प्रकाशित साहित्य

दर्पण योग

 प्रत्येक वस्तूची प्रतीती हा एक दर्पण आहे. या प्रतीतीत वस्तूच्या ज्ञानापेक्षा स्वत:च्या तत्कालीन आत्मस्थितीचे भान स्पष्टतर व तीव्रतर असते.

 

 माझ्या अपेक्षेच्या चौकटीत माझा प्रयेक वस्तुप्रत्यय मर्यादित व सार्थ झालेला असतो. माझ्या अपेक्षेमुळेच त्या वस्तुप्रत्ययाला अर्थवत्ता व वैशिष्ट्य लाधलेले असते.

 

 वास्तवतेत वासनेचा, वस्तुज्ञानात आत्मभानाचा, सत्यकथेत कपोलकल्पनेचा, नीतीत प्रीतीचाच अधिकांश असतो.

 

 आरशात पाहाताना एकतर त्याची काच मी प्रथम फ़ोडतो किंवा त्याचा लाकडी पार्श्वभाग मी समोर धरून बसतो.

 

 अर्थात माझा चेहरा दुभंगला गेला अथवा दृष्टीला मुखबिंब दिसले नाही तर त्यात नवल कसले?

 

 अगदी असाच प्रकार माझ्या वस्तुप्रीतीच्या बाबतीत होत असतो.

 

 आत्मानुभूतीचे निरनिराळे खंड पाडल्यामुळेच वस्तूंमध्ये द्वैत, विविधत्व, वैशिष्ट्य येते; अथवा त्या वस्तू, वृत्तीज्ञानाचे विषय म्हणून ग्रहण केल्यामुळेच त्यांना जडत्व येते.

 

 स्वभावत: एकजिनसी व सलग असलेल्या प्रतीतीचा दर्पण फ़ोडला तर वस्तू व मी निरनिराळे होतो.

 

 प्रतीतीला न दुभंगविता अनुभविली तर वस्तूचे व माझे तादात्म्य, एकरूपता, चिन्मयत्व, सच्चिदानंदत्व सहजच अनुभविता येते.

 

 मला आरशात दिसणारा चेहरा . . . दुसर्‍या कोणाचा थोडाच असतो! तो, तेथे आरशात दिसलेला चेहरा माझाच असतो - तो मीच असतो.

 

 प्रत्येक वस्तू तेथे दूर व बाहेर असलेली वाटली तरी ती माझ्या ज्ञानदर्पणात माझेच आत्मबिंब प्रकट करीत असते.

 

 वस्तू तादात्म्याने पाहिली तर तिचे चिन्मयत्व, सचेतनत्व सहजसिद्ध व सहजस्पष्ट अनुभविता येते.

 

 वस्तू पाठमोरी, उलट्या बाजूने पाहिली तरच ती जड दिसते व वाटते. समोरून व सहजभावात पाहिली तर माझेच स्वरूप, माझेच चिन्मयत्व, माझेच सच्चिदानंदरूप दर्शविते.

 

 प्रत्येक वस्तुप्रतीती म्हणजे माझे आत्मतत्त्व प्रतिबिंबित करणारा दर्पण होय.

 

 वस्तुमात्र हा एक खरोखरच दर्पण - आरसा आहे. एका आरशात माझा एकच चेहरा मी अनेक वेळा पाहतो.

 

 आत्मानुभव म्हणजे अनेक वस्तूंच्या व अनेक व्यक्तींच्या चेहर्‍यात फ़क्त एकच आरसा दिसणे व त्या आरशात केवळ एकच आत्मतत्त्व प्रतिबिंबलेले असणे.

 

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search