सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी । - ज्ञानेश्वरी: ४-५२
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “सुखाची गुढी उभारण्यासाठी, विश्वसु्खाचा ध्वज उभविण्यासाठी मी युगायु्गांचे ठायी अवतार घेतो, हे खरे, पण ही गुढी, हा ध्वज मी स्वत: उभारीत नाही. जे सज्जन असतील, त्यांच्याकडून मी हे तोरण उंचवितो. सीमेला पोंचलेला अ-धर्म मी नष्ट करतों. अनेक दोषांनी, प्रमादांनी व पापांनी काळवंडलेली कर्म-लिखितांची बाडेच्या बाडें मी नष्ट करतों.” सज्जन हे धर्मसंस्थापनेची साधनें आहेत, उपकरणें आहेत. हा सिद्धांत, हे सत्य आपल्या सहसा लक्षांत येत नाही. श्रीज्ञानेश्वरमाऊलींच्या प्रतिभेलाच असले गहन-गूढ सिद्धांत प्रतीत होतात. भगवान श्रीकृष्णांनी धर्मसंस्थापना केली, ती देखील काही सत्-जनांच्या, सत्य-धारकांच्या व सत्य-सेवकांच्या द्वारे केली. युधिष्ठिराकडून सत्य पालन करविलें; गोपींकडून भक्तिमार्ग आचरविला, अर्जुनाकडून स्वधर्माचरण घडविले. असत्य व हिंसा यांच्या प्रतिनिधींचे पारिपत्य काही वेळा त्यांनी स्वत: केले व काही वेळा दुसर्यांकडून करविलें. धर्माचे प्रतिष्ठापन मात्र त्यांना केवळ सत्-जनांकडूनच करावें लागलें.
अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। - ज्ञानेश्वरी, ४-५२
आज वर्षप्रतिपदेला आपणांस गुढी उभारावयाची आहे. प्रत्येकाने ही गुढी स्वतंत्रपणे व स्वत: उभारावयाची असते. धर्म प्रतिष्ठेला, जागतिक शांतीला, मानवी संस्कृतीच्या अभ्युदयाला, निदान आज तरी सत्-प्रवृत्तींची अतीव आवश्यकता आहे. धर्म-संस्थापना ही एकदां करावयाची नसते; एकदां करून थांबवावयाची नसते. धर्म-संस्थापनेची प्रक्रिया अ-खंड, अविरत, अ-व्याहत सुरू असते. ईश्वराला देखील एकापेक्षा अधिक अवतार घ्यावे लागतात. याचाच अर्थ धर्म संस्थापना एकदां करून ती सोडून देता येत नाहीं. सत्-प्रवृत्तींचा उद्भव व उत्कर्ष सारखा व्हावा लागतो. जीवनभर, क्षणाक्षणाला आपण गुढी उभारूं या. स्वत:मधली आणि इतरांमधली सत्-प्रवृत्ती उंचवूं या. आपल्या अंतरंगात श्रीरामप्रभूंचे जन्म क्षणाक्षणाला घडवून आनंदोत्सव करू या. आपल्या भोवतालचे संत सज्जन हेच श्रीरामप्रभूंची रूपडीं होत. सज्जनांचे ठिकाणी रोकडा देव भेटतो. तीर्थांत केवळ धोंडा-पाण्याची भेट. सज्जन म्हणजे कोण, धर्म-संस्थापनेचे उपकरण ते कसे असतात, अवतार-प्रक्रियेचे मर्म काय, या तिन्ही प्रश्नांचे एकमात्र उत्तर महाराष्ट्र संस्कृतीला लाभले आहे. श्रीज्ञानेश्वरमाऊली हेच ते उत्तर होय. धर्म-प्रतिष्ठापनेची सनातन साधने असणारे हे ‘सज्जन’ हाच श्री ज्ञानेश्वरमाऊलीचा नेहमीचा चिंतन विषय असे. ज्ञानेश्वरीचें पसायदान हेंच मागत आहे कीं, सर्वांना, सर्वकाली हे सज्जन सोयरे व्हावेत. हे सज्जन कसे असतात.
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणिचें गांव ।। बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।। चन्द्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा ‘सज्जन’ । सोयरे होतु ।। - ज्ञानेश्वरी
नव्या संवत्सराचे नाव ‘क्रोधी’ असे आहे. या संवत्सरांत ‘मूल प्रकृती’ पेक्षा अ-नैसर्गिक विकृती अधिक उद्भवणार आहेत. या वर्ष प्रतिप्रदेस कलियु्गाच्या एकंदर चार लक्ष बत्तीस हजार वर्षांपैकी, पांच हजार पासष्ट वर्षें पूर्ण झालीं. अजून चार लक्ष सव्वीस हजार नऊशें पस्तीस एवढीं वर्षें शिल्लक आहेत. कलियुगांचे वैशिष्ट्य गती हे आहे. आजच्या विज्ञान युगाने हें सिध्द केले आहे. या युगांतल्या कोणत्याही कृतीला अभूतपूर्व गतिमत्ता आहे. कृत, त्रेता व व्दापर युगांत एवढी गतिमत्ता कधीच नव्हती. या युगांतल्या सर्व विभूती, सर्व महापु्रूष, सर्व अवतार या गतीचा, गतिमत्तेचा अधिकांत अधिक उपयोग करून घेण्याच्या प्रयत्नांत असतात. कलियुगांत रामनामाला जो वेग, जी गती आहे, ती कृत, त्रेता, द्वापार युगांत नव्हती; म्हणून आपण, रामनामाची गुढी अंत:करणांत, आज, आत्ता व कायमची उभारू या.
ॐ ॐ ॐ