जीवनाचे साफ़ल्य
सुख हे जीवनाचे ध्येय नव्हे! सर्वांची धडपड सुखासाठीच आहे, हेही तितके खरे नाही.
‘अनुकूल वेदनीयं सुखम्। प्रतिकूल वेदनीयम दु:खम्।’
अनुकूल वेदनेने सुख होते व प्रतिकूल वेदनेने दु:ख होते, अशी नैय्यायिकांची एक व्याख्या आहे, पण ती सदोष आहे.
एकच गोष्ट एकदम अंत:करणाला म्हणजे चित्त, बुद्धी व अहंकार यांना अनुकूल असतेच असे नाही. किंबहुना, इंद्रियांना अनुकूल वाटणारी गोष्ट बुद्धीला क्वचितच अनुकूल असते; व त्या दोहोंना अनुकूल भासणारी वस्तू अहंकाराला प्रतिकूलही असू शकते.
बुद्धीग्राह्य सुख हे आत्यंतिक सुख आहे, असे गीता सांगते. ‘सुखमात्यन्तिकं यत्, तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम्।’ आत्यंतिक सुखाच्या या व्याख्येत दोन लक्षणे आहेत. पहिले लक्षण आत्यन्तिक सुख बुद्धीग्राह्य पाहिजे आणि दुसरे, त्या सुखाचा प्रत्यक्ष अनुभव अतीन्द्रिय असावा.
आत्यंतिक सुख हे बुद्धीनेच ग्रहण करायचे; पण, त्या सुखाची संपूर्ण प्रतीती किंवा पूर्ण अनुभव इंद्रियांच्या पलीकडे असतो. बुद्धी हे देखील एक इंद्रिय आहे. त्यामुळे आत्यंतिक सुख तिला पूर्णपणे अनुभवता येत नाही. फ़क्त ग्रहण करता येते, पकडता येते.
आत्यंतिक सुखाच्या पतंगाची केवळ दोरी, बुद्धीची अंगुली धरू शकते, पण प्रत्यक्ष सुखाचा पतंग दूर-दूर अवकाशात असतो; तो बुद्धीच्या हातात नसतो.
आत्यंतिक सुख हा एक अतीन्द्रिय अनुभव आहे. ती केवळ एक अनुकूल वेदना नव्हे!
अनुकूल किंवा प्रतिकूल वेदना ही केवळ इंद्रियजन्य असते. प्रतिकूल वेदनासुद्धा अनेक वेळा सुखोत्पत्ती करते. मदिरा, बचनाग, तंबाखू, अफ़ू यांची प्रत्यक्ष वेदना कटू व प्रतिकूल असते, अनुकूल नसते. सवयीने ती वेदना सह्य व सुखकर होत. उलटपक्षी अनुकूल वेदना झाली तरी ती दु:खद असू शकते. उदाहरणार्थ, ब्रह्मचारी व विरागी यांचा स्त्री-सहवास.
नैय्यायिकांच्या व्याख्येत सुख हे केवळ इंद्रियजन्य आहे, असे गृहित धरले आहे.
पण, मन हे सुखदु:खांचा मुख्य आलंब आहे. मन वगळल्यास सुखदु:खांचा अनुभव येणे अशक्यच नव्हे का?
लौगाक्षिभास्कर या सुप्रसिद्ध मीमांसकाने ‘धर्म हे सुखाचे असाधारण कारण’ म्हणून निर्देशिले आहे. अर्थात, येथे धर्म या शब्दाची व्याप्ती अत्यंत विशाल आहे. धर्म म्हणजे एखादा गुण नव्हे; एखादा उपासना-मार्ग नव्हे; किंवा ईश्वरविषयक एखादी विशिष्ट मतप्रणाली नव्हे.
लौगाक्षिभास्करांच्या मते ‘धर्म’ म्हणजे एक शाश्वत, त्रिकालाबाधित व सनातन नियम आहे. अर्थातचाआअ, तो अतीन्द्रिय आहे. पण बुद्धीची, प्रज्ञेची परिणत अवस्था त्याला डॊळवू शकते, पाहू शकते. ही बुद्धीची जी ‘अतिशय’ कोटि, तिला ‘धर्म’ ही संज्ञा काही नैय्यायिक, बौद्ध तत्त्वज्ञ व काही मीमांसक देतात.
धर्म हा ‘अतिशय’ (Transcendental) आहे. येथे धर्म हा मानवी व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या प्रज्ञेचा ‘अवधि-गुण’ म्हणून समजला जातो. या दृष्टीकोनाप्रमाणे अतिशयत्त्व (Transcendence) हे धर्माचे मुख्य लक्षण आहे.
