(१)
श्री ज्ञानेश्वरांचें ‘अनुभवामृत’ ही साक्षात् साकार व सघन अपरोक्ष-अनुभूती आहे. हें एक श्रुति-सूक्त आहे.
प्रत्यक्ष परा-विद्येचें नि:श्वसित आहे. ज्ञानेश्वरी व ‘चांगदेव पासष्टी’ हे त्यांचे पहिले दोन ग्रंथ म्हणजे
परेच्छा-प्रारब्धाचीं प्रतीकें म्हणतां येतील.
गीताकार श्री भगवान् व चांगदेव हीं त्या दोन ग्रंथांचीं स्फूर्तीस्थानें होत, पण अनुभवामृत हें ज्ञानेश्वरांचें
स्वेच्छाप्रारब्ध आहे. किंबहुना केवळ प्रारब्धच नव्हे तर त्या ग्रंथांमध्यें, त्यांच्या आध्यात्मिक
पूर्व-संचिताचा व अवतार कार्याच्या क्रियमाणाचा अंतर्भाव होऊन या तीन कर्मप्रवाहांनी एक
प्रयागराज सिद्ध झाला आहे.
‘आतां तुम्हीं स्वतंत्र प्रकरण लिहावें!` या श्री निवृत्तीनाथांच्या आज्ञेमुळें प्रस्तुत तत्त्वगीतांत, आपला
स्वयंप्रभ अनुभव व मौलिक तत्त्वज्ञान ज्ञानेश्वरांनीं विशद केलें आहे.
त्यांची स्वेच्छा म्हणजे श्री निवृत्तींची किंबहुना आदिनाथांची ही स्वेच्छा असणार हेंहि तितकेंच खरें आहे.
पण ‘अनुभवामृत` हा ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांचा म्हणावायाचा असेल तर अर्थातच त्यांची वैशिष्ट्यपूर्ण तात्त्विक
भूमिका, पासष्टी व ज्ञानेश्वरीपेक्षां याच ग्रंथात प्रकट होणें साहजिकच नव्हे काय?
या ग्रंथांतील दहा प्रकरणें म्हणजे भगवंताचे दशावतार आहेत, अथवा जिवशिवैक्य दर्शविणारीं अभिनव
दशोपनिषदें आहेत.
श्री ज्ञानेश्वरांच्या, स्वत:च्या अपरोक्ष अनुभवांची समग्र संहिता यांत आहे; तसेंच परमात्म
तत्त्वावरील महावार्तिकही यांतच अवतरले आहे. या दोन्ही अर्थांनीं अनुभवामृत हें ज्ञानेश्वरांचें
‘आत्मभाष्य’ किंवा स्वानुभववार्तिक म्हणतां येईल.
श्री ज्ञानेश्वरांनीं स्वत:ची परमोच्च तात्त्विक भूमिका, स्वत:च्या आंतरिक, अंतिम व आध्यात्मिक
अवस्था आणि स्वत: अनुभवलेलें परिपूर्ण गुरु-तादात्म्य यांचें मनोज्ञ चित्रण या ग्रंथांत करून
ठेवलेलें आहे.