साधना सूत्रे

श्री पुरंदरदास विठ्ठल

'हुच्च् हिडियतु यनगे, हुच्च् हिडियतु।' - श्री पुरंदरदास विठ्ठल

 

 

'मला वेड लागलें आहे, मी पूर्ण वेडा झालो आहे. नाहीं का?'

श्री पुरंदरदास (इ. स. १४८४ ते १५६४) हे कर्नाटकचे तुलसीदास किंवा तुकाराम होत!

'पुरंदर विठ्ठल' अशी त्यांची सही असे. श्रीक्षेत्र पंढरपूर हें त्यांचें मोक्षतीर्थ होतें. विजयनगरच्या राजवंशाची सत्ता महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्हीं प्रदेशांचें शासन करीत होती. महाराष्ट्र व कर्नाटक हें एक संयुक्त राष्ट्र होतें. मराठी व कानडी या दोन्हीं संस्कृतींचा संसार एकाच गृहांत, एकाच शासन संस्थेखाली मोठ्या प्रेमानें नटला थटला होता.

पंढरपूर क्षेत्राचें विठ्ठल हें दैवत, कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्हीं संस्कृतीचें संधी-केंद्र झालें होते. नारायणीय, सात्वत व भागवत या त्रिविध भक्ती प्रवाहांचा प्रयागराज श्री विठ्ठल या प्रतीकांत अवतीर्ण झाला आहे.

पुरंदर हें स्थान त्यावेळीं सोलापूर जिल्ह्यांत असे. आतां ते पुणें जिल्ह्यांत समाविष्ट आहे. संतश्रेष्ठ पुरंदरदास हे पुण्यनगरीशीं अशा त-हेनें संलग्न असल्यामुळें त्यांचें जीवनकार्य हा आपला एक मानबिंदू आहे. आपण श्री पुरंदरदास यांचे आहोत. त्यांच्याशीं ऋणबद्ध आहोंत. पुरंदरदास हे संपूर्णतः आपले नव्हेत. संत हे सर्वांचे असतात. पुरंदरदास कर्नाटकाचें आहेत. आपले आहेत. दक्षिणपथाचे आहेत. भारताचे आहेत, सर्व विश्वाचे आहेत.

आपण मात्र संपूर्णपणें कोणातरी एका संताचे संपूर्णपणें होणें आवश्यक असतें. आपण पुरंदरदासाचें झालें पाहिजे, त्यांचें समकालीन एकनाथ यांचे झालें पाहिजे, ज्ञानेश्वर-एकनाथ-तुकाराम यांच्या शब्दगंगेचें पाणी आपण शतकानुशतकें पीत आलो आहोंत. त्यांचे ही आपण 'आप्त' आहोत.

सर्व संत एक आहेत कारण देव एक आहे. सर्व संत एक असल्यामुळें सामोरलेल्या कोणत्याही एका संताच्या जीवनाचा अभ्यास केलाच पाहिजे. आपली आई जशी आपल्या घरांतच असते. तिचा शोध बाहेर कोठें किंवा परदेशांत जाऊन करावयाचा नसतो. तसेंच आपले संत आपल्या घरीं, आपल्या गांवांत आपल्या प्रदेशांतच असतात. आपण त्यांच्याजवळ जात नाही. त्यांची ओळख करून घेत नाही.

श्रीपुरंदरदास हे पुण्य प्रांतीचे संत आहेत. त्यांच्या आंतरजीवनाचा परिचय आपण करून घेतलाच पाहिजे. त्यांची पुण्यतिथी (पौष वद्य अमावस्या) पुणें येथे गेली पंधरा वर्षे श्री. आचार्य हे मोठ्या थाटानें साजरी करतात ही अभिनंदनीय गोष्ट आहे.

मराठी भाषेत, श्री. संगोराम यांनीं लिहिलेले एक लहानसें पण उद्बोधक चरित्र उपलब्ध आहे. विस्तीर्ण चरित्रग्रंथाची फार जरूरी आहे. श्रीपुरंदरदास यांचें लिखाण बहुतांशी कन्नड भाषेंत आहे. श्री. संगोराम यांनी त्यांच्या कांहीं पदांचें मराठीत रसपूर्ण प्रासादिक भाषांतर केलें आहे.

