प्रकाशित साहित्य

इच्छा

इच्छा ही जीवनाची आद्यशक्ती आहे.

    विश्वनिर्मिती ही ईश्वराच्या इच्छाशक्तीचा परिणाम आहे.

    इच्छाशक्तीचे विकसन काही स्वयंभू, स्वाभाविक नियमांनी होऊ शकते.

या नियमांचा एकंकार म्हणजे धर्म.

    इच्छाशक्ती सामान्यत: एकच असली तरी इच्छाविषयांच्या विविधतेमुळे इच्छाशक्तीलाही विविध स्वरूपे प्राप्त होतात. इच्छा ही सर्व इंद्रियांची स्वामिनी आहे.

    ‘अर्थ’ शब्दाची व्युत्पत्ती - ‘इंद्रियाणि ऋच्छन्ति (गच्छन्ति) यत्र।’ अशी आहे.

    पुरुषमात्राला जे चार सहज हेतू असतात त्यांना पुरुषार्थ म्हणतात.

    धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सु-प्रसिद्ध आहेत.

    धर्म म्हणजे इच्छाशक्तीच्या स्वभावगुणांचे शास्त्र.

    अर्थ म्हणजे इच्छाशक्तीच्या विकसनास लागणारे द्रव्य. अर्थात्‌ इंद्रियनिष्ठ अनुभवांना कारक असणारे, साधनभूत होणारे, बाह्य विषय व त्यांचा उपभोग.

    काम म्हणजे इंद्रियतृप्ती शोधणारे इच्छाशक्तीचे विशिष्ट स्वरूप.

    मोक्ष म्हणजे स्वभाव-स्वरूपाची उपलब्धी. इच्छाशक्तीने निर्माण केलेल्या आभासमय सं-बंधांपासून, बंधनांपासून सुटका.

    इच्छाशक्ती ही विशुद्ध परमात्मतत्वाची व आत्मतत्वाची सहजप्रकृती आहे, स्वभावस्फ़ुरण आहे.

    परमात्मतत्व अमर्याद आहे. स्फ़ुरणक्रियेमुळे विविधत्वाचा, अनेकत्वाचा आभास निर्माण होतो व परमात्मतत्व अनेक जीवात्मतत्त्वांच्या रूपात आभासू लागते.

    जीवात्मरूपे, परस्परांमधील आभासिक भेदांमुळे आभासिक संयोग-वियोग, आभासिक आकर्षण-विकर्षण, प्रेम-द्वेष निर्माण करतात.

    आभासांच्या पुनरावृत्तीने कर्मबंध व संस्कारवलये निर्माण होतात.

    हे आभासात्मक अनुबंध दूर करणे व मूलस्वरूपाची पुनर्लब्धी करणे हा जीवमात्राचा मोक्ष - म्हणजे परमपुरुषार्थ होय.

    इच्छाशक्तीच्या साहाय्यानेच आभासात्मक विकृतीचा म्हणजे बंधसमुच्चयाचा निरास करावयाचा असतो.

    शिक्षाशास्त्र, नीतीशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्म ही सर्व इच्छाशक्तीचे वि-नयन अथवा विशिष्ट तर्‍हेने विकास साधण्याची ससधने होत.

    ही सर्व शास्त्रे प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक साधनेची केवळ उपांगे आहेत.

    तीव्रतम इच्छाशक्तीचे विनयनाबरोबर आपातत: बंधसमुच्चयाचा निरास होत असतो.

    केवळ शब्दबोधाने इच्छाशक्तीचे नियमन होत नाही. यामुळे शब्दपंडित नेहमीच अयशस्वी होतात.

    तपश्चर्या या शब्दाचा अर्थ इच्छाशक्तीचे तपन अर्थात्‌ उष्णीकरण व प्रकाशन हा आहे.

    तपश्चर्येने अखिल (Integral) व्यक्तित्वाचे विकसन होते.

    आधुनिक बौद्धिक शिक्षणाने केवळ बौद्धिक अंगाचे विकसन होते, त्यामुळे वैयक्तिक शीलावर व चारित्र्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही.

    प्राचीन नैय्यायिक विश्वनाथ याने बुद्धी व भावना यांच्याशी असलेला इच्छाशक्तीचा घनिष्ठ संबंध लक्षात घेऊन आत्मसाधनेची रूपरेषा आखली आहे.

    जगदीश भट्टाचार्याने प्रार्थनेचे रहस्य विशद करताना ‘स्वत:च्या इच्छाशक्तीचे प्रबोधन’ -‘स्वीय इच्छा प्रबोधनम्‌।’ असे प्रार्थना शब्दावर भाष्य केले आहे.

    धर्मशास्त्रानुरूप अर्थाची कामना केली तर वासनेची पूर्ती होऊन त्या वासनेच्या बंधापासून मोक्ष मिळतो. हे सूत्र पुरुषार्थ प्राप्तीच्या साधनेत महत्त्वाचे व मध्यवर्ती आहे.

    पुरुषमात्राने, व्यक्तिमात्राने अंतिम पुरुषार्थाचे, मोक्षाचे साधन करणे हे जीवनाचे साफ़ल्य होय.

    प्रार्थनेने अथवा इच्छाशक्तीच्या प्र-बोधनाने, प्र-दीपनाने सर्व पुरुषार्थ सिद्ध होत असतात.

    इच्छाशक्तीचे प्र-दीपन हाच दीपावलीत लावावयाचा दीप होय.

    आजच्या स्वातंत्र्य युगात आपल्या सदिच्छांचे प्र-दीपन करून त्या दिव्य ज्योतींनी आपण सर्व दीपावली साजरी करू या. हीच खरी सामुदायिक प्रार्थना होईल. आपल्या स्वाभाविक विशुद्ध इच्छा सिद्ध-सफ़ल होणे हा त्यांचा स्वभाव-धर्म आहे.

    कृत्रिम, विकृत अशा स्वरूपाच्या इच्छा, विपरीत वासना, निषिद्ध निष्फ़ल होणे हाही त्यांचा स्वभाव-धर्म आहे.

    श्रीज्ञानेश्वरांनी हा सिद्धांत घेऊनच ज्याची जी वांच्छा असेल ती सफ़ल होवो असा सर्वोदय सिद्धविणारा आशीर्वाद दिला आहे.

    ‘जो जो वांच्छील तो ते लाहो, प्राणिजात।’ - ज्ञानेश्वरी

 

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search