साधना सूत्रे

माऊली म्हणजे मावळलेल्या मी पणाची महन्मंगल मूर्ति.

माऊलीचा हा स्वभाव होय. मुलाला ‘अ-पत्य’ समजणे, त्याचे पतन होणार नाही अशी काळजी घेणे.

ते खाली पडू नये म्हणून मांडीवर, पोटाशी, कडेवर, खांद्यावर वाटेल तेथे त्याला जपून जोंबाळून ठेवणे.

मूल पोटात असताना जसे ‘स्वस्थ’च आहे असे माऊलीला वाटत असते. 

सागराच्या पोटातील लाट वरवर येते, दूर गेलेली दिसते. किनार्‍याला भिडते, पण ती सदैव सागरांतच असते. माऊली व अपत्य यांचा संबंधही असाच आहे!

माऊली पासून मूल कधीही दूर होऊ शकत नाही. 

 

म्हणूनच त्याला अपत्य ही संज्ञा आहे. 

माऊलीला नामरूप नाही. 

 

माऊली ही अनामिक प्रेमाचा पूर्णावतार. माऊलीच्या प्रेमाला प्रतिक्रियेची, प्रतियोगाची, कृतज्ञतेची अणुमात्र अपेक्ष, आवश्यकता नसते.

माऊलीला प्रेम हेच प्रेमाचे साफल्य असते. प्रेम आणि त्याचा परिणाम या दोन अलग अवस्था नव्हेत. प्रेम म्हणजेच प्रेमाचा परिणाम पर्यवसान व फलश्रुति. प्रेम हेच कारण व कार्यही!

माऊलीचे प्रेम हे स्वयंप्रकाश व स्वयंपूर्ण भावबिंब आहे. माऊलीच्या प्रेमाला नामरूपाची ओळखच नसते.

माऊली स्वत:चे नामरूप पूर्णपणे विसरलेली असते. नव्हे, माऊलीला नामरूपाचे भान पूर्वीही नव्हते व केव्हाही असूच शकत नाही.

जी स्वत:चे मूळ नाव सोडते व पतीचेही सहसा घेत नाही, तिलाच नामातीत व नामरूपातीत माऊलीपद प्राप्त होत असते. नामत्याग व रूपत्याग हा मायपोट पिकल्याचा पुरावा.

जीवनाच्या अमरत्वाचे रहस्य तिला समजलेले असते. जीवनाला नाव दिले किंवा ठेवले की मृत्यू सार्थ व साकार होतो. जीवनाच्या अमरत्वाचा मूलार्थ जीवनाचे अनामिकत्व.

तुम्ही नावाला झोंबलेत की जीवनाच्या अखंड व अनंत प्रवाहापासून अलग झालेत. तुम्ही नावाला झोंबलेत की कालाची कराल करवाल तुम्हाला मृत्यूच्या हवाली करणार. 

अनामिकता हेच जीवनाचे सहज-स्वरूप आहे. 

नाम हा केवळ आरोप आहे, अध्यास आहे. जन्माला येताना, स्वानंदात असताना, मृत्यूच्या आलिंगनकाली आपले नाव कोठे असते? कोणाला असते? कोण नाव देऊ अथवा घेऊ शकतो? आणि ते कुणाला समजते?

स्वत:च्या नावाबद्दलची आसक्ति, कीर्तीचा क्षुद्र हव्यास, मोठेपणाचे नामनिष्ठ प्रदर्शन, या गोष्टी किती बालिश, पोरकट आहेत?

नावाची नौबत वाजवून स्वत:चा मोठेपणा सिद्ध करणारांच्या वाट्याला एक भयानक व हास्यास्पद निराशा येत असते.

दिक्कालाच्या अनंततेत कुणाचे नाव व कुणाची कीर्ती अमर होऊ शकणार आहे? 

भूगोल सोडून एकच क्षण, अगदी एकच क्षण, खगोलाकडे पाहू या. 

अनंतयुग साक्षी तारकांच्या अमर स्मरणशक्तीलाही कुठल्या मानवी महात्म्याचे नाव स्मरणांत ठेवता आले असेल?

मानवी इतिहासांतल्या कोणत्या घटना कोणत्या विभूती, कोणती नांवे त्या तारकांच्या स्मरणांत असतील?

खगोलाकडे तरी कशाला पहा?

