साधना सूत्रे

वै. सोनोपंत : निष्कल ब्रह्माचा सुवर्णमय कोश

(प्रसाद, दांडेकर विशेषांक, नोव्हेंबर १९६८)

हिरण्मये परे कोशे । विरजं ब्रह्म निष्कलम्। - (मुंडकोपनिषद्)

 

हिरण्मय, सुवर्णमय अशा आनंदकोशामधून प्रकाशमान होणारे ब्रह्म हे निष्कल, म्हणजे पूर्ण आहे.

वै. सोनोपंताचे जीवन हे एक अखंड धर्म-कीर्तन होते.

 

नामस्मरण, श्री ज्ञानेश्वरीचे अखंड परिशीलन, भगवद्‍गुणसंकीर्तन हाच त्यांचा अविरत जीवनक्रम होता.

 

ब्रह्मचर्य, ‘ब्रह्माणि चर्या’ ही सर्वार्थाने त्यांच्यामध्ये साकार झाली होती.

 

परिणत झालेल्या तपस्येने ‘मन:प्रसाद’ आणि ‘सौम्यत्व’ हे जणू काय त्यांचे स्वाभाविक गुण झाले होते.

 

त्याच्या सौम्य आणि प्रसादपूर्ण आकृतीच्या दर्शनाने पवित्र तीर्थात स्नान झाल्यासारखे वाटे. 

 

‘सौम्य’ पदाचा अर्थ श्री शंकराचार्यांनी ‘सौमनस्य’ असा केला आहे.

 

सामान्यत: सौम्य म्हणजे अ-प्रखर, मंद असा समजला जातो. हा अर्थ अगदीच प्राकृत व लौकिक वाटतो. तेजस्वितेचा अभाव म्हणजे सौम्यत्व असे समजले जाते. वस्तुत: सौम्यत्वांत तेजस्वितेची परमावधी असते. मात्र ही तेजस्विता तापदायक नसते.

 

श्री रामचंद्रांनी सीता-स्वयंवराच्या मंडपात प्रवेश केला. त्यावेळी कोटि सूर्याचा प्रकाश प्रकट झाल्यासारखे वाटले. पण त्यांच्या प्रकाशाच्या प्रभेने स्वयंवर मंडप व त्यामध्ये बसलेले राजे जळून गेले नाहीत! श्री रामचंद्रांचे तेज जड - प्राकृत तेज नव्हते. ते दैवी तेज होते. त्यामुळे मंडपांत उपस्थित असलेल्या व्यक्तींची हृदय - कमले उमलली, फुलली. असे महाकवी वाल्मिकींनी वर्णन केले आहे. 

 

‘मार्तंड जे तापहीन’ हे श्री ज्ञानदेवांनी केलेले संतांचे लक्षण, वर्णनाचा जणू काय अनुवाद आहे. 

 

सौम्यत्व हे सत्वगुणाच्या प्रकर्षाचे फलीत आहे. तेजस्विता, प्रकाश , ज्ञान ही सत्वगुणाची प्रधान लक्षणे आहेत. 

 

श्री ज्ञानेश्वर म्हणतात :

 

पै रज तम विजये । सत्व गा देही इये।

वाढता चिन्हे तिये। ऐसी होती।।

ते प्रज्ञा आंतुलीकडे। न समाती बाहेरी वोसंडे।

वसंती पद्मखंडे। दृती जैसी।।

(ज्ञानेश्वरी अ. १४, ओव्या २०४-५)

 

रजोगुण आणि तमोगुण यांना जिंकून जेव्हा या देहामध्ये सत्वगुण वाढतो तेव्हा अशी लक्षणे दिसतात. वसंत ऋतूत फुललेल्या कमळांचा सुवास पाकळयांमध्ये न मावता बाहेर पडतो, त्याप्रमाणे त्याच्या ठायींची प्रज्ञा आंतमध्ये न समावता बाहेर ओसंडते.

