प्रकाशित साहित्य

विराग

    विराग म्हणजे वैराग्य.     रागाच अर्थ रंग. रंग नसलेली, विकृती नसलेली, चित्ताची मूलस्थिती किंवा सहजता हेच वैराग्य होय. ‘सह्जता’ अशी काही अवस्था असू शकते, हेच आपणास माहीत नसते; कुणी सांगितले तर पटत नाही.     विकृती हीच आपली प्रकृती, सहज-स्थिती झालेली असते! रोग हेच आपले आरोग्य!     सहज-स्थितीच्या शक्यतेबद्दलच संशय उत्पन्न होतो. अशा वेळी एक प्रतीक म्हणजे उदाहरण अत्यंत उपकारक व प्रकाशक वाटेल. कंडू नसताना त्वचेची स्थिती ही सहजता. कंडू उत्पन्न होणे ही विकृती.     राग-द्वेषादी विकार, हे चित्ताचे क्षोभ अथवा कंडू होत. हे नसले तरी चित्त असू शकते याची आपणास कल्पनाच करवत नाही.     कंड नसता जशी त्वचा असू शकते - आपणास जसा कंड नसलेल्या त्वचेचा अनुभव आहे - त्याचप्रमाणे क्षोभ नसलेल्या चित्ताचाही थोडा तरी अनुभव प्रत्येक व्यक्तीला असतो; हीच सहजता, हेच वैराग्य अथवा विराग.

[२]

    विकार देखील सहजच आहेत - असा एक विकल्प मनात येतो. ते तरी आले कोठून? सहजतेत, निसर्गातच त्यांची निर्मिती आहे. अगदी खरे. पण, सर्व दोष, अनिष्टे, वैषम्य, नैघृण्य (निर्दयता) निसर्गातच आहेत म्हणून ती आवश्यक ठरत नाहीत.     सर्व रोगदेखील नैसर्गिकच आहेत म्हणून स्वास्थ्य घालवून आपल्या शरीरात रोग उत्पन्न करण्याचा सहेतुक प्रयत्न आपण करीत नाही     मृत्यूही नैसर्गिक आहे म्हणून जन्मत:च मृत्यूवश होणे हे आपले ध्येय नसते. प्रसूतिगृहातच प्र-मृति गृहाचा, स्मशानाचा अंतर्भाव आपण करत नाही. आंधळे, बहिरे असणे हे गोष्ट नैसर्गिक, म्हणजे निसर्गातली आहे. म्हणून डोळे, कान जन्मत:च फ़ोडून घेण्याची धांदल कुणी करतो का?     प्रकृती व विकृती, सहजता व कृत्रिमता, निसर्ग व प्रतिसर्ग यांतील भेद लक्षात घेणे याचे नाव विवेक.     विवेक म्हणजे वेगळीक करणे अथवा निवडणे. विराग म्हणजे विवेकजन्य मन:स्थिती.

[३]

    स्त्रैणता ही नैसर्गिक आहे, निसर्गजन्य आहे म्हणून आवश्यक आहे, अपरिहार्य आहे, ध्येयस्वरूप आहे असे थोडेच ठरते?     स्त्री-निष्ठा किंवा पुरुष-निष्ठा ही निसर्गाचे एक उपकरण, साधन आहे. संतान-निर्मिती ही निसर्गातल्या वैशिष्ट्यांची (Species) संगोपनप्रक्रिया आहे. स्त्रीपुरुषांच्या परस्पर निष्ठेमुळे ही वैशिष्ट्ये (जातीवैशिष्ट्ये) सिद्ध व संवर्धित होत आहेत.     गृहस्थाश्रम संतती निर्माण करून जातीवैशिष्ट्ये सिद्ध ठेवतो. ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास हे तीन आश्रम उपलब्ध, सिद्ध असलेली जातीवैशिष्ट्ये, अधिकाधिक उन्नत, उच्चतर करू पाहातात.     स्त्रीनिष्ठेचा किंवा पुरुषनिष्ठेचा मुख्य हेतू वैशिष्ट्य-संतती, वंश-विशेषाची परंपरा निर्माण करणे, एवढाच आहे.     हा हेतू साधला जावा म्हणून निसर्गाने स्त्रीनिष्ठा सुखेत्पादक केली आहे. पण, मुख्य व गौण यांतला भेद आपण विसरतो. हीच विवेकभ्रष्टता.     स्त्रीनिष्ठा सुखकारक असते याचा अर्थ ‘सुखकारकता म्हणजे स्त्रीनिष्ठा’ असा होत नाही. स्त्रीनिष्ठेशिवाय आनंदच नाही अशी आपली समजूत होऊन बसते. हा प्रमाद आहे. ब्रह्मचर्य किंवा वानप्रस्थ-संन्यास ह्या जीवनपद्धती स्त्रीनिष्ठेपेक्षाही अधिक आनंददायी असू शकतील ही कल्पनाच आपणास करवत नाही. स्त्रीनिष्ठेपेक्षाही स्व-निष्ठा अधिक साहजिक व अधिक मूलभूत असणार, हे स्वयंस्पष्ट आहे.     ‘आत्मवशता हे सुख, परवशता हे दु:ख’ हे भगवान मनूचे व वेदव्यासांचे सूत्र प्रसिद्धच आहे.     स्व-निष्ठा ही स्त्रीनिष्ठेपेक्षाही अधिक साहजिक, प्राकृतिक अवस्था आहे. स्व-निष्ठा ही साक्षात्‌ सहजता आहे. कंडूरहित त्वचा, तशी विकाररहित, स्त्रीनिष्ठा विरहित स्व-निष्ठा, स्वत:च्या चित्ताची अवस्था, हाच विराग.     विराग ही निषेधात्मक कल्पित स्थिती नाही. ती एक विधायक (Positive) स्थिती आहे. विराग किंवा वैराग्य ही कृत्रिम, अनैसर्गिक स्थिती नसून स्त्रीनिष्ठा, स्त्रैणता हीच कृत्रिम, तुलनेने कमी साहजिक व कमी आवश्यक अशी स्थिती आहे. विराग हाच उत्कट आनंदाचा झरा आहे. विराग य़ा शब्दाने काहीतरी कृत्रिम, आचरट आचार किंवा भगवी वस्त्रे, संन्यास वगैरे कल्पना एकदम मनात येतात. पण, हे मोहकलिल आहे. विशुद्ध विवेक हेच सांगतो की; ‘विराग किंवा सहजस्थिती हाच अमृतानुभव होय.’

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search