साधना सूत्रे

हजरत मुहम्मद पैगंबरप्रेषित व भगवद्‍भक्त

(१) ‘इस्लाम’ शब्दाचा अर्थ शान्ति असा आहे. मूलत: मुहम्मद पैगंबराचा इस्लाम धर्मपंथ शांति तत्त्वाचा पुरस्कार व प्रचार करण्यासाठीच प्रकट झाला.

 

सत्याच्या व सत्यधर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी बहुतेक सर्व धर्मात शस्त्र-संपात झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात उपलब्ध आहेत. मुहम्मदांनाही काही युद्ध प्रसंग टाळणे शक्य झाले नाही. तथापि त्यांचे वैयक्तिक जीवन संत-सहज प्रेमळपणाचे व शांतिधर्माचे उत्कृष्ठ प्रतीक होते. टोर अँड्रीसारख्या तौलनिक दृष्टीच्या अधिकारी जर्मन धर्मचिकित्सकाने मुहम्मद पैगंबरांची सत्यनिष्ठा व शांत-वृत्ती आदराने उल्लेखिली आहे.

(२) 

मानवी इतिहासाच्या व संस्कृतीच्या विकास-क्रमाला विशेषत्वाने गतिमान करणार्‍या महा-मानवांना अवतार अशी संज्ञा आहे. ‘अव’ म्हणजे खाली, पृथ्वीतलावर, ‘तर’ म्हणजे आलेले, उतरलेले. अव+तृ या संस्कृत मूल धातूंपासून ‘अवतार’ या शब्दाची विष्पत्ती आहे. परमेश्वर हा वरती आकाशात चिरस्थिर आहे, विशिष्ट हेतूसाठी तो पृथ्वीतलावर अवतीर्ण होतो, अशी एक कल्पना बहुतेक सर्व धर्मग्रंथात आढळून येते. वरती म्हणजे उर्ध्व दिशेला हे शब्द लाक्षणिक अर्थाने घ्यावयाचे आहेत. भौगोलिक किंवा स्थूल अर्थाने वरती म्हणजे ढगाच्या पलीकडे आकाशपलीकडे असा अर्थ घेणे उचित ठरणार नाही. ‘वरती’ म्हणजे विकास-क्रमाच्या अत्युच्च कोटीच्या संदर्भात. सुष्टांची सु-रक्षा व दुष्टांचे पारिपत्य हा हेतू अवतार धारणेला कारणीभूत असतो. भगवान कृष्ण, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे, मुहम्मद पैगंबर हे ईश्वराचे अवतार होत. कुराणाच्या परिभाषेत मुहम्मदांना ‘अवतार’ अशी संज्ञा नाही. ईश्वराचे ते ‘प्रेषित’ आहेत. अवतारी पुरूषाच्या जन्मकाली निसर्गात देखील अ-पूर्व, अनपेक्षित व अद्भुत अशा घटना घडतात. मुहम्मदांच्या जन्मकाली तायग्रीस नदीचे पात्र सहस्त्रगुणित करणारा प्रलयंकर जलप्रवाह एकदम आसपासचे भूप्रदेश गिळंकृत करू लागला. ‘सावा’ या सुप्रसिद्ध सरोवराला मिळणारी नदी उलट दिशेने वाहू लागली आणि सरोवरातले सर्व पाणी शोषून त्या नदीने ते स्वत:च्या उगमाकडे खेचून घेतले. या अद्भूत घटना व ईश्वराचे अवतार यामध्ये कार्यकारणभाव असेल असे सांगण्याचा हेतू नाही. पण या विलक्षण घटना जशा अनपेक्षीत असतात त्याचप्रमाणे अवतारी पुरूषांचे जन्मही अनपेक्षित व अलौकिक असतात.

