तुला हा नैवेद्य, विद्वत्तेचा दिला
जिज्ञासेचा मला, नुरे छंद
विचारांची फौज, होती या डोक्यात
तिचा केला घात, एकदाचा
उपपत्ति अन तर्क, यांची जन्मजोडी
मला आता सोडी, एकलाच
बाळा मुखी दुधू, घाली आता आई
करू दे अंगाई, तुझ्या अंकी
ज्ञान हेच प्रेम, असूया अज्ञान
लाभ-आत्मदान, सौख्य-सेवा
शब्द हाच अर्थ, दृष्टी हीच सृष्टी
व्यष्टी ही परमेष्टी, ओळखावी