सत्वगुणाच्या ‘अतिशय’ उत्कर्षाच्या अवस्थेला भगवान पतंजलीनी ‘धर्म - मेघ - समाधि’ अशी संज्ञा दिली आहे.

 

रजोगुण आणि तमोगुण हे नष्टप्राय झालेले असल्यामुळे केवळ सत्वगुणाचेच प्रकाश - किरण, धर्म - मेघ समाधीला प्राप्त् झालेल्या महानुभावाच्या मनोव्यापारांतून किंबहुना सर्व इंद्रियव्यापारांतून प्रकट होत असतात.

 

त्यांच्या श्वास - मात्रांतून, दैहिक हालचालींतून सत्वगुणाची अभिव्यक्ती होत असते. त्यांच्या शब्दांतून, सहेतूक आणि निर्हेतूक आचरणांत सुद्धा, जणू काय सात्विकतेचा एक वस्तूपाठ दिला जात असतो.

 

त्यांचे भाषण अत्यंत परिणामकारक ठरते. वक्तृत्व - गुण, भाषासौंदर्य, अलंकार - वैभव या सर्व गोष्टी त्यांच्या भाषणापुढे द्वितीय - तृतीय दर्जाच्या ठरतात.

 

‘समाधि’ हा शब्द सामान्यत: सर्वांच्या परिचयाचा आहे. त्यांचा स्थूल अर्थ एकाग्रता, मनोलयाची अवस्था, ऐंद्रियभान नष्ट झाल्याची स्थिती, असा आहे.

 

सबीज - निर्बीज, सवितर्क - निर्वितर्क, सविकल्प - निर्विकल्प असे समाधीचे, त्या त्या अवस्थांना अनुलक्षून स्पष्ट केलेले अनेक सूक्ष्म भेद प्रसिद्ध आहेत. 

 

योगवासिष्ठांत प्रामुख्याने वर्णन केलेल्या ज्ञानाच्या सप्त्भूमिकांपैकी पहिल्या तीन भूमिका शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा साधकावस्थेतील प्राथमिक पायर्‍या आहेत.

 

सत्वापत्ती, असंसक्ती व पदार्थाभाविनी या तीन पुढील प्रगत अवस्था व तुर्यगा ही अखेरची, सातवी कैवल्यावस्था.

 

पदार्थ अभाविनी या भूमिकेवर आरूढ झाल्यावर ‘धर्ममेघ समाधि’ अवतीर्ण होते. या अवस्थेचे  मुख्य लक्षण ‘प्रत्यान्तरराहित्य’.  केवळ ‘सर्व खलु इदं ब्रह्म’ याचाच प्रत्यय होत राहणे. वस्तू - वस्तूंमधील भेदाच्या प्रत्ययाचा पूर्ण निरास झालेला असतो. 

 

‘धर्म - मेघ’ यांतील धर्म या शब्दाचा स्व-भाव असा अर्थ अभिप्रेत आहे. आत्मस्वरूप हा प्रत्येकाचा स्वभाव आहे; मूलस्वरूप आहे. चित्तांत परिणत व परिपक्व झाले की, त्याचा स्व-भाव बाहेर ओसंडू लागतो. मूल स्वरूपांतली वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म बाहेर प्रकट होऊ लागले की, त्याचे स्वरूप पर्जन्य वृष्टी करणार्‍या मेघासारखे असते. म्हणून या सूत्रांत ‘मेघ’ शब्दाची योजना आहे.

 

ही समाधि - अवस्था मेघासारखी असते. म्हणजे अंतरंगात परिणत झालेला ‘धर्म’ किंवा सर्वशक्तीपंन्नत्व असे आत्मस्वरूप वर्षाप्रवण झालेले असते.

 

सर्व जीवांवर धर्मार्मताचा वर्षाव करणे हा त्याचा स्वभाव असतो. वै. सोनोपंतांनी आपल्या सर्व जीवनांत अखिल महाराष्ट्रीय जनतेवर या धर्मामृताचा वर्षाव केला.

 

*****

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search