साधना सूत्रे

‘ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे’

‘ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे’-(माउली - मार्च - १९६१)

प्रात:स्मरणीय केवल अवधूत, जगद्गुरू, न्यायरत्न डॉ. धुं. गो. विनोद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला, श्री तुकोबांच्या तत्त्वज्ञानाचे आंतररहस्य विशद करणारा प्रासादिक लेख -

श्री तुकाराम महाराज यांची तत्त्वदृष्टी किती मूलगामी होती, याचा प्रत्यय वरील पंक्तींचे मनन करू लागताच अत्यंत सुस्पष्टतेने येतो.

ओवळयाला सोवळे करील ते खरे सोवळे. ओवळयाचा स्पर्श झाला म्हणजे जे सोवळेपण नष्ट होते, ते किती कमकुवत असले पाहिजे! दोन शक्तींच्या संघर्षात जी शक्ती दुसर्‍या शक्तीचे रूपांतर करील, तीच शक्ती अधिक प्रभावी होय. सोवळया-ओवळया संघर्षात, ओवळे नेहमीच विजयी होते, कारण ते टिकून रहाते व सोवळेपणा नष्ट करते. 

सोवळयाचा स्पर्श झाल्यावर सर्व ओवळेपण अस्तंगत झाले पाहिजे. असे सोवळे असू शकेल काय? हा प्रश्न श्री तुकाराम यांच्या जिज्ञासेला डिवचत होता. 

स + ओवळे याचा अर्थ जे ‘ओवळयासकट’ आहे ते!

सोवळे आणि ओवळे, प्रकाश आणि अंधार, सत्य आणि असत्य, आत्मा आणि देह या सर्व द्वंद्वांना व्यापणारा असा श्रीतुकाराम यांचा प्रश्न आहे.

श्री निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर यांचेपासून तो श्री रामदास, तुकाराम यांचेपर्यंत सर्व महाराष्ट्र संतांची एक अत्यंत वैलक्षण्यपूर्ण व परमोच्च अशी भूमिका आहे. ती अशी की, ओवळे व जड, माया व मृत्यू, अज्ञान व देह यांना, वास्तविक अर्थच नाही, व अस्तित्वही नाही. जे जे काही आहे, असणे शक्य आहे, ते सर्व सर्व विशुद्ध चैतन्य, निष्कलंक ब्रह्म, एक स्वयंप्रभ ज्योति-मात्र सच्चिदानंद तत्त्व आहे. दुसर्‍या कोठल्याही कल्पनेचा, अस्तित्वाचा, आभासांचा विचार करण्यासच महाराष्ट्र संत तयार नाहीत.

वेदान्त शास्त्रातील जहत्-अजहत् लक्षणा श्री तुकोबा स्विकारत नाहीत. ही लक्षणा म्हणजे काही घेणे व काही टाकणे, माया टाकणे व ब्रह्म घेणे, देह टाकणे व आत्मतत्त्व घेणे. 

श्री तुकाराम म्हणतात, देहाकडे आदराने पहावे. 

 

ब्रह्म पहावयाचे तर द्वैत गेले पाहिजे आणि शरीर हेच ब्रह्मरूप झाले पाहिजे.

 

देह हा सादर पहावा निश्चित।।

ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले। शरीर ते झाले ब्रह्मरूप।।

देह नव्हे मी हे खरे। उरला उरे विठ्ठल।।

श्री तुकाराम म्हणतात, मी देह नाही. मी विठ्ठल आहे हे खरे आहे. जे काही उरले म्हणजे माझा देह, वृद्धी, मन, अंताकरण, जीवात्मा, बाह्य विश्व हे जे उरले ते, सर्वच्या सर्वही विठ्ठल आहे. ‘मी’ देह नसून विठ्ठल-स्वरूप आहे. इतकेच नव्हे तर माझा देह, इंद्रिये व सर्व बाह्य विश्व, विठ्ठलच आहेत.

 

भगवान श्रीकृष्णाच्या मुखे श्रीज्ञानेश्वर म्हणतात, ‘अवघा मीचि।’

श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले याचा लाक्षणिक अर्थ हाच आहे की त्यांच्या तत्त्वज्ञानात देह हा आत्म्याहून निराळा नाही. आत्मा वैकुंठाला जात असेल तर देहही वैकुंठालाच जाणार. आत्मा व देह हे ‘पद्-अर्थ’ दोन नव्हेतच. प्रेत म्हणजे शव नव्हे. शव म्हणजे आत्म्याने ठेवलेली पंचमहाभूते, ती पंचमहाभूते वैकुंठामय, विष्णूमय आहेतच. आत्मा तर विष्णू-रूप आहे हे सांगावयास नको.

प्रेत किंवा प्र-इत यांचा अर्थ प्रकर्षाने, विशिष्ठतेने वर-दूर गेलेला. या दृष्टीने प्रेत या शब्दाचा अर्थ आत्मा असा होतो. जे स्थिर राहिले ते ‘प्र-इत’, प्रेत अथवा वर गेलेले असे कसे म्हणता येईल?

