मनुष्य स्वभावत:च पूजक वृत्तीचा आहे.
- पश्यन्ती (१४) (रोहिणी सप्टें. १९६३)
मनुष्य हा स्वभावत: पूजनशील आहे. पूजा करणे हा त्याचा स्वभाव आहे. मन् या धातूचा अर्थ ‘पूजायां’ असा आहे. मन् धातूचा, मनन करणे हा नंतरचा अर्थ. मानवाने अगदी पहिला विचार केला असेल त्या क्षणी त्याच्या अंत:करणात पूजनाची वृत्ती उत्पन्न झाली. पूजकता ही मनुष्याची सहज-प्रवृत्ती असण्याचे कारण, तो स-अंत, सांत आहे. मी मर्यादित आहे, सांत आहे, अनंत नाही याची जाणीव स्पष्टतया प्रतीत झाली तरच मनुष्य विचार करण्यास प्रवृत्त होतो. मनन म्हणजे विचार करणे. मननाच्या पहिल्या क्रियेमध्ये सांततेची व पूजकतेची प्रतीती आहे.
एका पाश्चिमात्य तत्वज्ञाने म्हटले आहे की, Damned is he, who has nothing sacred in life. - “ज्या व्यक्तीला कोठेही, काहीही पूज्य, शिरोधार्थ, आदरणीय राहत नाही, त्या व्यक्तीला ध्येय-दृष्टी नाही. त्या व्यक्तीला प्राप्य अशी अवस्था नाही. कर्तव्य अशी कृती नाही.” आपणांस जे पूज्य वाटते. त्याचाच अनुकार आपण करू शकतो. जी अवस्था, जी मर्यादा आपणांस आज उपलब्ध नाही व उद्या ही प्राप्त व्हावी असे वाटत असते, त्यालाच आपण ध्येय म्हणतो. ध्येयनिष्ठा, पूजकता, विकास उन्नती या व एतद्सदृश सर्व प्रवृत्तींचे उगम मनुष्यस्वभावाच्या मूल-प्रकृतींत आहेत.
दोषैक दृष्टि, निंदा, निषेधकता या सर्व विकृती आहेत. प्रकृती नव्हेत. मानवी मूल- प्रकृतींत अंतर्भृत व अनुस्यूत असल्यामुळे, देव, ईश्वर या कल्पनेची मानवाच्या विकासाला अपरिहार्य अशी वस्तुता आहे. क्षुधा आहे हे कोठे तरी, कसले तरी अन्न असल्याचे प्रमाण होय. पदार्थांना अन्न-त्व देण्याची शक्ती क्षुधेमध्ये आहे. अगदी तसेच, मानवमात्राचा, पूजकता हा स्वभाव असल्यामुळे देवतांची अनेक स्वरूपे, अनेक आकार असण्याचे कारण म्हणजे मानवी मनाचे म्हणजेच पूजकतेचे विविध प्रकार होत. मन् धातूचा अर्थ पूजा करणे, विचार करणे, असा असल्यामुळे मानवमात्राचा सहज-विचार हा नेहमीच पूज्य मूल्यांचा, उदात्त ध्येयांचा आविष्कार व अनुकार करणारा असतो.