उच्चोत्तम विचारांचे दाणे रक्तात भिजत घालावे लागतात - तरच त्यांना कोंब फ़ुटतो.
रक्त हे जीवनाचे प्रात्यक्षिक व प्रतीक आहे.
जीवन रक्तातून वहाते, रक्तात सळसळते, रक्ताने पुष्ट होते, रक्तात थिजते व रक्तातच नष्ट पावून पुनश्च नवजीवनात अवतीर्ण होते.
रक्तात जन्मलेले विचार जीवनाला पराक्रमची उष्णिमा आणतात.
केवळ वाचनाने व अध्ययनाने, मेंदूत जन्मलेले विचार मेंदूतच कुजून जातात.
मेंदूत उद्भवणारे विचार हृदयाच्या स्पंदनांचा ताल ऐकू लागले, शकले तरच त्यांना चैतन्य लाभते; एरवी ते केसाखालच्या कवटीत मृतप्राय पडलेले रहातात.
रक्तमांसाच्या चिखलात जेव्हा विशाल विचारांची बीजे रोवावी तेव्हा, आणि तेव्हाच हृदयपालट होऊ शकतो.
धमन्यांमधून विचार उद्भवले तर, त्यांची शक्ती विश्वविजयी असते. त्यांचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष परमेश्वरालाही असत नाही.
परम-ईश्वर तरी कोण आहे?
ईश म्हणजे सत्तावान, सामर्थ्यशील तत्त्व आणि शक्तीचा साक्षात्कार-रक्तात सिद्ध होत असतो.
सूर्यनारायण, प्रथमत: रक्तपान करतो. म्हणूनच त्याला तीव्र संवेग लाभतो व अथांग नभोवितानाचे आक्रमण करता येते. ही कवीकल्पना असली तरी जीवनातले सत्य प्रकटविणारी आहे.
रक्तातूनच अनुरक्ती म्हणजे प्रीती आणि भक्तीही निर्माण होते.
भावनांची, मनोविकारांची व विचारशक्तीची नामरूपे अनंत असली तरी सर्वांची गंगोत्री, मूळ उगम, मूळ मानवी रक्ताच्या जाह्नवीत आहे. रक्ताने अभिषिक्त झालेली ज्ञानेश्वरी-ज्ञानशक्ती
क्रियाशक्तीत रूपांतरित होऊ शकते.
पाण्यापेक्षा रक्त घनतर असते म्हणून क्रांतीवीर ध्येयसूर्याला रक्ताचे अर्घ्यदान करतात.
क्राम्तीवीरच काय, शांतीवीरदेखील स्वत:च्या रक्ताने शिजवलेली परिपक्व प्रज्ञा नैवेद्य म्हणून मानवतेला समर्पण करतात. तेव्हाच अभिनव युगधर्माचा अवतार होतो.
रक्ताचा टिळा लावल्याबरोबर पुरुषोत्तमाचा पुरुषाकार कोठल्याही मानवाच्या अंतरंगात संचार करू शकतो.
विशाल स्वप्ने साकार करावयाची असतील तर रक्ताने विचार करण्याचे कला-तंत्र शिकलेच पाहिजे. भेकडपणाने, चोरटेपणाने रक्तपात करीत सुटणे म्हणजे रक्ताने विचार करने नव्हे.
उच्चोतुंग विशाल जीवनाचे स्वप्न रक्तात भिनविले पाहिजे. सहजीविका व सहशांती स्वत:च्या धमन्यांतून नाचली पाहिजे.
तेव्हाच ती वास्तवतेत अवतरेल.
ॐ ॐ ॐ