अनुभव शब्दाचा अर्थ, न्यायदर्शनात व निरुक्तिशास्त्रात बुद्धी असा सांगितला आहे.
अनु म्हणजे नंतर, भव म्हणजे होणे. वस्तू व वृत्ती यांचा संबंध घटणे म्हणजे ‘प्रत्यक्षता’ व तो संबंध झाला आहे असे बुद्धीला वाटणे म्हणाजे अनुभव.
अनुभव हा बुद्धीलाच व्हावयाचा असतो.
बुद्धीचा व्यापार जड आहे व अनुभवात एक प्रकारची ऊब आहे. निराळीच प्रत्यक्षतेची उष्णता आहे असे विधान पुष्कळ वेळा केले जाते, पण ते सदोष आहे. ‘प्रत्यक्ष’ या अर्थाने अनुभव ह्या शब्दाची योजना अन्याय्य आहे.
अनुभव व बुद्धी ही दोन्ही पदे समकेंद्र व समपरिघ आहेत.
‘प्रत्यक्श’ म्हणजे इंद्रिये व विषय यांचा साक्षात् सबंध होय. प्रति+अक्ष=इंद्रियांत वस्तूंचा अंतर्भाव.
प्रत्यक्ष व अनुभव या पदांच्या अर्थांमध्ये भेद आहे. वस्तूचे प्रत्यक्ष होणे म्हणजे वस्तू अनुभवणे नव्हे. प्रत्यक्षा ‘नंतर’ होणार म्हणून त्याचे नाव ‘अनु’+भव व तो एक बुद्धीव्यवहार आहे.
वस्तुप्रतीती व ब्रह्मप्रतीती दोन्हीही सिद्ध असताना अनुभव नसतो म्हणजेच बुद्धीव्यापार नसतो.
अनुभव आला, झाला असे वाटणे म्हणजे वस्तुप्रतीती अथवा ब्रह्मप्रतीती त्या क्षणी नष्ट झाली आहे असे म्हणणे होय.
जीवन्मुक्तांच्या स्वभावसहज जीवनात विविध वस्तूंचा प्रत्यय व ब्रह्मप्रत्यय यात काहीच भेद नसतो.
‘यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधय:’ - श्री शंकराचार्य
जीवनाच्या सह्जतेत वस्तूंना विविधता नाही व म्हणून एकत्वही नाही; वस्तुप्रत्ययात भेदच नाही.
वस्तुवस्तूमधील भेद व वस्तू आणि ब्रह्म यातील भेद बुद्धी-व्यापारात, अनुभव-पद्धतीत निर्माण होतात.
ब्रह्मभाव सहज-सिद्ध, स्वत:-सिद्ध आहे. तो प्राप्त करावयाचा नसून अकारण प्राप्त झालेले अनुभव अथवा बुद्धीव्यापार दूर करावयाचे आहेत.
‘अनु’ टाकून केवळ ‘भव’ अथवा शुद्ध सत्+ता उरणे, स्फ़ुरणे म्हणजे मोक्ष.
अनुभवात आलेला ‘भव’ म्हणजे संसार होय. ‘अनु’ नसलेला भव, बुद्धीत निर्माण झालेला ‘प्रत्यक्षाचा’ जो पश्चाद्भाव, त्याचे विसर्जन झालेला भव, म्हणजे सत्+ता, स्व-स्वरूप, आत्मरूप, मूलचिती होय.
अनुभव शब्दाचा उपलब्धी असा एक पर्याय शब्द आहे - अननुभव, म्हणजे अनुपलब्धी, अनुभवाचा अभाव. घटाचा अनुभव किंवा ज्ञान न होणे हे घटाच्या अभावाचे ज्ञानच होय, घटाच्या नसण्याचे प्रमाण होय. अनुपलब्धी हे अभावप्रत्ययाचे प्रमाण होय. घटाच्या अभावाचे प्रमाण काय? घटाचा अननुभव, घटाची अनुपलब्धी.
मी विचारतो, विश्व आहे कोठे ? वस्तुभेद आहेत कोठे? विश्व, वस्तुभेद, व्यक्तिभेद हे बुद्धीव्यापाराने घटविले असतील, अनुभवात असतील. पण माझ्या प्रत्यक्तेत, प्रत्यक्षात, मूळ स्वरूपात त्यांची अनुपलब्धी असल्यामुळे त्यांचा अभावच सिद्ध होतो.
अर्थात्, ही वरील विचारसरणी देखील बुद्धीजन्य आहे, ज्ञानजन्य आहे, अनुभवजन्य आहे. पण ज्या बुद्धीज्ञानाने वस्तू भेदांची, म्हणजेच विश्वाची सिद्धी झाली होती त्याच बुद्धीज्ञानाने त्याच विश्वाचा अभावही सिद्ध झाला आहे.
ज्या ‘प्रमाणा’ने भाव व अभाव दोन्ही सिद्ध होतात ते प्रमाण किती विश्वसनीय आहे?
शुद्ध विचार करण्याची शक्ती व सवय असेल तर ‘विश्वाभास मावळण्याची’ (ज्ञानेश्वर) युक्ती म्हणजे बुद्धी होय हे सहज पटेल. ‘मोक्ष ज्ञानानेच मिळेल’ हे आद्य शंकराचार्यांचे वचन किती यथार्थ आहे! ‘ज्ञानान्मोक्ष।’
ॐ ॐ ॐ