लोकसमुदाय हे संस्कृतीचे अधिष्ठान आहे.
मानवी जीवनाच्या स्वभावसिद्ध सामुदायिक स्वरूपामुळे व्यक्तिमात्राच्या ठिकाणी विशिष्ट गुणांची अभिवृद्धी होणे नैसर्गिक, क्रमप्राप्त व अवश्य असते.
हे गुण एका अर्थाने व्यक्तित्वाचा संकोच करतात, पण दुसर्या अर्थाने त्याच व्यक्तित्वाचा विकास साधीत असतात.
सामुदायिक ध्येयासाठी ज्या प्रमाणात व्यक्तित्वाचे निवेदन होईल, अगदी त्याच प्रमाणात व्यक्तित्वाचा विकास होत असतो.
धर्म, शास्त्रे, कला इत्यादी आविर्भाव एकाकी वैयक्तिक जीवनाला आवश्यक नाहीत; किंबहुना त्यांची निर्मितीदेखील, समष्टीनिष्ठेशिवाय असंभवनीय आहे.
समष्टीसेवेत व्यक्तित्वाचा स्वाहाकार झाला पाहिजे. या स्वाहाकारातच व्यक्तित्वाची अंतिम फलश्रुती आहे. उलट पक्षी, कोणत्याही सामाजिक व्यवस्थापनेचा मूल-हेतू मानवी व्यक्तित्वाची अंतिम फलश्रुती आहे. कोणत्याही सामाजिक क्रांतीचा व सामाजिक व्यवस्थापनेचा मूल हेतू मानवी व्यक्तित्वाचा संपूर्ण विकास हाच असला पाहिजे, दुसरा कोणताही असता कामा नये. वैयक्तिक अथवा सामुदायिक स्वार्थासाठी कोणतीही संघटना क्रांती अथवा व्यवस्थापन उभारणे हे मानवी व्यक्तित्वाच्या संपूर्ण विकासास अपकारक आहे. अखिल मानवता, म्हणजेच सर्वसाधारण, सर्वसामान्य मानवी व्यक्तित्व. ज्या संघटनेने, क्रांतीने अथवा व्यवस्थपनाने हे व्यक्तिमत्त्व अधिक विकसित म्हणजे सहतंत्रशील होईल तीच संघटना, क्रांती किंवा तेच व्यवस्थापन ‘सांस्कृतिक’ या संज्ञेस पात्र ठरेल. संकुचित स्वार्थाच्या सिद्धीसाठी परार्थाची हानी क्रमप्राप्त असते.
-२-
सह-तंत्रतेच्या प्रक्रियेने जे विकसनात्मक आविष्कार सिद्ध होतात ती संस्कृती. ‘सह-तंत्रता’ हे ध्येय स्वतंत्रतेहून अधिक व्यापक आहे. व्यक्ती अथवा समाज स्वतंत्र होणे ही अंतिम अवस्था नव्हे. सह-तंत्रतेला आवश्यक असणारी पूर्वसाधना म्हणजे स्व-तंत्रता. स्वतंत्र व्यक्ती अथवा राष्ट्रे, संस्कृती सेवेला उपकारक होतीलच असा नियम नाही. सह-तंत्रतेशिवाय संस्कृतीची सिद्धी नाही.
स्वतंत्र झाल्यावर खर्या अर्थाने सह-तंत्र होता येते; व सह-तंत्र झाल्यावर जे आविष्कार (Expressions) सेवावृत्तीने प्रकट होतात, जे व्यापार संकुचित स्वार्थाने लिडबिडलेले नसतात, ज्या कृतींत मानवी व्यक्तित्वातील परमोच्च प्रवृत्ती प्रतिबिंबित झालेल्या असतात - ते आविष्कार, ते व्यापार, व त्या प्रवृत्ती संस्कृतीच्या मंगलमूर्तीची घटकद्रव्ये होऊ शकतात.
