तुका झालासे कळस - माऊली, डिसेंबर १९७९
तुम्ही कळस झालात - आणि म्हणून, सह्याद्रीवर तळपणार्या बारा आदित्यांच्या सोनसळ्या प्रथम तुम्हाला भेटतात.
तुम्ही कळस - महाराष्ट्राचे, महाराष्ट्र-संस्कृतीचे, भागवत-पंथाचे व नारायणीय-धर्माचे तुम्ही कळस आहात!
महाराष्ट्राची अध्यात्मलक्ष्मी स्वत:चा श्वास ज्या कळशीमध्ये घुमविते, त्या कलशामध्ये तिचा फुंकार निनादतो, ती कळशी, तो कळस तुम्हीच आहांत.
महाराष्ट्रीय जनतेसाठी अनंत अवकाशांतून अवतरणारी अ-शरीरिणी वाक्, प्रथम ज्या चित्कुंभांत, ज्या चैतन्य-कलशांत निविष्ट होते. तो चैतन्य-कलश तुम्हीच आहात!
तुमच्या अवतारानंतर महाराष्ट्राला मिळालेली स्फ़ूर्ति आणि गति, संगति आणि संस्कृति तुमच्या ‘अभंग’ नेतृत्वाचा परिणाम आहे. फळासाठी मूळ तसा कळसासाठी पाया, हे खरे ना?
तुमच्या उदयासाठी अगस्ति ऋषींनी विंध्याद्रीला प्रणत ठेवला, उठू दिला नाही, सर्व-सर्व इतिहास-पूर्व महाराष्ट्रीय व दाक्षिणात्य संस्कृती आणि यच्च्-यावत् ऐतिहासिक घटना, जणू काय, एकाच उद्दिष्टासाठी घडत होत्या. ते उद्दिष्ट म्हणजे हा सुवर्ण कलश उदित व्हावा, तुमचा अवतार व्हावा, तुमचे श्वास येथे सांडावेत.
आपला पुण्य-जन्म सु-वर्णेच्या, ‘कनका’ आईच्या पोटी झालाही गोष्ट देखील अर्थ-सूचक नव्हे का?
हा सोन-कळस उध्वविण्यासाठी महाराष्ट्राची मायसंस्कृती तीन सहस्त्र संवत्सरे राबत राहिली होती. श्री ज्ञानदेवांनी अलीकडे ‘पाया रचिला’ पण त्या पायाखालची मनो-भूमी, भोवतालचा सर्व परिसर इत्यादी गोष्टी तेथले क्षेत्रपती, दिक्पाल व विश्वेदेव किती युगे घडवीत असतील ते कोणास ठाऊक!
आपली भक्तीरसाने फेसाळणारी व ज्ञानशक्तीने खळखळणारी अभंग-भागीरथी ही, त्रि-कालांच्या कक्षेबाहेर जाऊन, एक स्वयंप्रकाश व चिर-स्थायी अशी ईशशक्ती झाली आहे.
आपली अभंग-वाणी ही साक्षात् परा-विद्या आहे. त्या विद्येत अवतीर्ण झालेली सनातन तत्वे महाराष्ट्राला, किंबहुना अखिल मानवतेला एखाद्या दीपस्तंभाच्या रांगेप्रमाणे, प्रकाशकिरणांचे चिरस्थायी झोत अव्याहत पुरवीत राहतील.
धर्मरक्षणासाठी तुम्ही आटी केलीत. वाचेने वेद-नीति सांगत व हाताने संत-कृती करीत, तुम्ही वैदिक द्रष्ट्यांचीच परंपरा जागृत ठेवलीत व अमर केलीत.
