आत्मौपम्य - उपनिषद् संत-संस्कृति व पंत-संस्कृति ‘मी’ हा अनुभव स्वत:सिद्ध व स्वयंपूर्ण आहे. तत्त्वत: 'मी` ला कोणतीही विभक्ती लागत नाही. कोणतीही विभक्ती अथवा प्रत्यय लावण्यापूर्वी 'अनुमान` या प्रमाणाचे उपयोजन अंतर्भूत असते. ‘मी’ ला होणारे 'तू` व 'तो` या पदार्थांचे ज्ञान अनुमानावर आधारलेले आहे. 'मला` आंबा गोड लागला, म्हणजे `तुला' व 'त्याला` गोड लागलाच पाहिजे, असे निश्चयात्मक विधान करता येत नाही. सामान्यत: असा अध्यारोप आपण नेहमी करीत असतो. समाज-शास्त्र म्हणजे सामूहिक जीवनाचे शास्त्र, या अध्यारोपावर आधारलेले आहे. समाजशास्त्राची गृहित कृत्ये, तात्विक सिद्धान्त व मूल्य-निर्णय हे अनुमानावर अधिष्ठित आहेत. भौतिक शास्त्राची मूलतत्त्वे देखील अनुमानप्रधान व उपमान प्रधान असतात. 'पर्वतो वन्हिमान्, धूमात्। यथा महानसे!' स्वयंपाक घरांतून धूर निघतो, तेथे अग्नि असतो. तसा पर्वतामधून ज्या अर्थी धूर निघत आहे, त्या अर्थी तेथे अग्नि असला पाहिजे. हे 'अनुमान` या प्रमाणाचे, सुप्रसिद्ध उदाहरण आहे. अनुमानाचे सूक्ष्म विश्लेषण केल्यास त्यांत उपमा किंवा उपमान कसे अन्तर्भूत होते, ते दिसून येईल. वरील उदाहरणांत वन्हिमान् पर्वत व वन्हिमान् स्वयंपाकघर यांमधील साधर्म्य अनुमान क्रियेस आवश्यक आहे. साधर्म्य म्हणजे समान- धर्मत्व:. उपमेला समान-धर्मत्व हेच कारण आहे. कमल व मुख, कमल व चरण, कमल व नेत्र, कमल व हस्त, यांच्यामधील साधर्म्य लक्षांत घेऊन त्यांना संदर्भाप्रमाणे कमलाची उपमा दिली जाते. 'मी आणि तू समान-धर्मा आहोत, आपल्यामध्ये धर्म-साम्य आहे व साम्य-धर्मही आहे.` हा सिद्धांत पारस्पर्श- संबंधाच्या मुळाशी असतो. 'मी` तसा 'तू` व 'तू` तसा 'तो` ही भावना अनुमानाने व उपमानाने सिद्ध केली जाते. आत्मौपम्याला प्रत्यक्ष प्रतीतीचा आधार नाही. हा भाव प्रथम अनुमान, उपमान यांच्या द्वारा आविष्कृत होतो. आत्मतत्त्व हे एकमात्र असल्यामुळे, तसेच विभु म्हणजे सर्वव्यापी असल्यामुळे; त्याची उपमा द्यावयास तत्सम असा दुसरा पदार्थ हवा. तो अस्तित्वांत नसल्यामुळे 'आत्मौपम्य` हा शब्द एका विशिष्ट संदर्भात व संकुचित अर्थाने घेतला पाहिजे. शिवाय उपमा ही अंशव्यापी असते. तेजस्वितेपुरतेच चन्द्राचे मुखाशी साम्य असते. मुखावर नाक आहे व नाकाला शेंबूड येतो. मुख व चन्द्र सारखे आहेत. म्हणून चन्द्राला शेंबूड येतो असा मुख व चंद्र यांच्या साम्याचा अर्थ नव्हे, हे स्पष्ट आहे. संदर्भाच्या वर्तुलात, लक्ष्यार्थाने मर्यादित