(३)

इ.स. ५६९ च्या एप्रिल महिन्यांत मुहम्मद पैगंबराचा जन्म झाला असे इतिहासज्ञ मानतात. अवतारी व्यक्तीच्या ठिकाणी एक अढळ-आत्मश्रद्धा आढळते. “मला ईशकार्य करावयाचे आहे. मला मानवांची सेवा करायची आहे. एका महत्कार्यासाठी माझा जन्म झाला आहे. मी देवाचा ‘प्रेषित’ आहे. देवाने मला पाठविलेले आहे. जगाला देण्यासाठी माझ्याजवळ एक संदेश आहे, एक गुपित आहे. ते गुपित प्रकट करण्यासाठी माझे जीवन मला जगावयाचे आहे.” ही धारणा, ही श्रद्धा, ही निष्ठा प्रत्येक अवतारी व्यक्तीत सहज सिद्ध असते. केव्हा केव्हा ही श्रद्धा सुस्पष्ट होण्यासाठी अवतारी व्यक्तीच्या जीवनात काही विशेष घटना होतात. एखादा साक्षात्कार होतो, एखादा देवदूत दिसतो. एखादा नाद ऐकू येतो. एखादे अद्भूत दृष्य दिसते. मुहम्मद पैगंबरांना ध्यानावस्थेत असताना एक तेजोबिंब दिसले. त्यातून एक देवतूत अवतीर्ण झाला. त्याने मुहम्मदांना अभिनव आदेश दिला. हा आदेश त्यानी प्रथम आपली पत्नी खदीजा हिला सांगितला. त्या आदेशांचे स्वरूप स्थूलत: असे होते - “ईश्वर एक आहे. मुहम्मद त्याचा प्रेषित आहे. सत्यनिष्ठा हा मानवाचा मुख्य धर्म आहे. मानवमात्राला आपल्या प्रत्येक कृत्याचा जाब द्यावा लागतो. परिणाम भोगावा लागतो.” हाच आदेश अल्प शब्दभेदाने सर्व धर्म-संस्थापकांना व धर्म प्रसारकांना झाला आहे. धर्माला अगदी आद्य असा ‘संस्थापक’ असू शकत नाही. इमं विवस्वते योग प्रोक्तवानहमव्ययम्। विवस्वान्मवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्।। स एवायं मया तेऽद्य योग: प्रोक्त: पुरातन:। - (गीता, अध्याय ४ श्लोक १ व ३) श्रीकृष्ण भगवान म्हणाले, “हा अविनाशी योग प्रथम मी सूर्याला सांगितला. सूर्याने मनूस व मनूने इक्ष्वाकूस सांगितला. तोच हा पुरातन योग, आज मी तुला सांगितला.” मुहम्मद पैगंबरांचेही असेच एक वचन कुराणांत आहे. त्यांना मिळालेला आदेश मूसा, ईसा यांनाही मिळाला होता, असे स्वत: मुहम्मद पैगंबर म्हणतात. कुराणकी आज्ञा - “कुल आमन्ना बिल्लाहि व मा ३ उंज़िल अ़लेना व मा उंज़िल अ़ला इब्राहीम व इस्माईल व इस्हाक व यअ़कूब वालस्बाति व मा ऊति मूसा व ईसा वलबींय्यून मिंर्रबिहिम ला नुफ़र्रिकु बैन अहदिम्मिन्हुम व नहन् लहू मुस्लिमून ।” - अर्थात, “(ऐ मेरे दूत ! लोगोंसे) कह दो की हमने ईश्वरपर विश्वास कर लिया और जो (पुस्तक अथवा वाणी) हमपर उतरी है, उसपर और जो ग्रंथ इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब और उसकी संतानोंपर उतरी, उसपर भी तथा मूसा, ईसा और (इनके अतिरिक्त) अन्य नबियों (भगवानसे वार्तालाप करनेवालों) पर उनके भगवानकी ओरसे उतरी हुई इन सबपर (भी विश्वास रखते है) और उन (पुस्तकों तथा नबियों) में से किसीमे भेदभाव नहीं रखते, और हम उसी एक (भगवानको) मानते है।” - अर्थात, “(माझ्या अनुयायांनो) लोकांना सांगा की, ईश्वरावर आमची दृढ श्रद्धा आहे. जी ईश्वरी वचने माझ्या अंत:करणात अवतरली आहेत, त्यांवर आणि जी ईश्वरी वाणी इब्राहीम, इस्माईल, इसहाक, याकूब आणि त्यांच्या शिष्यांना ऐकू आली, तसेच मूसा, ईसा आणि ज्यांनी भगवंताचा संदेश ऐकला आहे अशा अन्य ईश्वर भक्तांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या धर्मग्रंथांमध्ये आम्ही भेदभाव करीत नाही. सर्व ठिकाणी एकत्वाने असणार्‍या परमेश्वराचे आम्ही भक्त आहोत.”

