सौंदर्याचा आत्मा समन्वयात आहे. विविधतेतले एकत्व प्रतीतीला आले की सौंदर्यनिष्पत्ती होते. सौंदर्य म्हणजे हेतूदर्शन. आकृतीतला शब्द, योजनेतला रंग, संगतीतला हेतू उमगला की सौंदर्याच्या दर्शनलहरी हेलावू लागतात.
हेतू तीन प्रकारचे असतात. आत्मनेपदी, परस्मैपदी व परात्पर पदी.
संकुचित स्वार्थाने लिडबिडलेले हेतू आत्मनेपदी होत.
परार्थांचा अंतर्भाव करणारे दुसर्या व्यक्तींच्या सुख-दु:खांची ओळख ठेवणारे, परस्मैपदी हेतू होत.
परात्पर हेतूंचे क्षितिज, विश्वंकष असते. स्वार्थ व परार्थ यांच्या मर्यादा ओलांडून परात्पर श्रेणीचे हेतू अनंततेत विलीन होऊ पाहात असतात. सामान्य अर्थाने त्यांना हेतू हे अभिधान लावताही येणार नाही.
स्वार्थ व परार्थ दर्शविणारे हेतू सौंदर्यसिद्धीचे कारक होतात पण ते सौंदर्य एका वैशिष्ट्याने, जणू काय एका वैगुण्यानेच भ्रष्ट झालेले असते. ते वैगुण्य म्हणजे उपयुक्ततेची दृष्टी. सौंदर्याचा उपयोग म्हणजेच उपभोग - हा त्याचा मुख्य विशेष नव्हे. किंबहुना उपयुक्ततावाद निर्माण झाला की सौंदर्य, तितक्या प्रमाणात हिणकस होऊ लागते.
उपयुक्ततावाद व सौंदर्यप्रतीती यांचा हा विरोध व या विरोधाची कारणे स्वयंस्पष्ट आहेत.
सौंदर्याच्या उपयोगाचा शोध सुरू झाला की सौंदर्याला द्वितीय स्थान प्राप्त झालेच.
सौंदर्य हे सौंदर्य म्हणून, एक स्वत:सिद्ध मूल्य म्हणून आदरणीय आहे. ते दुसर्या एखाद्या अर्थाचे गुलाम झाले की स्वत:च्या स्वरूपस्थानावरून त्याची पदच्युती होते.
अर्थात्, सौंदर्य जीवनाशी संबद्ध राहाणार व म्हणून जीवनाला त्याचा उपयोग व उपभोगही मिळणार. पण समग्र जीवनाशी त्याचा संबंध सयुक्तिक आहे. एखाद्या विलग जीवनांगासाठी नव्हे. इंद्रियतृप्तीला स्थान आहे पण विलग इंद्रियतृप्तीला नव्हे. बुद्धीसकट सर्व इंद्रियग्रामाला तृप्ती देण्याचे सामर्थ्य ज्या सौंदर्यप्रतीतीत असते तीच सर्वश्रेष्ठ सौंदर्यप्रतीती होय.
पण सौंदर्यप्रतीतीत बुद्धीचा अंतर्भाव केला की संयम व संयोजन, नीती व धर्म यांचा विनियोग क्रमप्राप्त ठरतो.
सौंदर्य हे एक स्वत:सिद्ध, स्वयंप्रकाश मूल्य आहे. जीवनासाठी सौंदर्य की सौंदर्यासाठी जीवन ही समस्या, सयुक्तिक म्हणजे तर्कशुद्ध नाही. आपण प्रमाद करतो तो हा की सौंदर्याला समग्र जीवनाशी समकेंद्र न करता जीवनातल्या एखाद्या गौण व एकांगी हेतूही संबद्ध करतो. उदाहरणार्थ, द्रव्यप्राप्ती किंवा इंद्रियतृप्ती.
सौंदर्यसाधना हा एक परमोच्च परमार्थ आहे. ‘तत् तु समन्वयात्।’ हे बादरायण व्यासांचे निराळ्या अर्थाने वापरलेले सूत्र सौंदर्यशास्त्रातही अक्षरश: खरे आहे.
सौंदर्यसाधनेत स्वकीय व्यक्तित्त्वाचा संपूर्ण स्वाहाकार करावा लागतो. अनंततेत विलीन व्हावे लागते. सौंदर्य-साधना ही खडतर वैराग्याने सफ़ल होते. क्षुद्र उपभोजकांच्या व उपयोजकांच्या पदरी निराशाच येते.
मानवी जीवनाच्या चलच्चित्रपटावर सौंदर्य सौदामिनीचे सलील लास्य पाहावयाचे असल्यास तिला स्वतंत्रतेच्या स्वयंप्रकाशात चमकत ठेवले पाहिजे.
ॐ ॐ ॐ