ज्ञान म्हणजे नुसती माहिती असणे नव्हे. माहिती पुस्तकात, कोशात, नकाशात, इतिहासात दिलेली असतेच.
पुस्तकातून उचलून ती माहिती नुसती डोक्यात भरून ठेवण्यात कालाचा अपव्यय आहे. काही हेतूने माहिती मिळविणे आणि ह्या माहितीचा उपयोग करणे हे ज्ञानक्रियेचे लक्षण आहे.
पण ज्ञानाचा स्वरूपार्थ निराळा आहे. ज्ञानाचे मूळ स्वरूप एक प्रकारचे स्फ़ुरण किंवा स्फ़ूर्ती.
खरे ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, स्फ़ूर्ती होय.
जीवनात स्फ़ूर्ती जेवढी अधिक तेवढे ज्ञान अधिक.
शब्दश्रेष्ठी, वाक्यविधाते व कोशकीटक हे लोक खरे ज्ञानी नव्हेत.
ज्ञानाची आयात-निर्यात करून हे लोक पैसा, प्रतिष्ठा मिळवितात.
ज्ञानाला अडगळ समजून ते आपल्या जीवनात त्याला शिरू देत नाहीत व स्फ़ुरू देत नाहीत; उलट ज्ञानी पुरुष आपले जीवन स्फ़ूर्तीमय करतो.
ज्ञान म्हणजे स्फ़ुरत्ता.
ज्ञानात विद्युल्लतेची चमक आहे व सूर्यबिंबाचे स्थैर्य आहे.
स्फ़ूर्तीरूप ज्ञान कर्म घडविते पण स्वत: कर्मबद्ध होत नाही.
ज्ञानाच्या स्फ़ुरत्-स्वरूपामुळे कर्म घडले तरी ते कर्म, ज्ञानाची स्फ़ुरत्ता शबलित करू शकत नाही. कर्मामुळे, रजोगुणाने ते कर्म काळवंडत नाही. ‘केवल’ज्ञानाचे, विशुद्ध ज्ञानाचे, स्फ़ुरत्तेचे हे स्वरूप ओळखले म्हणजे ‘ज्ञानान् मोक्ष:।’ हा आद्य शंकराचार्यांचा सिद्धांत यथार्थतेने लक्षात येतो.
‘केवलता’, ‘कैवल्य’ हे विशेष फ़क्त ज्ञानालाच यथार्थतेने लावता येतात.
एक ज्ञानाखेरीज बाकी सर्व सापेक्ष आहे. ज्ञान हे एकच ‘केवल’ आहे. Absolute आहे. इतर सर्व जातमात्र हे ज्ञानमात्र, ज्ञानसापेक्ष आहेत, हे सांगण्याचीही जरूर नाही.
केवलतेत आनंद आहे कारण मोक्ष आहे. केवलता स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण आहे. केवलतेला अपेक्षा नाही; म्हणून बद्धता नाही. सापेक्षतेत दु:ख आहे. कारण त्यात बंध आहे, अवलंबन आहे.
‘ज्ञप्ती’ हा तेज:पुंज शब्द, स्फ़ूर्तीरूप ज्ञानाचा वाचक आहे.
‘सरस्वती’ हा शब्ददेखील प्रवाही, अखंड स्फ़ुरत्रूपगतीशील ज्ञानाचे प्रतीक आहे.
स्फ़ूर्तीमय ज्ञान, स्फ़ुरत्रूपज्ञप्ती हेच ‘केवलानंदा’चे स्वरूप होय.
ॐ ॐ ॐ