(४)

देव एक असल्यामुळे तत्त्वत: धर्मही एकच असला पाहिजे, युगायुगाच्या ठायी देव जरी अनेक अवतार घेतो तसे धर्मदेखील अनेक अवतार घेतो. धर्माधर्मातले भेद गौण आहेत. सर्व धर्माची एकात्मता हे अंतिम सत्य आहे. एक परमेश्वरच सहस्त्र नामांनी नटलेला आहे. सर्व नावेही एका सर्वेश्वराची असंख्य ‘सहस्त्रनामे होत’, कुराणामध्ये हा सिद्धांत मोठ्या आग्रहाने सांगण्यात आला आहे. अल्लहु ला ३ इलाह इल्ला हुवलहुलस्मा २ उल्हुस्ना। - अर्थात, केवल अल्लाह ही अर्चनीय है, और सब अच्छे नाम उसीके लिये है। कुलिद्ऊ अल्लाह अविद्उल् रहमान अय्यंम्मा तद्ऊ अफलहुलस्मा ३ उल्हुस्ना। - अर्थात, (ऐ मेरे दूत!) कह दे कि, उसे अल्लाह कहकर पुकारो अथवा रहमान (दयालू) जो इच्छा हो, कहकर पुकारो। सब अच्छे नाम उसीके है। अल्ला सर्वत्र आहे, सर्व मानवांमध्ये आहे, तो सर्वांचा संरक्षक आहे. अल्लावर प्रेम असेल, तर त्याचे साहाय्य, विशेषत: संकटकाळी कोणालाही प्राप्त होऊ शकते.

 

(५)