तुम्ही पुराणे व इतिहास यांचा सखोल अभ्यास केलात - ‘पुराणींचा इतिहास! गोडरस सेविला।।’
भर्तृहरीचे शतक-द्वय (नीतिशतक व वैराग्यशतक) आपण आत्मसात केले होते व आपल्या रसाळ व तेजाळ शब्दगंगेत ते जागोजागी प्रतिबिंबित झाले आहे. नीतिशतकांतला ४१ वा श्लोक व जोगकृत गाथेतील १२४ वा अभंग (ऐसा हा लौकिक -) यामधले साम्य निर्णायक आहे. त्याचप्रमाणे,
क्षमाशास्त्र जया नराचिये हाती।
दुष्ट तयाप्रती काय करी।।१।।
तृण नाही तेथे पडिला दावाग्नि।
जाय तो विझोनी आपसया।।२।।
क्षमा-शस्त्रं करे यस्य दुर्जन: किं करिष्यति।
अतृणे पतितो वन्हि: स्वयमेवोपशाम्यती।।१।।
आपला संस्कृत भाषेचा अभ्यास किती खोल होता हे यावरून स्पष्ट होत आहे. भागवत व गीता यांचे अध्ययन तुम्ही चिकित्सक पद्धतीने केले होते. वेदांतर्गत सिद्धांत, महावाक्ये, उपनिषदे, दर्शने सर्व सर्व काही आपण अभ्यासिले होते.
स्वभावत: ज्ञानयोगी असूनही आपण, अज्ञानी जीवांच्या आपुलकीसाठी, तादात्म्यभावासाठी ज्ञानाची भरजरी शालजोडी केव्हाही अंगावर मिरवली नाही, नेहमी तिला बाजूलाच ठेविलेत.
भारतीय अध्यात्मशास्त्रांतील लोकशाही, भगवान व्यासानंतर तुम्हीच पुन:श्च प्रकट केलील.
आपली अभंग-संहिता हा एक सर्वदर्शन संग्रह आहे. संपूर्ण मानवी जीवनाचे अंग-प्रत्यंग अणुरेणु, किरण-किरण त्यांत प्रकट झालेले आहेत. त्या संहितेत द्वैत-वाद आहे, अद्वैत वाद आहे, विशिष्टाद्वैत, शुद्ध द्वैत प्रत्येक प्रवाद व दृष्टीकोन त्यांत आहे.
नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव।
मी भक्त, तू देव ऐसे करी।। - (३३०८ - जोग गाथा)
यांतले शुद्धद्वैत व
मीचि मज व्यालो । पोटा आपुलिया आलो। - (३९४४ - जोगगाथा)
यांतले शुद्ध अद्वैत - दोन्हीही आपण सारख्याच तडफेने व निग्रहाने प्रतिपादिता.
निरंत नभो-वितानंत कोणत्याही पाखरांने आपले पंख पालवावेत. आपल्या असीम, अथांग व अमोघ अशा अभंग-संहितेत प्रत्येक भूमिकेला, प्रत्येक प्रवादाला, प्रत्येक मतविशेषाला आश्रयस्थान आहे. त्या त्या प्रवादाचे, मताचे, अनुभवाचे यथार्थ मूल्यमापन आपण केलेले आहे. प्रत्येक भूमिका आपण स्वत: अनुभवून, भोगून, सोसून व पारखून नंतर तिचे महत्त्व व स्थान निश्चित केले आहे.
तुमची स्वत:ची तात्विक भूमिका कोणती, आपण अद्वैतवादी की द्वैतवादी, आपल्या गूढवादाची जाति, रंग व आकार कोठला आहे, आपण ग्रीक, रोमन किंवा युरोपीय गूढवाद्यांच्या किती पुढे अथवा ‘वर’ गेले आहात याची मिमांसा करीत बसण्याचा मोह अनेक अहंविशिष्ट पंडित-प्रवरांना होतो.
पण आपण सर्वतो-मुख, सर्वत: श्रुती, सर्वतो-हृदय आहात. आपले तत्वज्ञान मर्यादित नाही, त्याला नामनिर्विशेष नाही. पाटी नाही व पत्ता नाही.
आपले तत्वज्ञान साक्षात् जीवनबिंबाप्रमाणे स्वयंपूर्ण, स्वयंप्रकाश व स्वयंसिद्ध आहे.
तुकोबा तुम्ही आमची माऊली आहात, तुम्ही महाराष्ट्राची व मानवतेची माऊली आहात.
माऊलीच्या या विशेष अंकात किंवा अंकावर पहुडलेल्या मराठी मनाला आपण अमृताचा पान्हा पाजून अमर करावे ही प्रार्थना.
तू माझी माऊली। तू माझी साऊली।
पाहतो वाटुली। तु का मा ई।