‘नहिं मरुं निर्जलं दृष्ट्या पुनर्दूरात् प्रतीयमानं जलं आदातुम् पातुम् वा विवेकी गच्छति।’ - शंकरानंदी
हे मृगजळ आहे असे समजल्यावर विचारी मनुष्य ते घरी आणण्यास किंवा पिण्यास धाव घेणार नाही.
आपण ज्या अनंत विलोभनांच्या मागे लागतो त्या विलोभक वस्तू, व्यक्ती अथवा व्यवहार यांचे अंतर्ज्ञान म्हणजेच मोक्ष होय.
बंधनाचे ज्ञान झाले की बद्धता नष्ट झालीच.
आपणाला जी आकर्षणे वाटतात, ज्यामुळे आपला तोल सुटून आपण खाली पडतो, आपला अध:पात होतो, ती आकर्षणे थोडी जवळून, चिकित्सक बुद्धीने न्याहाळली तर त्यांच्या ठिकाणी स्वयंसिद्ध, अनिवार्य अशी आकर्षकता नसल्याचेच आपल्या प्रत्ययाला येईल. आपण आकर्षकतेचे आरोप करून, दुसर्या वस्तू, व्यक्ती व व्यवहार यांच्या ठिकाणी आसक्त होतो. त्यांच्या गुलामगिरीचे पाश स्वत:भोवती निष्कारण घट्ट आवळून घेतो व वाटेल त्याचा आत्मनाश, सर्वनाश करून घेत असताना आपल्याला जाग येत नाही. सर्वस्व हानी झाली तरी अणूमात्र दिक्कत वाटत नाही.
पाहाणार्याच्या अर्धवट उघड्या डोळ्यांत आकर्षक वाटणार्या सौंदर्याचा जन्म होत असतो.
अर्धवट जाग्या मनात वैभवसुखाचे सुवर्णमेघ उदित होतात व तरंगत राहातात.
पूर्ण उघडलेल्या दृष्टीला, पुरती जाग आलेल्या मनाला, विलोभक सौंदर्यदृष्ये व वेडावणारी वैभवशिखरे प्रतीत होत नाहीत; कारण, प्रज्ञेच्या प्रकाशात, स्थानच्युत करणार्या कोणत्याही विलोभनाचे मोहतिमिर स्थिरावू शकत नाहीत.
विलोभने, मोहदृष्ये बहुतांशाने व्यक्तिनिष्ठ अनुभव असतात, वस्तुनिष्ठ नसतात.
जागृत दृष्टीला व प्रफ़ुल्ल प्रज्ञेला सौंदर्याची यथायोग्य प्रतीती येते, यथामूल्य आनंद होतो पण अवास्तव विलोभन निर्माण होत नाही, बेतालता येत नाही.
ताल सुटतो, तोल घसरतो तो स्वार्थपर व प्रमत्त अशा उपभोग बुद्धीने, विशुद्ध सौंदर्यदर्शनाने नव्हे.
सौंदर्य म्हणजे जे पागल करू शकते ते, ही व्याख्या सर्वथैव चुकीची आहे. मनुष्य पागल होतो तो स्वार्थी उपभोग लालसेने, सौंदर्याने नव्हे. खर्या सौंदर्याचे दर्शन माणसाला ईश्वरनिष्ठ करते, अंतर्मुख करते, दिव्य आनंदाची ओळख करून देते, चित्तवृत्ती प्रशांत व प्रसन्न करते. बेताल, बदचाल, पागल करते ते सौंदर्यदर्शन नव्हे. ती एक विकृती आहे, रोग आहे, बेलगाम देह-प्रवृत्तींचा आत्मनाशक व्यापार आहे.
सौंदर्याचे समदर्शन जीवनाला, मनोवृत्तींना उदात्त-त्व देते; समदर्शन म्हणजे जी प्रतीती येताना अंत:करण उद्ध्वस्त होत नाही, वृत्ती बेभान होत नाहीत ते.
व्यक्तिनिष्ठा व वस्तुनिष्ठा यांचे समीकरण ज्या प्रतीतीत सम-प्रमाणांमध्ये असते ते समदर्शन होय.
सामान्यत: आपण स्वार्थमूलक, वैयक्तिक, उपभोगप्रधान, अनुभव घेण्यात मग्न असतो.
वस्तुनिष्ठ अनुभव, सत्यप्रतिपादक प्रतीती घेण्याचा अभ्यास सदैव करीत राहिले पाहिजे.
वास्तववाद म्हणजे वस्तुनिष्ठ वस्तू व व्यक्ती यांचा यथार्थ, यथामूल्य सहसंबंध सिद्धवणे. हेच वास्तववादाचे रहस्य होय.
ॐ ॐ ॐ