तात्विक दृष्टि दैनंदिन जीवनाला उजाळा देत राहिली पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीने आपली आध्यात्मिक भूमिका विचारपूर्वक व चोखंदळपणे निश्चित करावयास हवी.
भक्ती म्हणजे भावनेचा भोंगळपणा नव्हे. भक्ती हा प्रज्ञेचा परिपाक आहे. प्रज्ञेचा प्रफुल्ल फुलोरा आहे. तर्कतीर्थावरला तेजस्वी तरंग आहे. भक्ती हा भगवत्प्राप्तीचा सुलभ उपाय किंवा जवळची पायवाट नव्हे.
भक्ती हा विहंगम मार्ग आहे खरा, पण अंतराळात उत्थान घेण्याची पात्रता येईल तेव्हा. ही पात्रता कठोर बौद्धिक तपस्येनेच प्राप्त होते. आणि तशी झाली तरच भगवद्भक्तीच्या अंतराळांतले चिरवास्तव्य शक्य असते.
बौद्धिक तपस्या म्हणजे पुस्तकी पढिकपणा, शुष्क शब्दपांडित्य अथवा वावदूक वाचाळता नव्हे. बौद्धिक तपस्येचा रहस्यार्थ विवेकनिष्ठा हा होय.
विवेक म्हणजे निवड. ज्ञानेश्वरांचा शब्द ‘वेगळीक’.
किंवा आद्य शंकराचार्यांची संज्ञा ‘वैलक्षण्य’
यांचा आंतर व अभिप्रेत फलार्थ ‘विवेक’ असा आहे. समर्थांची क्रिया-पालट करण्याची प्रक्रिया सुद्धा हीच - “विवेके क्रिया आपुली पालटावी।”
विवेकजन्य परमार्थप्रीती ती भक्ती होय. ...