तेरा माजी तीन-सात साक्षात्कार। आठवा निर्धार असीपद।।१।। नवमापासूनि दशमाचे अन्ती। बारावा निश्चिती योग जाणा।।२।। प्रथम अक्षरी मध्यमा सूचना। नाम नारायणा अन्तकाळी।।३।। नामा म्हणे तुम्ही नाम स्मरा मनी। वैकुंठ भुवनी वास होय।।४।। नाम-जपाचे असाधारण महत्त्व सांगताना श्रीनामदेव ‘श्रीराम जयराम जय जय राम’ य तेरा अक्षरी मंत्राची महती सांगतात. “वैकुंठपदाच्या प्राप्तीसाठी, लाभासाठी तुम्ही तेरा कोटी मंत्र जप करा. ज्यांचा तीव्र संवेग आहे, त्यांना पहिल्या तीन कोटी जपानंतर साक्षात्कार होईल. तुलनेने ज्यांची तीव्रता कमी आहे, त्यांना सात कोटी जपा नंतर अनुभूती येईल. “आठ कोटी जपानंतर निश्तितपणे ‘तत् त्वम् असि’ - ‘ते ब्रह्म तूंच आहे’, या दिव्य सिद्ध अनुभूतीचा प्रत्यय येईल. “नऊ कोटीपासून दहा कोटी जपापर्यंत आणि पुढे तर बारा कोटि जपापर्यंत योगसिद्धि होतेच यांत संशय नाही. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या तेरा अक्षरी मंत्राचे पहिले अक्षर ‘श्री’ हे आहे. नाम-जपांत केवळ वैखरींतून निघालेले अक्षर मंत्र-साधनेत उत्कटता आणू शकत नाही. हे प्रथमाक्षर मध्यमेतून निघावे. मध्यमा हे हृदय, प्रेमाची भक्तीची भावना हृदयांतच उदित होते. तेव्हा ‘श्री’ हे पहिले अक्षर नामजपाच्या वेळी हृदयाच्या अंतर्हृदयांतून निघाले पाहिजे. ‘हृंदिस्था मध्यमा ज्ञेया।’ अशी मध्यमेची व्याख्या आहे. “अंतकाळी नारायणाचे नाम तुम्हांला भवसागराच्या पार नेईल, तुम्हाला तारील. “असे नामस्मरण तुम्ही करा. मनांत उत्कटतेने नामजप करा. ते नाम तुम्हाला वैकुंठातील निवासाची प्रतीति देईल, अमृतानुभव देईल.” *****