाखव. तुला रामप्रभूंनी बक्षीस दिलेल्या व तत्पूर्वी माझ्या गळयांत असणा-या, पृथ्वीमोलाच्या रत्नहारांतली रत्नें तूं फोडून फेंकून दिलींस; कारण, म्हणे त्यांत ‘राम’ नाही. दाखव तुझें हृदय; त्यांत राम नसला तर तेंही फोड पाहूं.” श्री हनुमानांनी स्वत:ची छाती, स्वत:चें हृदय विदीर्ण केलें आणि आंत लकाकणारें रामपंचायतन प्रकट झालें.

त्यांत रामचंद्र, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या पांच व्यक्ती होत्याच; पण, तेथे प्रभू-चरणापाशी स्वत: श्री हनुमानही होते. श्री हनुमानांच्या हृदयाकाशांत चमकणारे दुसरे श्रीहनुमान कोठले? तिथले रामपंचायतन कोठलें? हा सर्व आभास होता काय? नाही. श्री हनुमान हे स्वत: दिक्कालातीत अनाद्यंत महाविष्णु-तत्त्व होत. या अर्थानें राम हा हनुमानाचा अवतार होता. श्री विष्णू, हनुमान हेच राम झाले होते. राम व हनुमान यांचेमध्ये एकच संबंध होता व तो संबंध म्हणजे तादात्म्य-संबंध. राम म्हणजेच हनुमान व हनुमान म्हणजेच राम.

श्री हनुमानानें सेवेचें व्रत घेतलें होतें. व्रत हें स्वेच्छेनें; स्वयंनिर्णयानें घ्यावयाचें असतें. व्रत हें स्वातंत्र्याचे लक्षण आहें; व्रतानें स्वातंत्र्याची सिद्धी व वृद्धी होते. व्रत घेतलें कीं, स्वातंत्र्य मर्यादित होत नाही. तें अधिकाधिक तेजस्वी व वर्चस्वी होत जातें. नियम किंवा मर्यादा दुसर्‍या कोणीही दिल्या, घातल्या, तर मात्र स्वातंत्र्य नष्ट होतें. पण व्रतें, नियम, मर्यादा स्वेच्छेनें घेतल्या कीं स्वातंत्र्य, पणाला, कसोटीला लागतें व दृढतर होतें. श्री हनुमानाने रामाची सेवा केली, राम-तत्त्वाचें सेवन केलें, राम-तत्त्व इतकें पूर्णपणे आत्मसात् केलें कीं हनुमान शिल्लक न राहतां केवळ ‘राम’च उरला होता. रामतत्त्वाचा उदय किंवा अवतार चैत्रा नवमीला झाला पण तेंच तत्त्व, चैत्रा पौर्णिमेला पूर्णतेला आलें. एका कलेचें पूर्णबिंब झालें, एका अंशाचा पूर्णांक झाला. श्री हनुमान म्हणजे समर्पणाचा साक्षात्कार, निवेदनभक्तीचा अखेरचा अवधी, अद्वैत सिद्धीचें पूर्ण प्रतीक.

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search