जे वर गेले, ते ‘प्रेत’ किंवा आत्मतत्त्व होय. देहाचे प्रेत झाले, म्हणजे आत्मा झाला, आत्मा वर गेला. देहही, प्रेतही वर गेले. मागे देह राहिला नाही. तो प्र-इत प्रेत म्हणजे आत्मा झाला. मागे फक्त पंचमहाभूते राहिली.

तुकोबा देहाला ‘त्याज्य’ समजत नसत. देहाला ते मागे ठेवणार नाहीत, टाकणार नाहीत. आत्मा हा सदेहच आहे, विश्वेश्वर हा विश्वरूप आहे, ही अत्युच्च भूमिका त्यांनी स्विकारली होती. ही भूमिका म्हणजेच ‘सदेह-वैकुंठवास’ होय. वेदांत शास्त्रात अनेकानेक कक्षा आहेत.

व्यावहारिक, प्रतिभासिक व पारमार्थिक या तीन सत्+ता प्रसिद्धच आहेत. व्यावहारिक सत्तेत जग खरे आहे. प्रतिभासिक सत्तेत जग हा आभास, प्रतिभास, अध्यासजन्य विवर्त आहे. पारमार्थिक सत्तेत, अत्युच्च् कक्षेवर व्यवहार नाही, व्यावहारिक सत्यता नाही, अज्ञान-माया या वस्तूच नाहीत, त्यांना अर्थ नाही व अस्तित्व नाही. पारमार्थिक सत्तेत किंवा परमअर्थाने, प्रतिभास-आभास असणारच कसा?

दोरी ही व्यावहारिक सत्ता, तिचेऐवजी साप दिसणे ही प्रातिभासिक सत्ता, दोरी, साप, डोळे, जमीन, सर्वच मुळात एक आहे- हे भेद, द्वैत-दूषित दृष्टीने, बुद्धीने निर्मिले आहेत.  वास्तविक अर्थाने, परम अर्थाने सर्व काही, सर्वत्र, सर्वदा निष्कल व निष्कलंक अद्वैत भाव आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे.

आत्म्याहून देह निराळा नाही. आत्म्याशी संलग्न असलेला देह, आत्मरूपच असणार. देह, आत्मा, बुद्धी, मन, इच्छा हे आंतरजीवनाचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी उभारलेले हे प्रकल्प आहेत. ‘हायपॉथीसीस’ आहेत. त्या जड वस्तू नव्हेत हे आपण विसरतो. वेदांताचे मर्म न समजलेल्या अल्प-ज्ञ वेदांत्यांनी देह व आत्मा असा दगडी भेद कल्पून देहाला व आत्म्यालाही जडता दिली आहे तो भेद व्यावहारिक सत्तेच्या भूमिकेवरून खरा आहे. पण पारमार्थिक दृष्टीने खरा नाही, हे सत्य ओळखून घेतले तरच वेदान्ताचे साध्य व उद्दीष्ट सफल होईल.

देह हाच आत्मा म्हणणारे चार्वाक हे देखील देह व आत्मा यांचे अद्वैत मानतात. पण ती विपरीत दृष्टी आहे. देह हाच, किंवा देह म्हणजे आत्मा नव्हे.

आत्मा म्हणजे देहाचा समावेश, अंतर्भाव करणारे तत्त्व. आत्म्यात देह आहे पण देहांत आत्मा पूर्णत: नाही. आत्म्यात मात्र देह पूर्णत: आहे. देह व आत्मा ही एकमात्र संस्था आहे. जो भेद आहे तो जड, दगडी, चिरेबंदी नाही.

श्री मधूसूदन सरस्वतींनी ‘अद्वैत-सिद्धी’ या त्रिभूवन मोलाच्या ग्रंथांत व भुरेश्वराचार्यांनी लिहीलेल्या ‘नैष्कर्म्य सिद्धी’त वेदांताच्या अति उच्च् कक्षेवरून आत्मा व देह, चैतन्य व तथाकथित ‘जड’ यांचे अद्वैत सिद्ध केले आहे.

श्री तुकोबांनी, तीच अंतिम भूमिका सु-स्पष्ट केली आहे. पुरूष आणि प्रकृती, चैतन्य व जड, शिव  व शक्ती यांचे ‘समावेशन’, ‘एकत्रभाव’ श्रीज्ञानेश्वर अमृतानुभवाच्या अगदी पहिल्याच ओवीत सांगतात.

ऐशीं इयें निरूपाधिकें। जगाचिं जियें जनकें।

तिंयें वंदिलीं मियां मूळिकें। देवोदेवीं।।

पुरूषाला व प्रकृतीला, शिव-शिवेला, दोघांनाही ‘निरूपाधिक’ म्हणून ज्ञानेश्वर संबोधतात. प्रकृती ही ‘उपाधि’ नव्हे. दोन्ही तत्त्वे सारखीच ‘सोवळी’ आहेत. उपाधि-रहित आहेत. उपाधि म्हणजे ओवळेपण.

