‘प्रज्ञानं ब्रह्म’ हे ऋग्वेदातील महावाक्य आहे. प्रज्ञान म्हणजे ज्ञानाचे ज्ञान; ‘मला ज्ञान आहे’ हे ज्ञान. याला इंग्रजीत - Self-Consciousness किंवा Reflective-Cognition असे म्हटले जाते. ‘प्रतिभूतं ज्ञानम्’ अथवा ‘प्रकृष्टं ज्ञानम्’ या निरुक्ती-भाष्यात वरील अर्थ अभिप्रेत आहे.
मानवेतर सृष्टीत चैतन्य आहे व ज्ञानशक्तीही आढळते. काही पशुयोनीत विज्ञानशक्तीही असते. पण ‘प्रज्ञान’ हे मानव्याचेच विशेषण आहे.
‘ज्ञान’ म्हणजे सामान्य ज्ञान; ‘प्रज्ञान’ म्हणजे ज्ञानाचे ज्ञान, ज्ञानाची ज्ञानात्मक प्रतिक्रिया; मला ज्ञान झाले आहे व होणार या आकाराचे ज्ञान, अर्थात शक्तीचा जातीप्रत्यय; ज्ञानशक्तीचे सामान्यत्वाने ज्ञान.
प्रज्ञानाच्या भूमिकेवरून जीवनव्यवहार करणे, म्हणजेच
जीवनमुक्तांचे आचरणात प्रज्ञानाचे अनुसंधान अखंड असते, ज्ञानकलेच्या सर्वस्पर्शित्वाचे, सर्वंकषत्वाचे ज्ञान अ-त्रुटित असते.
प्रज्ञानाच्या चंद्रलेखेत (लेखा म्हणजे रेषा) सारे विषयविश्व अ-स्वतंत्र, अ-तीव्र, मंदशीतल स्वरूपात उपस्थित असते. प्र+ज्ञान भूमिकेवर विषयश्रेणीची ज्ञाननिष्ठा अथवा वस्तूंचे ज्ञानकलेवरील अवलंबन स्पष्टत: प्रतीत होत असल्यामुळे अनासक्ती, विषय-विराग सहज सुलभ असतो.
माझ्या ज्ञानात विषय सिद्ध होतात व आकर्षक होतात, माझे ज्ञानच त्यांना आकार व आकर्षकत्व देते हे सत्य पटल्यामुळे विषयग्राह, विषयांची ओढ बळकट, जोरकस होऊ शकत नाही.
सत् म्हणाजे अस्तित्व आणि आनंद म्हणजे उपभोग. सच्चिदानंद शब्दातील या पूर्वोत्तर पदांची सिद्धी ‘चित् म्हणजे ज्ञानशक्ती’ या मध्यम पदावर अवलंबून आहे.
‘चित्’ किंवा ‘चैतन्य’ याचा अर्थ ज्ञानवत्ता.
वस्तू आणि ज्ञान यांच्या संबंधात वस्तू ज्ञानसापेक्ष आहे, ज्ञान वस्तुसापेक्ष नाही हा सिद्धांत अनुभवणे म्हणजेच सच्चिदानंदपदाची सिद्धी होय.
ज्ञान हे स्वत:सिद्ध आहे, वस्तुसापेक्ष नाही याचे प्रमाण परंपरा अशी आहे -
ज्ञानाच अभाव ही देखील ज्ञानाची एक आकृती आहे; आविर्भाव आहे.
वस्तूचा अभाव ही दुसरी वस्तू नसून ज्ञानाचाच तो एक विशेष प्रकार आहे. वस्तूच्या भावाचे व अभावाचेही ज्ञान हे एकच प्रमाण आहे. पण ज्ञानाचा अभाव संभवत नाही. ज्ञानाचा अभाव हा पुन्हा एक ज्ञान-विशेषच असतो.
वस्तूच्या अभावाला, ज्ञानाच्या अभावाला देखील पुन: ज्ञानाचेच अधिष्ठान लागते तरच त्यांची सिद्धी होते.
आधुनिक ज्योतिर्गणिताने कल्पिलेला, पुरस्कारिलेला, स्थलकालांचा अमर्याद विस्तार मानवी व्यक्तीला व शक्तीला क्षुद्रत्व देत आहे असा होतो.
तथापी, स्थलकालांचा अमर्याद विस्तार व संख्याप्राचुर्याचे घनिष्ठ सामर्थ्य लहानग्या ज्ञानकलेत व ज्ञानकलेमुळे सार्थ, साकार व सिद्ध होत असते हे विसरून कसे चालेल?
अनंत सूर्यमाला, अगणित तेजोगोल आणि असंख्य विश्वेदेव, ज्ञानशक्तीच्या इवल्याशा दीपकलिकेत उदयास्त पावणारे अणुकीटकच नव्हेत काय?
ज्ञानशक्ती नसेल तर कोटीविश्वांची विस्तीर्णता अ-प्रतीत, अ-वास्तव व अ-सिद्ध रहाते.
मानवी विश्वातील सर्व द्वंद्वे - सत्य व असत्य, सौंदर्य व अ-सौंदर्य, सुष्टता व दुष्टता - आणि या सर्व द्वंद्वांना आधारभूत, अधिष्ठानभूत, मूलभूत असणारे निर्द्वंद्व अद्वैत, एकंसत् म्हणजे ही ज्ञान-कला होय.
या ज्ञान-कलेच्या रजतपटावर कोट्यवधी चलत्चित्रांचे आविर्भाव व तिरोभाव झाले तरी ज्ञानकला हेच त्या सर्वांचे आदिम, मध्यम व अंतिम सत्स्वरूप होय.
ॐ ॐ ॐ