प्रकाशित साहित्य

शिक्षण

 आजचे शिक्षण हे स्मृति-प्रधान आहे.

 आपली आजची परीक्षा पद्धती निदर्शक आहे.

 शिक्षणक्रमामध्ये कल्पनेला, कल्पकतेला प्राधान्य असले पाहिजे. कल्पना म्हणजे स्वैर कल्पना नव्हे. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण, प्रयोगप्रवण अशी कल्पकता निर्माण करणे हे शिक्षणाचे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट असले पाहिजे.

 ‘कल्पन’, ‘प्रकल्प’ हे शब्द आपण पंचवार्षिक राष्ट्रीय योजनांच्या संदर्भात वापरीत असतो. तेथे ‘कल्प’ या शब्दाचा अर्थ नियोजन असा आहे.

 स्मृती व कल्प्ना यांच्यामध्ये विरोध नाही.

 कल्पकतेच्या, सृजनशीलतेच्या वाढीसाठी स्मृतीची, पाठान्तराची नितान्त आवश्यकता आहे.

 स्मृती हे कल्पकतेचे Feed हे आवश्यक द्रव्य आहे.

 स्मृती-शक्ती व कल्पना-शक्ती या दोनही शक्ती बुद्धीच्या विकासाला आवश्यकच आहेत.

 बहुतेक विद्यार्थी स्मृती-निष्ठ अभ्यास करतात. निरनिराळी माहिती, सिद्धांत, आकृत्या, सन व वाक्ये डोक्यात चिणतात, प्रयत्नपूर्वक ठासून भरतात. पण ते विचार पचवून, मनन करून त्यामधून नवीन कल्पना, नवेन उपाययोजना निर्माण होऊ शकल्या नाहीत तर या सर्व व्यवसायाचा काय उपयोग?

 अभि+आस किंवा अभ्यास या शब्दाचा निरुक्तार्थ ध्यानात घेऊया. उद्दिष्ट विषयाच्या भोवताली, ‘अभि’ म्हणजे सर्व बाजूला, ‘आस’ म्हणजे बुद्धी स्थिर ठेवणे. अभ्यास म्हणजे मनन करणे.

 साधारणत: पुस्तक मिटले की अभ्यास संपला असे आपण समजतो. पुस्तक मिटल्यावर डोक्यातून त्या विषयाला आपण रजा देतो; तो विषय आपण डोक्यातून काढून टाकतो व दुसरीकडे वळतो.

 अभ्यासाची माझी व्याख्या अशी आहे. ‘पुस्तक मिटल्यावर सुरू होतो तो अभ्यास.’

 आपण वाचलेले मुद्दे नुसते पुन्हा आठवणे म्हणजे अभ्यास नव्हे. वाचलेल्या विषयावर एकाग्रतेने विचार करणे म्हणजे मनन व मनन म्हणजे अभ्यास.

 मननाला स्मृतीशक्ती, कल्पनाशक्ती व संदर्भनिष्ठा आवश्यक आहेत.

 शिक्षण हे नेहमी विद्यमान, सामाजिक परिस्थितीच्या गरजा पूर्ण करणारे असले पाहिजे.

 शिक्षणातील काही चिरस्थायी मूल्यांबरोबरच कालाबरोबर बदलणार्‍या जीवनक्रमाचा विचारही शिक्षणात झाला पाहिजे.

 आधुनिक शिक्षणविषयक विचारात या अंगाला श्रेष्ठ शिक्षणतज्ञ्जांनी फ़ार महत्त्व दिले आहे.

 समाज-सन्मुखता हे यशस्वी शिक्षणक्रमाचे प्रमुख अंग व वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी-जीवन व समाज-जीवन मिळते कसे राहील याचा विचार सदैव जागृत राहिला पाहिजे. सामाजिक विचार व आचार यांच्याशी शिक्षण हे समतोल व समन्वित असणे आवश्यक आहे. नाहीतर आपण शून्यात काम करतो असे होईल. समाजजीवनाशी विद्यार्थ्यांना अ-सम्बम्द्ध ठेवणारे शिक्षण ‘अरण्य-आक्रोश’ ठरेल.

 स्वातंत्र्यपूर्व कालात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्था या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांचे एक अंग होते. स्वातंत्र्यप्रेमाची, स्वत्त्वाविषयी अभिमानाची जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या शिक्षणसंस्थांतून केला गेला.

 सामाजिक प्रश्नांचा विचार समतोल दृष्टीने करता येईल अशी दृष्टी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न त्या काळी केला जाई.

 ‘Socialisation of Education’ ही संज्ञा म्हणजे आधुनिक शिक्षणतज्ञ्जांनी स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक उद्दीष्टात केलेल्या बदलाची निदर्शक आहे.

 स्मृतींवर आधारलेले शिक्षण विद्यार्थ्याला समाजाशी समन्वित करू शकणार नाही. शिक्षण कल्पना-प्रधान असेल, परिस्थिती-प्रवण असेल तरच ते विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, अभिमान व स्वयंपूर्णता निर्माण करू शकेल.

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search