स्वत:ला सुधारणे हीच क्रिया सहज शक्य व जगदुद्धाराला उपकारक आहे.
(रोहिणी सप्टेंबर १९५०)
मी उद्या ऑस्ट्रेलियाला जात आहे. तेथे कांगारू या नावाचा प्राणी असतो. कांगारू या शब्दाचा इतिहास मोठा उद्बोधक आहे.
इंग्लंडमधील धाडसी संशोधक प्रथम ऑस्ट्रेलियांत गेले तेव्हा त्यांना हा प्राणी प्रथम दिसला.
त्यांनी तेथील रानटी रहिवाशांस विचारले, “या प्राण्याचे नाव काय?”
त्या रानटी रहिवाशांनी या संशोधक प्रवाशांस विचारले, “कांगारू!” म्हणजे, “या प्राण्याचे नाव काय?” हा त्यांचा प्रतिप्रश्न म्हणजे आपल्या प्रश्नास उत्तर होय असे त्या संशोधक प्रवाशास वाटले व त्या प्राण्याचे नाव ‘कांगारू’ असे तो समजला.
भारतीय दर्शनकारांनी कोणत्याही वस्तूचे नामकरण व त्याचा अर्थ या प्रमेयाची विस्तृत चर्चा केली आहे.
शब्द हे वक्त्याच्या मनांतील हेतूप्रमाणे स्वरूप व अर्थ धारण करीत असतात. व्यक्तीमात्राची रूचि, इच्छा, वासना, अपेक्षा, हीच बहुतांशाने वस्तुस्थितीचे घटक-द्रव्य असते.
ज्याला आपण वास्तवता म्हणतो तिचे स्वरूप खरोखर किती व्यक्तीनिष्ठ असते हे वर उल्लेखिलेल्या, कांगारू या शब्दाच्या अर्थतिहासावरून स्पष्ट होईल. संदेश हा की, व्यक्तीमात्राने स्वत:च्या अंतर्जीवनाचे, हेतूंचे, वासनांचे, अभिप्रायांचे स्वरूप ओळखून त्यांचे इष्ट व योग्य स्वरूपांतर करावे.
वास्तवता एवढी अगाध व असीम आहे की त्याबाबतीत स्थित्यंतर, अवस्थांतर करणे ही सामान्यत: व बहुतांशाने असंभवनीय गोष्ट आहे.
स्वत:ला सुधारणे हीच क्रिया सहज शक्य व जगदुद्धाराला उपकारक आहे.
जनतेला, जगाला, समाजाला सुधारण्याची महत्त्वाकांक्षा यशस्वी होणे अशक्यप्राय होय व जेव्हा ती यशस्वी होते, तेव्हा प्रथम ज्यांचे बाबतीत ती यशस्वी होते त्या महानुभाव विभूती आत्मोद्धाराच्या प्रक्रियेत, उच्च कोटीच्या प्रमाणाने, यशस्वी झालेल्या असतात.
स्वत:ची संकल्पशुद्धी हा आत्मोद्धारातील पहिला पदक्षेप होय.
सदिच्छा सदैव स्थिर ठेवणे, विरोध-द्वेष इ. वक्रवृत्तींनी दूषित असलेल्या परिसरांत सुद्धा, दुसर्याबद्दलच्या इच्छा पूर्णतया मंगलमात्र राखणे, हेच व्यक्तीविकासाच्या साधनेचे प्रमुख अंग होय.
संकल्पादेव तु, तत् - श्रुते:।।
भगवान बादरायण व्यासांनी वरील सूत्रांत हेच सूचित केले आहे.
जीवनातले संकल्प शक्तीचे मध्यवर्ती स्थान ओळखणे किती आवश्यक आहे हे यावरून स्पष्ट होईल.
ज्याप्रमाणे आपले प्रश्न आपण सिद्ध करतो. त्याचप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरेही आपली आपणच स्वरूपवीत असतो. ही गोष्ट लक्षांत राहिली तर मानवी व्यक्तित्वाचा विकास किती सुलभ होईल? किती गैरसमज, किती अनर्थ, किती दु:खे कमी होतील?
...