व गुणविशेषाचा कोन करून उपमा साधावयाची असते. आत्मौपम्य बुद्धित या तिन्ही विशेषांचा अंतर्भाव आहे. संदर्भ, लक्ष्य व गुणविशेष. हे ध्यानांत घेतले म्हणजे आत्मौपम्य बुद्धिचा विनियोग कसा करावा, हे स्पष्ट होईल. सर्वांचे आत्मतत्त्व एक आहे, एकमात्र आहे. हा मुख्य सिद्धान्त लक्षांत घेऊन व ठेवून जे नीतीशास्त्र उभारले जाते. ते केवळ समाजनिष्ठ नीतिशास्त्राहून काहीसे भिन्न असते. आधुनिक पाश्चात्य नीतिशास्त्रांत वैदिक आत्मतत्त्वाचा अभाव आहे. व त्यामुळे ते काहीसे मर्यादित व बहिर्मुख आहे. जातमात्राच्या ठिकाणी एक आत्मतत्त्व आहे व त्यामुळे अद्वैतसिद्धी ही 'साधावयाची` नसून ती स्वत:सिद्ध व स्वयंसिद्ध आहे. उपमा किंवा उपमान या प्रमाणाला साधर्म्य व वैधर्म्य या दोहोंचीही आवश्यकता आहे. सर्वथैव समान असणाऱ्या व्यक्ती व वस्तू यांमध्ये उपमेचा विनियोग होऊ शकत नाही, कारण उपमेय वस्तू 'दोन` राहूच शकत नाहीत. त्या 'एक` च होतात. म्हणून उपमेला वैधर्म्य आवश्यक आहे. शिवाय कोणत्याही दोन वस्तूंमध्ये संपूर्ण वैधर्म्य असल्यास त्यांना एकत्र कसे आणता येईल? म्हणून साधर्म्य व वैधर्म्य दोन्ही जेथे असतील, तेथेच उपमा शक्य आहे. दोन जीवांमध्ये आत्मतत्त्व एक असते. हे साधर्म्य व तदितर सर्व गोष्टींत गुणविशेष असतात, हे वैधर्म्य. वैधर्म्य म्हणजे विविध विरोधक धर्मांचे अस्तित्व. जीवा जीवामध्ये कितीही भेद, गुणविशेष असले, तरी त्यांच्या ठायीचे आत्मतत्त्व एक असते, एकमात्र असते. या सिद्धान्ताची ओळख असणे, याचे नाव आत्मौपम्य - बुद्धि! जीझसने शिकविलेला 'शेजाऱ्यावर प्रेम कर.` 'Love thy neighbour' हा आत्मौपम्य बुद्धीचाच एक स्थूल विनियोग आहे. तसे पाहिले तर, आत्मौपम्य बुद्धीशिवाय मानवमात्राचे मानसिक जीवन अशक्यच होईल. आपली सुखदु:खे, आशानिराशा यांची गंगोत्री ही आत्मौपम्य-बुद्धी आहे. पण सामन्यत: दु:ख, निराशा, दारिद्य्र, दैन्य यांच्याबाबतीत आपली आत्मौपम्य बुद्धी आपण मोठ्या दक्षतेने मालवीत असतो. अंतरंगात ती ज्योत तेवत असतेच. एकाकी व्यक्तीला दु:ख, दैन्य व दारिद्य्र यांचा बोधही होणार नाही. त्याची सिद्धी देखील उपमेनेच होत असते. ती आत्मौपम्याने करणे, हे सज्जनांचे, संतांचे लक्षण आहे. कुत्र्याने कोरडी भाकरी खाऊ नये, म्हणून तुपाची वाटी हाती घेऊन त्याच्यामागे पळणाऱ्या श्रीसंत नामदेवाच्या ठिकाणी आत्मौपम्य बुद्धी किती तीव्रतेने जागृत असली पाहिजे! सह-वास, सह-भाव (co-existence) इ. वृत्तींच्या मुळाशी आत्मौपम्य बुद्धी