(प्रवाचक - न्या. विनोद)
जीवना! तुझे अनंत अवतार! तुझे सहस्त्रावधि स्पर्श! तुझी कोट्यानुकोटि कुतूहले! - पाहून मन विस्मित होते, स्तिमित होते.
अर्थवत्ते! तुझा आणि जीवनाचा!
तुझा व शब्दसृष्टीचा!
तुझा अन् त्या सर्व कलात्मक आविष्कारांचा!
संबंध तरी काय आहे?
जीवनाचा अर्थ काय?
शब्दसृष्टी कशी अर्थवान होते?
कलाकृतीमध्ये काय व्यक्त होत असते?
ही प्रश्नचिन्हे तरी का अद्भूत होतात?
वासने! तुझ्या अंगुलिनिर्देशात।
तुझ्या हस्तमध्यात।
तुझ्या विद्युत्वलयात।
जीवनातील सर्व अर्थवत्ता - होय, सर्व व्यक्ती, विश्वे व विश्वेदेव समाविष्ट आहेत.
स्वतंत्रते! तू देखील वासनेचाच आविष्कार पण स्वरूपाविष्कार आहेस.
स्व-तंत्र म्हणजे काय व कोण असते?
वासनेमुळे व वासनेलाच स्वातंत्र्याचा आनंद समजतो. वासनेला, जीवन मर्यादित करू शकत नाही. जीवनाच्या पटावर वासना आपले पदक्षेप स्वैरतेने करीत असते. वासनेचा अंकूर हीच जीवनाची स्वभावलक्षणा होय.
जीवन ही एक जड रंगमूमि आहे. वासना, त्या रंगभूमिवर नृत्य करणारी, साक्षात् चैतन्यशक्ति आहे.
पण स्वतंत्रते! तू त्या शक्तीचे शिवत्व आहेस.
मानव्याचा विकास स्व-तंत्रतेमुळे, वासनाशक्तीच्या स्वतंत्रतेमुळे - शिवशक्तीच्या समन्वयामुळे झाला आहे.
प्रज्ञे!
वासनेच्या विश्वशक्तीचे तुझ्यामुळे विनयन झाले. तुझ्यामुळे वासनेला, स्वैरता व स्वातंत्र्य यांतला भेद उमगला. जीवन, अर्थवत्ता, वासना व स्वतंत्रता यांचे स्वरूप व आविष्कार तुझ्यामुळे सिद्ध होतात. तुझ्या धाकुल्या दीपकलिकेच्या प्रभेत व प्रभेमुळे अनंत आकाशांतल्या सूर्यमालांचे सहस्त्र तेजोगोल प्रकाशित आहेत.
प्रज्ञे!
भारताच्या जीवनात अर्थवत्ता व वासनेत स्वतंत्रता निर्माण होण्यास तुझ्या दीपकलिकांच्या तेहतीस कोट पणत्या अखंड तेजस्वितेने तळपत राहिल्या पाहिजेत.
(स्वातंत्र्यदेवीच्या भव्य पुतळयाजवळ, न्यूयॉर्क. अमेरिका) .....