प्रकाशित साहित्य

जीवनाचा अर्थ (पूर्वार्ध)

जीवनाचा अर्थ (पूर्वार्ध)

 जीवनाचा अर्थ काय? हा प्रश्नच संभवत नाही.

 जीवनाला, जीवनेतर किंवा जीवनातीत असा दुसरा कोणता अर्थ असू शकेल? अर्थ ही वस्तू जीवनाहून अधिक व्यापक, अधिक महत्त्वाची असेल तरच जीवनाचे महत्त्वमापन ‘अर्थ’ या संज्ञेने अथवा परिणामाने होऊ शकेल.

 संपूर्ण, समग्र जीवनाला अर्थ असा काहीच नसतो. जीवन हाच जीवनाचा अर्थ.

 सर्व अर्थांची सिद्धी जीवनाचे पोटात, आंतर-स्वरूपात आहे.

जीवन, एकाग्र वृतीने, एकमुखी प्रक्रियेने कोठलाही अर्थ व्यक्त करू शकत नाही.

 जीवनाच्या तरंगलहरीवर अनंत अर्थाचे बुद्‌बुद्‌ उद्‌भवतात, चमकतात व अंतर्धान पावतात.

 जीवन कशाचा शोध करीत असते - जीवन, जीवनाच्या अवस्था भेदांचा शोध करीत असते.

 निरनिराळ्या व्यक्ती, वस्तू, तत्त्वे, अर्थ किंबहुना ईश्वर, ज्या अवस्था जीवनाला देऊ पहातात, देऊ शकतात, त्या अवस्थांच्या प्राप्तीसाठी जीवनाची धडपड आहे.

 अनुभवांची, अवस्थाभेदांची नुसती संख्या वाढविल्याने जीवनाची संपन्नता वाढत नाही.

 जीवन संपन्न व्हावयाचे तर जीवनातील अनुभवांची, अवस्थांची गुणवत्ता वाढविली पाहिजे.

 कोणत्या गुणांमुळे अनुभव संपन्नतर होईल?

 अनुभवांमध्ये ज्या प्रमाणात संग्रह व समन्वय उपलब्ध होतील त्या प्रमाणात त्या अनुभवाची संपन्नता वाढेल. विशालता व संबद्धता, विस्तार व संगती या दोन गुणांमुळे जीवन श्रेष्ठतर होत असते.

 जीवनाचा अर्थ जीवनाव्यतिरिक्त दुसरा नाही, जीवनाचा शोधही जीवनासाठीच आहे हे सिद्धांत खरे असले तरी जीवनाची एक अवस्था दुसर्‍या अवस्थेचा अर्थ लावू शकते व शोधही करू शकते. त्या जीवनाच्या अंतर्गत असणार्‍या अवस्थांना अर्थही आहे व ध्येयही आहे.

 प्रत्येक अर्थ-प्रत्यय, ध्येय-साक्षात्कार, स्वत:हून अधिक सुसंबद्ध, अधिक व्यापक, अर्थाच्या व ध्येयाच्या वर्तुळात विलीन होत असतो.

 जीवमात्राचे चैतन्य हेच अवस्थांचे अधिष्ठान केंद्र होय.

 या चैतन्याची अवस्था कितीही व्यापक व समन्वित झाली तरी व्यक्तिगत चैतन्य हाच सर्व अवस्थांचा मूलभूत आधार होय.

 अतएव, वैयक्तिक जीवन हे जीवमात्राचे ध्येय, परमार्थ व पुरुषार्थ होय.

 लोकसत्ताक जीवन हे जीवमात्राचे ध्येय, परमार्थ व पुरुषार्थ होय.

 लोकसत्ताक जीवन, किंबहुना जीवनमुक्ताचे जीवन हे मूलत: वैयक्तिक जीवनच आहे. लोकसत्ताक राष्ट्रीय जीवनाचा खरा अर्थ हा आहे की प्रत्येक व्यक्ती तत्त्वत: सत्तेचे परमश्रेष्ठ केंद्र आहे. मनुष्यमात्र हीच राष्ट्रसत्ता, साम्राज्यसत्ता, विश्वराज्यसत्ता यांचे उगमस्थान व उच्छेद-स्थान आहे.

 मनुष्यमात्राचे वैयक्तिक जीवन जितके विशुद्ध, विशाल व व्यवस्थित राहील, वैयक्तिक जीवनातली प्रत्येक अवस्था जितकी अधिक संग्राहक, अधिक व्यवस्थित राहील तितके; अगदी त्या प्रमाणात राष्ट्रीय, आंतर-राष्ट्रीय, अखिल मानवीय जीवन शांतीमय, स्वातंत्र्यमय, सर्वोदय-सन्मुख होईल.

 लोकसत्ता म्हणजे लोकांची सत्ता, लोकांवरील सत्ता, लोककल्याणासाठी सत्ता. अशी सत्ता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात उदित होते व उत्कर्ष पावते हे मुख्यत: लक्षात राहिले पाहिजे.

 लोकांची सत्ता म्हणजे अनेकांची एकावरील सत्ता नव्हे. बहुमताचा अल्पमतावरील अधिकार नव्हे. कारण हे जुलुमाचेच प्रकार, अवतार आहेत.

 लोकसत्तेचा खरा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे स्वत:पुरते संपूर्ण स्वातंत्र्य.

 लोकशाही म्हणजे समूहशाही नव्हे.

 एका जुलुमाचे ठिकाणी दहा व्यक्ती कंपूशाहीने जुलूम करू लागल्या तर वैयक्तिक स्वातंत्र्य अधिकच संपुष्टात येईल.

 आजच्या जगातील प्रचलित लोकराज्ये हे कंपूशाहीचे नमुने आहेत.

 भारतीय लोकराज्य हे परमोच्च प्रतीचे, आदर्शमय, परम-अर्थ-प्रधान लोकराज्य व्हावयाचे आहे, म्हणजे आपणास घडवावयाचे आहे.

 या लोकराज्यात प्रत्येक व्यक्ती हीच श्रेष्ठतम सत्तेचे केंद्र, संपूर्ण स्वातंत्र्याचा अधिकार बिंदू राहील. आपण भारतीय लोक ‘प्रत्येकशाही’ स्थापन करू, लोकशाहीच खरा अर्थ तोच आहे. परम अर्थ तोच आहे. आपण प्रत्येकजण स्वतंत्र व सहतंत्र राहू. म्हणजे ‘प्रत्येकशाही’ निर्माण होईल.

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search