टाकतां पाऊल थबकते मन।
चालतें मनन थांबे पाय।।
असतां माय दूरी असंतोष नेत्रां।
तिला आलिंगिता मिटे नेत्र।।
सुखाचा अनुभव घेतां नुरे भान।
असतां ते, सौख्य न मिळणे मज।।
जन्म घेतां लागे मृत्यूचेंच ध्यान
शोभवी जीवन जन्ममृत्यू।
तोंवरी तो देव जोंवरी मीं मानव्य।
परि तो दुजा भाव, आता नुरे।।
देवाचे बुटकुले, मला खेळावया ।
सख्या तर्कराया, असू दे हे।।
मलासुध्दा त्याचे, मोल आहे ठावे।
व्यर्थ का फेकावे, तुवा त्यास।।