प्रमाण म्हणजे सत्यज्ञानाचे साधन. ज्ञान खरे आहे की खोटे आहे हे ठरविण्याची कसोटी म्हणजे ‘प्रमाण’, ‘प्रमाया: करणम् प्रमाणम्।’
प्रमा म्हणजे सत्यज्ञान; त्या प्रमेचे करण, साधन म्हणजे प्रमाण.
प्रत्यक्ष हे एक प्रमाण आहे. इंद्रियांना वस्तूची प्रतीती म्हणजे अनुभव आला की, ‘ती वस्तू आहे’; हे ज्ञान प्रमाणाने सिद्ध झाले.
‘प्रत्यक्ष’ प्रमाणाचे अभावी शब्द, अनुमान, उपमान इत्यादी इअतर प्रमाणे उपयोजिली जातात.
पण प्रश्न असा उद्भवतो की, ही सर्व प्रमाणे स्वत:सिद्ध आहेत काय?
प्रमाणांचे प्रामाण्य कसे सिद्ध होते?
वस्तूचे ज्ञान यथार्थ आहे हे ठरवावयाचे प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी प्रमाणांनी - म्हणजे, प्रमाणे निर्माण करतील त्या ज्ञानाने. एका ज्ञानाची सिद्धी दुसर्या ज्ञानाने करावयाची.
राम खरे बोलतो हे लक्ष्मणाने सांगितले पाहिजे आणि राम व लक्ष्मण दोघेही एकाच स्वभावाचे, घटनेचे व जातीचे. लक्ष्मणाच्या खरेपणासाठी केशव, केशवासाठी नारायण अशी परंपरा लागेल व तिला विराम कोठे देणार? त्यापेक्षा राम सांगेल तेच खरे ही भूमिका काय वाईट?
वस्तुज्ञानाच्या सत्यतेला प्रमाणजन्य दुसर्या ज्ञानाची कसोटी, निकष लावण्यापेक्षा वस्तुज्ञानच स्वयंसिद्ध आहे, असे मानले तर?
पण तेथेही अडचण आहेच.
विपरीत ज्ञान हाही एक अनुभव आहे.
सत्य-ज्ञान व विपरीत-ज्ञान यांमध्ये भेद कसा करावयाचा? ‘प्रमाणे’ लावून हा भेद करता येतो असे वाटते. पण प्रमाण व कु-प्रमाण यांमधील भेद तरी कसा करावयाचा? ते ठरविण्यास सत्यज्ञान अगोदर पाहिजे. तेव्हा प्रमाणाचे प्रामाण्य ठरविता येईल. रामाने जे सांगितले तेच लक्ष्मण, केशव, नारायणादी सहस्र व्यक्तींनी सांगितले म्हणून ‘सत्य’ कसे ठरेल?
गुणाकार असत्याचाही होऊ शकतो. सत्याचाच होतो असे थोडेच आहे?
वस्तूंचे ज्ञान, तसे प्रमाणाचे अथवा प्रामाण्याचे ज्ञअनच. दोघांची जाती एकच.
ही प्रमाणे ठरविणे तरी कसे शक्य आहे. वस्तुज्ञान व विपरीत ज्ञान यांमध्ये जसा भेद वाटतो तसाच व तोच भेद प्रमाण व कुप्रमाण यांमध्येही आहेच. सत्याचे प्रमाण बसवावयाचे म्हणाजे सत्य अगोदर कळले पाहिजे. ते कळले असेल तर, प्रमाणाची जरूर नाही व कळले नसेल तर, कळण्याची शक्यता कोठे आहे?
वस्तूची लांबी-रुंदी काढावयास फ़ूटपट्टी लागते. कापड मोजण्यासाठी गज लागतो. तशी वस्तुज्ञानास ‘प्रमाणे’ लागतात असे म्हणता येईल काय?
नाही, तसे म्हणता येणार नाहे. कारण इंच-फ़ुटांचे माप, कापडातही मूलत: नाही व फ़ूटपट्टीतही नाही. आपण व्यवहाराच्या सौकर्यासाठी, सोयीसाठी ते प्रमाण गृहित धरतो इतकेच. ‘इंच’ कोरलेल्या फ़ूटपट्ट्या निसर्गनिर्मित नाहीत व वस्तूंची लांबी-रुंदी जी आपल्या सोयीसाठी आपण कल्पितो ती निसर्गाने लक्षात घेतली असेल असेही वाटत नाही.
लांबी व रुंदी ही सर्वस्वी आपली कल्पना. फ़ूटपट्ट्या आपल्याच कल्पनेने काढलेल्या. वस्तुज्ञानाची प्रत्यक्षादी ‘प्रमाणे’सुद्धा अशीच.
ज्ञान खरे की खोटे? वस्तुज्ञान तरी खरे ठरविण्याचा काही मार्ग आहे काय? ईश्वरज्ञानाची, परमार्थज्ञानाची गोष्ट दूरच ठेवा.
ॐ ॐ ॐ