आपण गाढ झोपेत, सुषुप्तीत असता, आपले नाव कुणाला आठवत असते? जागृती आल्यावर स्वत:चे नाव आठविते. नाव आठवल्यामुळे जागृती येत नाही. नावाच्या नुसत्या आवाजाने जाग येईल, पण नाव ओळखल्याने येत नाही; कारण खरोखरच स्वत:चे नाव स्वत:च्या आंतरिक ओळखीचे नसते.

मी स्वत:ला माझ्या नावाने ओळखीत नाही. मी स्वत:ला माझ्या भावाने ‘स्व’ भावाने ओळखतो.

माझे नाव लोकांकडून व लोकांसाठी अवतरले आहे. मी व माझे नाव यांमध्ये साक्षात् अथवा अपरोक्ष संबंध नाही.

माझे नाव मोठे झाले म्हणून मी कसा मोठा होणार? व लहान राहिले म्हणून मी थोडाच लहान होणार आहे?

स्वत:साठी मी तेव्हाच मोठा होईन, जेव्हा माझा स्वत:चा आंतर अनुभव विशाल, विश्व-विशाल होईल, संग्राहक-सर्व संग्राहक होईल.

बिंदूचा स्वत:चा अनुभव, तो सिंधूत मिळाल्याशिवाय विशाल कसा होणार? जोपर्यंत बिंदूत्व आहे, तोपर्यंत सिंधुत्व नाही. 

माऊलीच्या अनामिक त्यागबुद्धीला हे कळते की जीवनाच्या - महाजीवनाच्या - संततीत ‘संतानांत’ - अखंड प्रवाहांत, स्वत:ला विरवून घेणे हेच खरे अमरत्व आहे.

मातृ शब्दाची नैरूक्तिक घटना (मान् + तृच्) अशी आहे -  मान्य, परम आदरणीय वंद्य, व्यक्ती असा मातृ शब्दाचा एक अर्थ आहे.

यास्काचार्य, निरूक्तांत ‘मातृ’ शब्दाचा निर्मातृत्व, नव-निर्माणशक्ती (Creative Power) असा सर्वोत्कृष्ट अर्थ लावतात.

मातृ शब्दाने ‘मापन’ असाही अर्थ सूचित होतो. गर्भाशयात व बाहेरच्या जगात जी स्वत:ला व अ-पत्याला नेहमी मापीत असते. प्रमाणबद्ध अवस्थेत, परिस्थितीत ठेवते, ती माता.

स्त्री ही मातृत्वाची प्रत्यक्षता आहे. स्त्रीला मूल झाले नसले तरीही ती माताच असते. 

 

स्त्रीत्व व मातृत्व यांचा अविर्भाव आहे. तादात्म्य संबंध आहे. स्त्रीला पती, बंधु, पितादेखील वत्सलतेचे विषय असतात.

वत्सलता हा स्त्रीचा एकमात्र हृदय रस आहे, सर्व स्त्रियांकडे मातृभावनेने पहाणे, वाटते तितके कठीण नाही.

मातृत्व हा स्त्रीचा एक एव, व्यावर्तक गुण विशेष आहे. स्वत:चे हा मूल नसले तरी स्त्री ही स्वभावत: सर्व मुलांकडे, सर्व जगाकडे, सर्व व्यक्तींकडे मातृ-भावानेच पहाते व पहाणार.

स्वत:च्या आईकडे, बापाकडे, पतीकडेही वत्सल रसांत न्हालेल्या दृष्टिने स्वभावत: पहाणारी स्त्री हे ईश्वर निर्मित सृष्टीतले एक महदाश्चर्य व सहजाश्चर्य आहे. 

पतित्वाने मिळणारा स्त्रीचा उपभोग क्षणभंगूर असतो. पुत्रत्वाने मिळणारा स्त्रीचा आश्रय व आनंद चिर स्थायी असतो.

स्त्रीची कामुकता क्षणजीवी, आगमापायी आहे. पण वत्सलता हा स्त्रीचा स्थिरधर्म आहे.

‘स्त्री’ या शब्दाचे नैरूक्तिक विश्लेषण महाभाष्यकार पतंजली याने ‘स्त्यायति अस्याम् गर्भ: इति’ असे केले आहे. गर्भाशय ज्या देहात असतो ती स्त्री. स्त्री म्हणजे गर्भाशय प्रधान व्यक्ति.

स्त्रीच्या जीवनाला मातृभावाव्यतिरिक्त वैशिष्ट्य नाही.

....

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search