तत्वत: व्यक्ती व समाज, व्यष्टी व समष्टी ही दोन्ही एकाच द्रव्याचे गुणविशेष आहेत, एकाच वस्तूची दोन दर्शने आहेत. विचार-प्रक्रियेसाठी त्यांच्यामध्ये भेद व प्रतियोग कल्पिणे आवश्यक होऊन राहाते. पण व्यक्तींचाच व व्यक्तींसाठीच समाज घडलेला असतो हा सिद्धांत स्वयंस्पष्ट आहे. ‘व्यक्ती की समाज?’ हा प्रश्न, ही समस्या, न्याय-निषिद्ध आहे. व्यक्ती व समाज एक समयाने व एक संकल्पाने चिंतिले पाहिजेत. व्यक्ती आणि व्यक्ती, व्यक्ती आणि समाज यांच्यामधील उत्तरोत्तर वृद्धींगत होणार्या सह-तंत्रतेचा परिणाम म्हणजे संस्कृती. संस्कृती ही मानवसमाजाचे साध्य आहे, साधन नव्हे.
-३-
अधिकाधिक संग्राहक व समन्वित प्रज्ञा हेच मानवी संस्कृतीचे प्रत्यक्ष स्वरूप-दर्शन होय.
समाजातील कोणत्याही एका व्यक्तीचा विशिष्ट म्हणजे बौद्धिक, कलात्मक किंवा आध्यात्मिक विकास, म्हणजे सर्व समाजाचाच तो विकास असतो; कारण अनुकूल सामाजिक जीवनाची श्रेणी श्रेष्ष्ठतर होणे हेच विशिष्ट वैयक्तिक विकासाचे इष्टतम पर्यवसान आहे.
सर्व मानवी समाज हा एकाच द्रव्याने व गुण समुच्चयाने घडलेला आहे.
विशिष्ट भौगोलिक व ऐतिहासिक परिस्थितीमुळे काही मनुष्य-संघ विशेष गुणांना प्रकर्षाने प्रकट करतात, पण हे गुण अ-प्राथमिक, आनुषंगिक असतात, प्राथमिक किंवा मूलभूत नसतात.
भारतीय मानव समाजाला लाधलेली अंतर्मुखता किंवा अध्यात्मनिष्ठा, इतिहासकालापासून उपलब्ध असलेल्या भौगोलिक व ऐतिहासिक परिस्थितीने निर्माण केली आहे. भारतेतर आधुनिक पाश्चिमात्त्य समाजात ही अंतर्मुखता प्रयत्नसाध्य निश्चित आहे; असंभाव्य नाहीच नाही. एका मानवसंघाला उपलब्ध असलेला गुणविशेष, दुसर्या कोणत्याही मानवसंघाला प्रयत्नप्राप्त आहे, कारण मानवमात्र स्वभावत: समद्रव्य व समगुण आहे. भेद हे अनुषंगाने आलेले असतात; व समन्वय प्रक्रियेने, एकतेला विनाशक न ठरता उपकारकच ठरतात.
वैशिष्ट्य म्हणजे विभजन नव्हे. समानाधिकरणाशिवाय वैशिष्ट्याला अर्थवत्ता नाही.
-४-
स्वावलंबनापेक्षा सह-आलंबन (Inter-Dependence) ही अधिक व्यापक व अधिक मूलभूत अशी वृत्ती आहे.
स्वतंत्रतेपेक्षा सह-तंत्रता हे अधिक मूलभूत व अधिक महनीय मूल्य आहे.
राष्ट्रीय स्वातंत्र्य हे देखील अखिल मानव समाजाच्या स्वातंत्र्याला पोषक असले पाहिजे.
संघ-प्रकृती, संघ-प्रवृत्ती व संघ-संस्कृती ही मानवतेच्या सर्व-सन्मुख, सर्व संग्राहक संस्कृतीला उपकारक झाली पाहिजे.
भारतीय मानवसंघाला आता स्व-तंत्रता लाधली आहे. यापुढे सह-तंत्रतेची साधना आचरणे क्रमप्राप्त आहे. दुसर्या लोकसमूहाला परतंत्र करू पाहाणारे राष्ट्रीय स्वातंत्र्य मानवी संस्कृतीच्या दृष्टीने एक अनिष्ट आपत्ती होय. विविध मानवसंघांनी, अखिल मानवतेच्या सह-तंत्रतेला व संस्कृतीला उपकारक अशी स्वत:ची संघटना व व्यवस्थापना केली पाहिजे.