धर्म ही मानवाच्या अध्यात्म-साहित्यातील एक उत्+‘प्रेक्षा’ आहे. वर पहाणे आहे. वर, पलीकडे, उंच उंच नजर फ़िरविणे आहे. या दृष्टीने विचार केल्यास जीवनाचे साफ़ल्य कशात आहे, या प्रश्नाचे उत्तर सुस्पष्टतेने प्रकट होईल.
सुखाच्या शोधात व लाभात जीवनाचे साफ़ल्य नाही. शाश्वत तत्त्वांची, सनातन सत्यांची अतींद्रिय अनुभूती हे सुखाचे असाधारण कारण आहे. हे ज्ञान परिणत प्रज्ञेला ‘डोळविता’ येते; पण ती प्रत्यक्ष अनुभूती प्रज्ञेच्या कक्षेपलेकडील आहे. त्या अनुभूतीत ‘अहं’चा, ‘स्व’चा, स्वत:चा संपूर्ण विसर पडतो. स्वत:चे संपूर्ण व्यक्तिमत्त्व निवेदित होते, समर्पण झालेले असते. म्हणूनच या अनुभूतीला अतीन्द्रिय म्हणणे क्रमप्राप्त ठरते.
एखाद्या कल्पनेसाठी, ध्येयासाठी, स्वत:ला विसरून जेव्हा आपण कार्यमग्न होतो, तेव्हा ते ध्येय ‘आपले’ रहात नाही, आपण त्या ध्येयाचे उपकरण, साधन झालेले असतो. आणि तेव्हाच खर्या सुखाची उपलब्धी होऊ शकते. त्यावेळी आपण सुखाला शोधीत नसतो, सुख आपल्याला शोधीत असतो.
एखाद्या उच्चोदात्त ध्येयासाठी, प्रयत्नशील असताना त्या ध्येयाची सिद्धी आपल्या डोळ्यांसमोर असते. स्वत:चे सुख किंवा दु:ख आपल्या स्मरणातदेखील रहात नाही. किंबहुना, त्या ध्येय-सिद्धीसाठी प्रत्यक्ष सुखापेक्षादेखील, आपल्याला दु:खाचाच वाटा अधिक भेगावा लागतो. तसे पाहिले तर, स्वत:चे सुख शोधणार्या माणसांची कीवच करणे योग्य आहे. एक तर त्यांना ते सुख शोधीत राहिल्याने कधीही मिळणारे नसते; व दुसरे म्हणजे, जीवनाचे अंत:स्वरूप त्यांना समजलेले नसल्यामुळे ते स्वत:च्या विनाशाकडेच धावत जात आहेत.
जीवनाचा सहज-सिद्ध हेतू म्हणजे ‘विशाल-तर’ जीवन हाच होऊ शकेल.
द्रव्य, कीर्ती, महत्त्वाकांक्षा इत्यादी हेतूंसाठी स्वत:च्या जीवनाला विकणे केव्हाही योग्य होणार नाही.
द्रव्यादी कोठल्याही एका किंवा अनेक बाह्य हेतूंसाठी, जीवनाचे विशाल वर्तुळ संकुचित करणे हा भयंकर प्रमाद आहे. एखाद्या हेतूसाठी नव्हे तर अधिक मोठ्या परिघाच्या, व्याप्तीच्या विशाल-तर महा-जीवनासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पण करणे हेच जीवनाचे साफ़ल्य आहे.
‘रोहिणी’ हा शब्द मला त्याच्या धात्वर्थामुळे, निरुक्तीमुळे नेहमीच स्फ़ूर्तिदायक व मार्गदर्शक झाला आहे.
‘रोहिणी’ हा शब्द आरोहणाचा, विकासाचा दर्शक आहे. रोहिणी म्हणजे आरोहिणी गती व वृत्ती. रोहिणी नक्षत्राची प्रत्येक चमक, परमेष्टीच्या महाजीवनाची स्फ़ूर्ती अव्याहतपणे देत आहे.
महाराष्ट्राने, भारताने व अखिल मानव कुलाने ‘रोहिणी’ पदाने ध्वनित होणारा आत्मविश्वासाचा हा संदेश आत्मसात करावा. माझ्या आयुष्याच्या संक्रान्ति-क्षणी या प्रार्थनेचा निर्देश करून मी हा लेख संपवितो.
ॐ ॐ ॐ