हवी. ती असेल तर विश्व-शान्ती सहजासहजी सिद्ध होईल. ती नसेल तर अहमहमिका, चढाओढ, वर्गयुद्धे व महायुद्धे तितक्याच सहजतेने उत्पन्न होत राहतील. कारण ती व्हावयालाही एकत्रता हवी, सहभाव हवा, साहचर्य हवेच. पण त्याच्या मुळाशी आत्मौपम्य बुद्धी नसते. `तुझे व त्याचे दु:ख, दैन्य व दारिद्य्र हे माझेही दु:ख, दैन्य, दारिद्य्र आहे.' 'तुझी व त्याची क्षुधा, तृषा ही माझीही क्षुधा, तृषा आहे.` ही भावना वास्तविक अगदी सहजप्राप्त् आहे. कारण सर्वांचे आत्मतत्त्व एक आहे. पण इतरांचा देश, वंश, जाति ही निराळी म्हणून ते सर्व माझ्याहून संपूर्णपणे निराळे, अशी अतिशयोक्ती व अतिव्याप्ती आपण करून राहतो. इतर व्यक्ती निराळया आहेत, हे खरे, परंतु त्या संपूर्णत: निराळया नाहीत. काही अंशी निराळया आहेत. पण तत्त्वत:, मुख्यत: व मूलत: सर्व जीव एकात्म आहेत, हे आपण विसरतो. तुला मिळेल, तर मला मिळणार नाही, असा विचित्र शोध, आपल्या अंहंकाराने किंवा संकुचित स्वार्थाने आपण लावून बसतो. हवा, पाणी, प्रकाश, अगदी त्याचप्रमाणे समृद्धी, सौख्य, शान्ती या गोष्टी सर्वांना मिळण्याची सुतराम् शक्यता आहे. ही शक्यता आपल्या बुद्धीस प्रतीतच होत नाही. विद्यमान संस्कृती ही एक विशाल विकृती आहे; संस्कृती नव्हेच. कुटुंबसंस्था ही अहंकार व संकुचित स्वार्थ कमी करण्यासाठी आहे. आत्मतत्त्वाच्या एकतेचा प्रत्यय साक्षात् आणून देण्यासाठी आहे. कुटुंबसंस्थेप्रमाणेच ग्रामसंस्था, राष्ट्रसंस्था व संस्कृतीसंस्था यांचा हेतू व परिणाम, एकात्मतेचा प्रत्यय यावा, एवढाच आहे. प्रत्यक्षात आजच्या विकृत संस्कृतीत मात्र या चतुर्विध संस्थांचा परिणाम अहंकार व स्वार्थ अधिकाधिक भयानक करण्यात झाला आहे. याचे कारण गौण व अमुख्य असणारे भेदविशेष, यांच्यावर अधिक भर देण्यांत येतो व मुख्य आणि महत्त्वाच्या अशा अधिष्ठानभूत एकात्मतेचा विसर पडतो. 'स्व` मध्ये, 'स्व` अर्थामध्ये - स्वार्थामध्ये इतर सर्वांना विरजून टाकणे; त्यांना नष्टप्राय करणे ही आसुरी वृत्तींची कृतींची पन्त-संस्कृती होय. 'स्व` च्या ठायीचे आत्मतत्त्व इतरांच्या ठायी आहे, म्हणून 'स्व` ला दुसऱ्या जीवांत समर्पण बुद्धीने विनियोग करणे, त्यांचे दु:ख, दैन्य आपले समजणे, 'स्व` मध्ये त्यांची हत्या करण्यापेक्षा 'स्व` चा त्यांच्यासाठी संपूर्ण नैवेद्य दाखविणे, ही संत-संस्कृती होय. पंत-संस्कृती ही पैशाची, प्रतिष्ठेची व पराक्रमाची पूजक असते. संत-संस्कृती ही सत्याची, सौजन्याची व सौन्दर्याची सेवक असते. ....