एका पडक्या देवळात ती भंगलेली घंटा दिसली.
निर्नाद झालेल्या त्या घंटेने काय संदेश दिला?
मौन, मौन, मौन.
मौन अवस्थात्रयाचा लय करून अखंडार्थ सुचविते. मौनाची साधना अत्यंत प्रभावी आहे, पण मौन हे सहेतुक व निर्विषय असावे.
मौन म्हणजे अंतर्मुखतेचा अभ्यास.
अंतर्मुखता या शब्दाचा अर्थ आत्मसन्मुखता, अर्थात विषयनिष्ठेचा व्युत्क्रम!
अंत:करणाच्या वृत्तींची विषयनिष्ठा ही धारावाही स्वरूपाची अखंड सन्ततीरूप सरळ रेषा नव्हे.
वृत्ती म्हणजे विषयोन्मुख अंत:करनाचे वलय, हीच जड-चेतनाची ग्रंथी होय.
वृत्तीचे स्वरूप वलयात्मक असल्यामुळे दोन वृत्तींमधले अंतर, अवकाश सहज-सिद्ध आहे. या अवकाशाची प्रतीती होत असता पुन: वृत्तीप्रवाह निर्माण होता कामा नये. लयाचे स्वरूप स्थलकालाचे अतीत-त्व हे आहे.
विश्वाभास मावळविण्याची, ब्राह्मी स्थिती अनुभवण्याची ही प्रक्रिया आहे.
ॐ ॐ ॐ