सह-तंत्रतेच्या साधनेला पोषक असणार्या गुणांचे निष्पादन व वर्धापन करणे हे सर्व संघनिष्ठ आयोजनांचे आद्य उद्दीष्ट असले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अथवा दुसरी कोणतीही संघटना जेवढी अधिक संग्रहक्षम असेल. अधिकाधिक व्यापक व विशाल होत राहील, तेवढी यशस्वितेची निश्चिती अधिक राहील.
‘राष्ट्रीय’ हे विशेषण ध्येयवाचक नाही - नसावे; ते केवळ स्थितीवाचक, परिस्थितीवाचक आहे. भारतीय राष्ट्रात जन्मलेली ही संस्था आहे, एवढाच अर्थबोध ‘राष्ट्रीय’ या संज्ञेने अभिप्रेत आहे.
‘स्वयंसेवक’ या शब्दसमूहाने कार्यपद्धतीची लक्षणा साधण्यात आली आहे. स्वतंत्र अंत:स्फ़ूर्तीने सेवाधर्माचा अंगिकार करणारी व्यक्ती एवढा अर्थभाव त्या शब्दात आहे.
संघनिष्ठा ही ‘स्वेच्छा प्रारब्ध’ असावी, ‘परेच्छा प्रारब्ध’ नसावी असा कटाक्ष आहे. आग्रह आहे व तो आग्रह व्यक्तिमात्राच्या आध्यात्मिक, नैतिक प्रकर्षाला आवश्यक असतो. स्वयंसिद्ध असलेल्या व्यक्तीने आचरलेली सेवाच संस्कृतीचे घटक-द्रव्य होऊ शकते.
; ‘संघ’ या पदाने ‘एकते’चे सूचन होते. प्रत्येक संघ ही अंतिम अखिल मानवतेच्या एकतेचे प्रतीक आहे. दुसर्या संघटनांचा विरोध हा कोणत्याही संघाचा मूलभूत हेतू असू नये.
एकतेची प्रतीके, साहाय्यके, प्रतिबिंबे या एकाच अर्थाने व हेतूने विविध संघांची निर्मिती व उपस्थिती असावी.
‘संगच्छध्वम्, संवदध्वम्, सं वो मनांसि जानताम्।’ तुमच्या गती, उक्ती व प्रवृत्ती एकतेला पोषक असाव्यात हा वैदिक द्रष्ट्याचा आदेश मनुष्यमात्राला किती उपकारक आहे. ‘कृण्वन्तु विश्वमार्यम्।’ सर्व विश्वाला आर्यत्व देऊ इच्छिणार्या द्रष्ट्यांचे क्षितिज किती विशाल होते हे स्वयंस्पष्ट आहे.
रा.स्व.संघ या ध्येयाकडे जाऊ पाहात आहे व प्रामाणिक वृतीने तो तिकडे जात असेल तर ती किती अभिनंदनीय गोष्ट आहे.
संस्कृती व संस्कार ही दोन्ही पदे समानार्थक आहेत. ज्या कर्माने ‘गुणांतरजनन’ व ‘दोषापनयन’ होते ते कर्म म्हणजे संस्कार, अशी तंत्रवार्तिककारांनी संस्कार शब्दाची लक्षणा केली आहे.
संस्कृती म्हणजे उच्च, व्यापक, संग्राहक व सहतंत्रतेच्या साधनेने सिद्ध होणारे आविष्कार.
व्रात्य म्हणजे ज्या व्यक्तीवर संस्कार झालेले नाहीत ती व्यक्ती.
जी व्यक्ती विकासोन्मुख नाही, संकुचित स्वार्थाने लिडबिडलेली आहे, ज्या व्यक्तीच्या वृत्ती, उक्ती व कृती उदार आणि विशाल नाहीत; ती अथवा त्या व्यक्ती प्रात्य होत. आजच्या क्षणाला कित्येक राष्ट्रे, राष्ट्र संघ, मनुष्यसमूह व संघटना व्रात्य संघ या नावास योग्य आहेत.
संस्कृतीनिष्ठ सह-तंत्रता हेच मानवमात्राचे परमोच्च ध्येय आहे.
‘सह नाववतु, सह ना भुनक्तु, सहवीर्यं करवावहै॥’
ॐ ॐ ॐ