पत्रकारीता
(समतानंद गद्रे यांनी आज सायंकाळी अनाथ विद्यार्थीगृहाच्या पटांगणांत, मोठ्या थाटामाटाने श्री. अच्युतरावजींची पुण्यतिथी साजरी केली. अध्यक्ष महामहोपाध्याय पोतदार व प्रमुख वक्ते श्री. बाबुराव अत्रे यांनी अच्युतरावांच्या जीवनावर झगझगीत नव-नवीन प्रकाश झोत टाकले. स्वत: गद्रे हे अच्युतरावांचे एक-निष्ठ अनुयायी आहेत. त्यांच्या लिहीण्या-बोलण्यांत ‘अ-च्युता’ मैत्री वारंवार चमकते.
श्री. अत्रे हे तर अच्युतरावांपेक्षाही अधिक यशस्वितेने महाराष्ट्राची ‘अस्मिता’ जागृत ठेवीत आहेत. अच्युतरावांच्या लेखणीचे तीन विशेष-खोच, बोच आणि टोच हे, अत्रे वाङमयात शतगुणित शक्तींनी प्रकटले आहेत. श्री. अच्युतरावांची परंपरा अशीच अखंडीत रहाणार व अधिकाधिक संपन्न होणार यांत संशय नाही. श्री. अच्युतराचांचा व माझा पुष्कळ संबंध आला होता. त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेला व महाराष्ट्रनिष्ठेला, ‘श्रुति बोध’ काढून त्यांनी केलेल्या वेद-सेवेला व मराठी मनाच्या मशागतीला आदरबुद्धीने मनांत आणून हे चिंतन संपवितो.)
‘पत्र’ या संस्कृत शब्दाचा मराठीत पान असा अर्थ आहे. उदा. तुलसी-‘पत्र’ म्हणजे तुळशीचे पान.
तृण-पर्णावर पावसाचे थेंब किंवा दवबिंदू पडले तरी ते एकदम जमिनीवर जात नाहीत, काही वेळ तरी, ते सांभाळले जातात. हे दृश्य पाहून एका प्राचीन द्रष्ट्याने ‘पत्र’ या शब्दाची अर्थपूर्ण व अभिनव निर्मिती केली.
‘पत्र’ शब्दाचा निरूक्तार्थ ‘पतनात् जायते इति पत्रम्।’
पतनापासून, अध:पतनापासून संरक्षण करते ते ‘पत्र’.
बहुतेक सर्व शब्दांची निर्मिती अत्यंत काव्यपूर्ण व अर्थपूर्ण असते. सर्व शब्द ही ‘किंचित् काव्ये’ आहेत.
प्रत्येक शब्दाची उत्पत्ती कशी झाली असावी, मूलार्थ कोणता, ऎतिहासीक व सामाजिक स्थित्यंतरामधून आज उपलब्ध असलेला अर्थ कसा निर्माण झाला. या सर्व गोष्टींचा विचार करताना अभ्यासकांची स-विकल्प समाधि लागते व त्याचे मन:कोश व विज्ञानमय कोश हे आनंदमय कोशांत विलीन होतात.
प्रत्येक शब्दांची निर्मिती ही कालिदासा सारख्यांच्या भव्य-दिव्य प्रतिभेशी तुल्यबल असणार्या प्रतिभेचा आविष्कार असतो.
कोणत्याही शब्दाच्या स्वरूपाचे व घटनेचे प्रदीर्घ मनन केल्यावर हा साक्षात्कार होतो. ‘पत्र’ हा शब्द किती काव्यमय व अर्थवाही, दिप्तीकारक व स्फूर्तीदायक आहे हे, त्याचा मूलार्थ, निरूक्तार्थ पाहिला की लक्षांत येते.
वृत्त-पत्र म्हणजे वृत्त, घटना, झालेल्या गोष्टी सांगणारे ‘पत्र’.
वृत्त किंवा बातमी लिहीताना या लेखकाने, व्यक्तीचे व समाजाचे पतनापासून सरंक्षण झाले पाहिजे ही जागृति ठेवायला हवी.
समाजाच्या नैतिक निष्ठा स्थिराविणे हे वृत्तपत्राचे आद्य कर्तव्य आहे.
नीतिमान व्यक्तीचे नेतृत्व घ्यावयास पात्र असते.
शब्द-शास्त्र दृष्ट्या, नीती व नेतृत्व हे दोनही शब्द एकार्थ-वाचक आहेत.
...