श्री ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रीय अध्यात्ममंदिराला या परमोच्च पारमार्थिक भूमिकेचा पाया रचिला व श्री तुकाराम महाराजांनी अगदी तीच भूमिका अखडंतेने, सुसूत्रतेने विषद केली आहे. म्हणून ते स्वत: ह्या अध्यात्म-मंदिराचे कलश झाले आहेत.

‘ज्ञानबा-तुकाराम’ हा पाया व कळस आहे, पण मंदिर मात्र एकमेव आहे.

‘सर्वं खल्विदं ब्रह्म’ ‘सर्वं ब्रह्नममिदं जगत्’ ही वेदांची व उपनिषदांची परमोच्च भूमिका ज्ञानदेव व तुकाराम यांनी चिरस्थिर ठेवली आहे.

सर्व ओवळेपणाला, जडाला, उपाधींना, प्रमादाला व मृत्यूला ग्रासणारी त्यांचे स्वरूपांतर करून त्यांना सोवळेपणा, पावित्र्य व मांगल्य देणारी अशी ही भूमिका, अशी ही दिव्य दृष्टी श्री तुकोबांनी अनुभविली व अध्यात्मात ही मर्द असणार्‍या शिवबाच्या मराठ्यांना सादर केली आहे.

ऐसे कैसे रे सोवळे। शिवता झाले ओवळे। ही पंक्ती श्री तुकोबांना स्फूरली त्याचे कारण त्यांची अत्युच्च् पारमार्थिक भूमिका, हे होय. स+ओवळे किंवा सोवळे हे ओवळयाचा ‘त्याग’ करीत नाही. ओवळयासकट ते प्रकाशते. ब्रह्म हे मायेसकट, आत्मा हा देहासकट व विश्वेश्वर हा विश्वासकट प्रकाशतो. त्यांना ‘दुभंगणे’ हे अज्ञान, बंधन, प्रमाद व मृत्यू होय. व्यावहारीक सत्तेत व बौद्धिक प्रक्रिया म्हणून त्यांच्यात द्वैत कल्पिणे आवश्यक व योग्य आहे. पण ते अंतिम पारमार्थिक सत्य नाही. श्री तुकोबा, हे अंतिम सत्य सांगताना, प्राथमिक व मध्यम अवस्थेतील सत्ये विसरत नाहीत. सामान्य व्यवहार, समाज संस्था, लोकनिती यांचे पुरेपुर भान त्यांना आहे, पण मूळ अधिष्ठान व अंतिम उद्दीष्ट, यांचा विसर त्यांना केव्हाही पडत नाही. पाया व कळस यावर आपले दोन्ही नेत्र त्यांनी स्थिरावले होते.

सर्व व्यवहार अद्वैताच्या, समतेच्या व ममतेच्या, भूमिकेवरून करणे ही परम-अर्थ साधना आहे. जड-चैतन्य भेद, देह- आत्मा भेद, देव-विश्व भेद नष्ट व्हावेत. जातिभेद, वर्णभेद, धर्मभेद इत्यादी सर्व भेद आत्मा व देह  यांच्या मध्ये चिरेबंदी भेद कल्पिल्यामुळेच झाले आहेत. देह हा अपवित्र झाला कारण त्याचा आत्म्याशी संबंध सुटला. आत्मा  देह एकरूप असतील तर देह अपवित्र कसा राहील? आत्मतत्त्वात देहाचा अंतर्भाव आहे व सोवळयात ओवळयचा समावेश आहे. देह हा आत्म्याशी संलग्न झाला म्हणून आत्मा ‘जड’ होत नाही, तर देहच सचेतन होतो. आत्म-तत्त्वरूपी सोवळयाला देहरूपी ओवळे लागले तर ओवळयाचे सोवळे होते, सोवळयाचे ओवळे होणार नाही.

सर्व प्रकारच्या भेदांमध्ये सापेक्षता आहे. अधिष्ठान-भूत एकात्मतेवरच खरोखर भेद-प्रतीतीची शक्यता आहे. मुळांत कोठेतरी एकता नसेल तर भेदांचा संभवच होणार नाही. श्रीतुकोबा सागंतात की, अधिष्ठान-भूत-एकात्मतेवर, सोज्वळ समानतेवर व विशुद्ध सोवळयावर लक्ष ठेवू या.

एकात्मता व संयुक्तता हेच खरे ‘सोवळे’ आहे. संयुक्त असेल व राहील तरच महाराष्ट्र सोवळा होय, भारत सोवळा होय व जगत् सोवळे राहील.

‘तुका झालासे कळस’ या माउलीच्या सोवळया अंकात किंवा अंकावर, श्री तुकोबांच्या महाराष्ट्राने संयुक्त होऊन व राहून ‘यशवंती’ झेप टाकावी ही माझी प्रार्थना आहे.

*****

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search