पुरंदरदासांची पद्यरचना सुमारें पावणेपांच लक्ष आहे. त्यांच्या काव्यरचनेचें संशोधन तसेंच मराठी व इंग्रजी भाषेंत भाषांतर प्रसिद्ध होणें अतीव आवश्यक आहे. त्यांची गीतरचना श्री तुकाराम महाराजांच्या अभंगांप्रमाणे सरळ, टोकदार व हृदयाचा ठाव घेणारी आहे. श्री पुरंदरदास यांच्या जीवनाला सर्वांगीण संपन्नता आहे. त्यांनी प्रत्येक क्षेत्रांत भरघोस यश मिळवलें.

जवाहि-याचा धंदा करून त्यांनीं अपार द्रव्य जोडलें. ते नवकोट नारायण झाले. नवकोट नारायण म्हणजे प्रत्येक प्रकारचे नाणें, नऊ कोटी संख्येने ज्याच्या खजिन्यांत असेल तो.

पण, वित्ताच्या वैभवाच्या विष्ठेंत कुजणा-या किड्याप्रमाणें त्यांचें जीवन व्यतीत व्हावयाचे नव्हतें. 

एका क्रांतीकारक घटनेमुळें त्यांच्या जीवनाचा प्रवाह उर्ध्व दिशेनें म्हणजे ईश्वराकडे वाहूं लागला. 

द्रव्यप्राप्तीबरोबर मनाचें दारिद्र्य वाढतच रहातें. कोट्यधीशाला कवडीचें दान करताना प्राणांतिक वेदना होतात. उलट, संध्याकाळची शिदोरी नसलेल्या अकिंचनाचें ठायी, समोर आलेलें माध्यान्हीचें ताट सगळेच्या सगळें दुस-यापुढें सारण्याची अलौकीक शक्ति सहजासहजी प्राप्त होऊं शकतें.

नवकोट नारायण पुरंदरदास मनानें एक कवडीचुंबक, कंगाल झाला होता. एक सिद्ध सत्पुरूष पुरंदरदासाला याचे देही पुनर्जन्म देण्यासाठीं, खरें द्विजत्व देण्यासाठी अवतीर्ण झाला. त्यानें भिक्षुकाच्या रूपांत विवाहासाठी पुरंदरदासाजवळ द्रव्याची मदत मागितली. शेंकडो वेळां नकार देऊन शेवटीं पुरंदरदासानें त्याला दोन खोटे पैसे घेण्यास सांगितलें. तो सिद्ध पुरंदरदासाच्या पत्नीकडे गेला. 

क्षणार्धात तिनें आपल्या नाकांतील बहुमोल नथ त्याच्या स्वाधीन केली! त्या भिक्षुकानें ती परत पुरंदरदासाकडे विकण्यासाठीं नेली व रोख पैसे मागितले. पुरंदरदास तात्काळ घरीं गेला व आपल्या धर्मपत्नीच्या वधाला प्रवृत्त झाला. तिने भगवंताची करूणा भाकली. त्या भक्तवत्सलाने तात्काळ तिच्या समोरच्या विषाच्या प्याल्यामध्यें तिची नथ निक्षिप्त केली. या अद्भूत घटनेमुळे पुरंदरदासांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती होऊन, जड द्रव्यामागें असलेल्या मूळ शक्तीचा, आद्य शक्तीचा त्याला साक्षात्कार झाला. 

त्यांनी आपल्या सर्वस्वावर तुळशीपत्र ठेऊन, नामयोग आचरण्यासाठीं सर्वसंग परित्याग केला. अपरिग्रह व्रताचे एवढे कठोर आचरण करणा-या व्यक्ती फारच विरळया.

कानडी भाषेत 'कानडी' या शब्दाचा अर्थ सरळ, साधा, सहज, स्पष्ट असा आहे. मराठी  भाषेंत 'कानडी, कानडे, कन्नड' या शब्दांचा अर्थं अवघड गुंतागुंतीचें, जटील असा झाला आहे. जें कळत नाहीं तें अवघड, कठीण वाटतें. अपरिग्रह, वैराग्य, ईश्वरशक्ती ही कठीण वाटते कारण त्या अवस्थेचा अर्थं समजलेला नसतो, त्या सुखाची, अमृतानुभवाची चव माहीत नसते. ती एकदां, अगदीं एकदांच समजली कीं जीवनांत क्रांती होते, द्विजत्व येतें, पुनर्जंन्म होतो, त्याला जगाच्या दृष्टीनें 'वेड' लागतें, पण खरोखर वेड जाऊन तो खरा शहाणा, ज्ञानी व द्रष्टा होतो.

(मार्च १९६१)

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search