मुहम्मद पैगंबरांची ही निष्ठा व्यक्तविणारा एक प्रसंग त्यांच्या जीवन चरित्रात उपलब्ध होतो. या प्रसंगामधले नाट्य मनोवेधक व रोमहर्षक आहे. तो प्रसंग येथे उद्धृत करणे समुचित होईल. कारण या एकाच प्रसंगामध्ये मुहम्मद पैगंबरांची भूमिका पूर्णपणे प्रतिबिंबित झाली आहे. एकदा मुहम्मद पैगंबर ईश-चिंतन करीत, रस्त्याच्या अगदी कडेने चालले होते. ते एकाकी होते. त्यांना कल्पनाही नव्हती की मृत्यूलोकाच्या, रस्त्याच्या नव्हे, अगदी अखेरच्या कडेने आपण चाललो आहोत! एक खुनी बेरड तलवार उपसून मुहम्मदांच्या अंगावर धावून गेला व म्हणाला, “मी याच क्षणी तुझे तुकडे तुकडे करणार आहे. तुझे रक्षण आता कोण करील? तुझा अल्ला कोठे आहे? तो आता तुझे रक्षण करील काय?” मुहम्मद पैगंबर म्हणाले, “अवश्य करील. माझे संरक्षण माझा अल्ला याच क्षणी, याक्षणीही करील. माझे संरक्षण तो क्षणाक्षणाला करीत आहे. पूर्वी, आता आणि नंतर, अनंत काल त्याचे संरक्षणचक्र माझ्याभोवती फिरतच राहील. माझ्या अंत:करणात त्याचे अढळ सिंहासन आहे.” त्या बेरडाने हात वर केला त्याच्या हातात तलवार तळपत होती. द्वेषाचा त्वेष त्याच्या चेहेर्‍यावर उमटला होता. क्रोधाचा अंगार त्याच्या नेत्रांत धुमसत होता. ज्वालामुखीतून निघणार्‍या अग्निकणांप्रमाणे त्याच्या तोंडातून अपशब्दांचे फूत्कार बाहेर पडत होते. हिरण्यकश्यपूच्या आसुरी स्वरात तो म्हणाला, “बोलाव तुझ्या अल्लाला.” प्रल्हादाने जसा नारायण हा नामोच्चार केला अगदी त्याचप्रमाणे मुहम्मद पैगंबर उद्गारले,“या, अल्ला.” अल्लाचे नामोच्चारण झाले मात्र, तो बेरड जागच्या जागी स्तंभित झाला. त्यांचे सर्व अवयव बधिर झाले, द्वेष आणि त्वेष, मद आणि मत्सर क्षणार्धात अस्तंगत झाले. त्याचे धिप्पाड धूड धाडकन जमिनीवर आदळले. मुहम्मद पैगंबरांनी, त्या बेरडाच्या हातातली तलवार घेतली. त्याच्या छातीवर आपला गुडघा टेकला व विचारले, “आता तुझे रक्षण कोण करील? तुझा कोणी संरक्षक आहे काय?” बेरड म्हणाला, “माझे रक्षण कोण करणार? अल्लावर माझा विश्वास नाही, आजपर्यंत नव्हता, अल्ला माझे रक्षण करण्यास कसा धावून येईल? तुझे त्याने रक्षण केले कारण त्याच्या ठायी तुझा विश्वास, तुझी श्रद्धा होती.” मुहम्मद पैगंबर म्हणाले, “अल्लाच तुझे या क्षणी रक्षण करील. माझ्या अंतरंगात जसे त्याचे सिंहासन आहे तसेच तुझ्याही अंतरंगात आहे. अल्ला हा केवळ माझाच नाही तर तुझा, सर्वांचा संरक्षक आहे. तुला ठार मारण्याची बुद्धि मला तो देत नाही. तो मला निक्षून बजावीत आहे व म्हणून मला ही तरवार फेकावी लागत आहे. अल्ला हा भक्तांचे रक्षण करतो तसे अभक्तांचेही रक्षण तोच करतो. मानवांना अल्लाचा हा गुण, हे स्वरूप, हे प्रेम, ही दयाळूता समजली की त्यांना खरे ज्ञान व दर्शन होते. अल्लाचे ज्ञान होणे याचाच अर्थ अल्लाचा भक्त होणे, उपासक होणे.”

(६)

मुहम्मद पैगंबरांची दयाळू-ता, अल्लावरील त्यांची अचल श्रद्धा, सर्व मानवांवरील, दुष्ट, उन्मत्त व हिंसक मानवांवर देखील, त्यांचे प्रेम, या व दुसर्‍या अनेक दैवी सद्गुणांचा अविष्कार त्यांच्या जीवनात व शिकवणूकीत स्पष्टतया दिसतो. सुप्रसिद्ध इंग्रज लेखक व तत्त्वज्ञ थॉमस कार्लाइल याने पैगंबराच्या कार्याबद्दल धन्योद्गार काढले आहेत. “पैगंबरांनी अरबस्तानांतील अगदी मागासलेल्या समाजाला सुसंस्कृत केले व (एकेश्वर वादाचा) महामंत्र दिला.” मुहम्मदांचा शिष्य जाफर व त्यांचे काही स्नेही ऍबिसिनियात गेले होते. तेथील राजाने त्यांना विचारले की, “पैगंबरांचे मुख्य कार्य कोणते? तुम्हाला त्यांचे एवढे आकर्षण का वाटते?” जाफर म्हणाला, “पैगंबरांनी आम्हाला नवे विचार दिले. स्त्रिया व बालके यांचे हक्क प्रस्थापित केले.” राष्ट्रपती राधाकृष्णन् म्हणतात, “लोकशाही हे इस्लामधर्माच्या आचार-संहितेचे मुख्य सूत्र आहे व त्यामुळेच इस्लाम धर्माचा यशस्वी प्रचार होऊ शकला.” “Democracy is the key-note of Islam on its practical side. This is what enabled it, to succeed as a missionary religion.” – S. Radhakrishnan *****

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search