मर्यादित, निमूळत्या निकषांनी विभूतींचे लोकोत्तर चारित्र्य मापण्याची लाज वाटू लागते. त्या अवस्थांचे हळुवार पद्धतीने केले आहे हे ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठकांच्या सहज लक्षांत येईल.
साधकावस्थेत पहिले दुसरे पाऊल पडल्याबरोबर आपण ‘सिद्ध’ आहोत, साधक नाही, असा आभास अहंविशिष्ट जीवांना उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व आभासांचा, संशयाचा, विपर्ययांचा, निरास करण्यास ज्ञात्यांची संगति, महापुरूषसंश्रय हा एकच उपाय आहे.
श्री नाथ संप्रदायात गुरूशिष्य संबंधाचे एक उत्क्रांत, विकसित स्वरूप आढळात येते.
मानवी संस्कृतीच्या इतिहासांत गुरूशिष्य संबंधाशिवाय, उज्ज्वलोत्तम घटना संभवल्याच नाहीत.
श्री आदिनाथ-मत्स्येंद्रनाथांपासून, निवृत्तीनाथ-ज्ञाननाथांपर्यंत अविच्छिन्नपणे प्रसृत व प्रगत झालेल्या श्री नाथपंथातील राजगुह्ये व विद्याबीजे यांचा प्रफुल्ल फुलोरा श्रीज्ञानेश्वरींत प्रकट झालेला आहे.
अर्थात या प्रकटनांत काही संकेत आहेत. उदा. - ज्ञाननाथांनी श्री ज्ञानेश्वरीच्या काही अध्यायांच्या प्रारंभी जी भव्य-सुंदर गुरूपूजा बांधली आहे, त्या गुरूपुजेत नाथपंथातील श्रीगुरूमार्गाचे, उपासनांचे व उपासकांचे, नाथपंथातील गुरूशिष्य संबंधाचे रहस्यविशेष प्रकट केले आहेत.
शिष्याची स्वसमर्पणाची कोटि व गुरूदेवांच्या प्रबोधक व विमोचक ज्ञानकृपेची कोटि - हे दोन बिंदू दोन समांतर रेषांवर अगदी समान अंतराने सरकत असतात.
श्री गुरूमार्गात शिष्याने स्वत:च्या नामरूपाचे, देहाचे , अंत:करणाचे व अंत:करणचतुष्टयाचे - अहंकार, बुद्धि, मन व चित्त यांचे - सर्वस्व समर्पण करणे आवश्यक असते. बुद्धीचे व अहंभावाचे समर्पण करताना शिष्याच्या जीवभावाला कमालीचे क्लेश होतात. या अवस्थेत आत्मवंचना अत्यंत प्रभावी ठरत असते.
शिष्याला आपल्या तत्वनिष्ठेची व साधनेच्या यथार्थतेची इतकी नि:शंकता वाटते की अद्यापिही अंतिम समर्पणाचा अभाव असावा हे श्री गुरूंचेच दौर्बल्य होय. कोप, असूया, लोभ, ममत्व इत्यादी क्षुद्र भाव श्री गुरूंना देखिल सुटले नाहीत. असे आत्मवंचक दुराग्रह त्या शिष्याला पदच्युत करू पाहतात. गुरूभावनेचा, गुरूसंपर्काचा संपूर्ण त्याग करावा असे त्याला वाटू लागते. त्याचे मन आंदोलू लागते.
अंशसाधनेने सतेजलेल्या बुद्धीचे अस्त्र, अहंकाराच्या हातात मिळाल्यामुळे, आत्मवंचक आत्मरोचक आभास उत्पन्न करणे अहंकाराला सहज शक्य होते. आपण कुणी अनन्य साधारण साधक, असामान्य अभ्यासक आहोत म्हणजे आपण जागतिक, सार्वत्रिक नियमांना केवळ अपवादभूत आहोत, आपल्या ठिकाणी काही अपूर्व, अनुपमेय गुणसंपत्ती आहे, असे बहुधा प्रत्येक साधकाला वाटते.
वस्तूत; सर्वसामान्यच असणार्या साधकाला स्वत:वर, स्वत:च्या असामान्यतेबद्दल अविचल निश्चिती असते. स्वत:च्या लोकविलक्षण अधिकाराबद्दल तो सर्वथैव नि:शंक असतो. साधकाचा हा भ्रम इतका नैसर्गिक रोचक व समाधानदायक असतो की, सिद्ध सद्गुरूंच्या मातृनिर्विशेष प्रेम-वृत्तीला त्या भ्रमाच्या बुद्बुदाचे विसर्जन करणे अतीव दु:खद होते.
(माऊली फेब्रुवारी १९५९)