- माऊली (१९५६)
आज मुहूर्तवू या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदे, जेणे फुलेल हे विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचे।।१।।
(१)
सर्वसामान्य उत्सव हे ‘नैमित्तिक’ असतात. पण आज एका ‘नित्य’ उत्सवाला सुरुवात करू या. सर्व विश्वांत अद्वैताचा सुगंध या ‘नित्य’ उत्सवामुळे दरवळू लागेल. या उत्सवामुळे प्रत्येक क्षणाला एका नवीन पुण्यपर्वणीचे महत्त्व येईल. प्रस्तुत स्तोत्र हे या आंतरविश्वातील नित्योत्सवाचे ध्वजारोपण किंवा प्रसादचिन्ह आहे. ‘श्री विद्या’ म्हणजे ‘आद्याक्षर विद्या’, ‘बीजाक्षर विद्या’, ‘मूलाक्षर विद्या’. रामायण संस्कृतीचे जनक श्री वाल्मिकी, आद्यशंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर इत्यादी लोकोत्तर विभूती बीजाक्षर विद्येच्या, श्री विद्येच्या उपासक होत्या, हे सर्वश्रुत आहे.
प्रस्तुत स्तोत्रांत बीजाक्षर शक्तीचा विनियोग आहे व म्हणून सर्व प्रकारच्या अभ्युदयाला कारक असे हे स्तोत्र आहे. प्रत्येक गुरूवारी एक, सात, नऊ, अकरा किंवा एकवीस वेळा याचे पठण व्हावे, एकवीस वेळा केलेले पठण हे पुर्णानुष्ठान होय व त्यानेच इष्टसिद्धी नि:संशय होइल. अंशानुष्ठानाने भागमात्र सिद्धी होईल.
------------------------------
परापरात्परा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।
(२)
व्यक्तीमात्राचे ठायी असलेले परमात्मबीज म्हणजे ‘श्रीगुरू’. या गुरुपूजेचे तीन प्रकार आहेत. परा-परापरा-अपरा अनुक्रमे उत्तम, मध्यम, प्रथम असे ते प्रकार आहेत.
‘विमर्श’ म्हणजे प्रजाशक्ती, प्रबोधशक्ती, प्रस्तुत स्तोत्र प्रबोधशक्तीला जागृत करून आत्मगुरूचे दर्शन घडविण्यास समर्थ आहे.
या स्तोत्रपाठाने आत्मज्ञानाला आवश्यक अशा प्रज्ञाशक्तीचा उन्मेष व प्रस्फोट होईल.
------------------------------
(३)
आत्मगुरूच्या पादुकेचे वर्णन तिसया ओवींत आहे. गुरूपुजेच्या प्रथम प्रकारात पदार्थ व प्रतीती, भगवान व भक्त, गुरू व शिष्य यांमध्ये द्वैताची भावना असते. ‘परात्परा’ अथवा मध्यम श्रेणीत द्वैतभावाचे, दुजेपणाचे भान अस्तंगत झालेले असते, पण विधायक स्वरूपाच्या स्वयंपूर्ण एकंवृत्तीचा उदय झालेला नसतो. ‘परा’ परमोच्च् अवस्थेत अभेदवृत्तीचे, पूर्णावृत्तीचे, धाराप्रवाही सतत स्फुरण सुरू असते, प्र-सिद्ध असते. आत्मगुरूपादुकेत दोन पाऊले व त्या दोन पावलांना अधिष्ठानभूत असे त्यांचे एकत्व अशी तीन अंगे आहेत. भेदग्रह, भेदअग्रह व अभेद-स्फूर्ती ही त्रिपुटी म्हणजेच जागृत, स्वप्न व समाधी अथवा संबुद्ध सुषुप्ती या तीन अवस्था होत. संबुद्ध सुषुप्तीत आत्मप्रकाश सूर्यबिंबाप्रमाणे अखंडतेने स्फुरत असतो. सामान्य सुषुप्तीत आत्मतत्व अज्ञानाच्या आवरण शक्तीने व्याप्त असते.
क्तीमात्राच्या जागृत, स्वप्न व संबुद्धसुषुप्ती या तीन अवस्थांचा सम्यक् सिद्ध एकंकार म्हणजे गुरूपादुका होय. प्रस्तुत स्तोत्राच्या पठनाने या पादुकांचा ‘उदय’ सुलभ होईल. कारण, हे स्तोत्र निरवस्थ समाधीभावाचे, संबुद्ध सुषुप्तीचे एक साकार व साक्षर प्रतीक आहे. या स्तोत्रात अक्षर अशा आत्मशक्तीचा प्रकट विनियोग आहे.
गुरू्पूजा हे आत्मदर्शनाचे शास्त्र आहे. अवस्थात्रय व त्यांचा सूत्रात्म्याच्या अखंड अनुभूतींत निरास, हे गुरूपूजेचे आंतर रहस्य होय.
------------------------------
आदिभान हे परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचे आलोचन ।।४।।
(४
‘ॐ नमोजी आद्याचे’, ‘स्वसंवेद्याचे’, आदिनाथांचे म्हणजेच आत्मतत्वाचे भान हे श्रेष्ठतम गुरूबीज होय.
विमर्शशक्ती म्हणजे प्रबोधशक्ती अथवा श्री शिवा. हीच शक्ती गुरूबीज ज्ञानाची, आत्मज्ञानाची गुप्त शेज, आवृत्त अधिष्ठान होय. जीवमात्राच्या अवस्थात्रयामध्ये सूत्ररूपाने अनुस्यूत असलेल्या आत्मतत्वाचा परिचय हा ज्ञानबीजात्मक पहिला परिव्राज, एक प्रकारचा विविदिशा संन्यासच होय. सर्व मानवी गुरूमूर्ती आत्मतत्वाच्या केवळ परिचायक होत, केवळ बाह्यप्रतीके होत. आत्मदेव हाच खरा गुरूदेव.
------------------------------
एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलतेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।
चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदूस्थली अमृतसिद्धीचे अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचे अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।।
(५-६)
पाचव्या व सहाव्या ओवींत आगमनिष्ट राजयोगाची प्रक्रिया सांगितली आहे. व्यक्तीमात्राच्या शीर्षमध्यात एक उफराटे कमल आहे. त्या कमलांत जिला कला नाहीत, भाग नाहीत, भेद नाहीत, अशी संप्रज्ञाशक्ती विमर्शशक्ती वास करते. याच शक्तींचा स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण या चतुर्देहांत, व्यापिनी नामक नाडीच्या द्वारे संचार होतो. ही विमर्शशक्ती जागृत, प्रफुल्ल झाली म्हणजे दहराकाशांत अमृतमेघ तरंगू लागतात व त्यानंतर दहराकाशाला श्यामव्योम ही संज्ञा लाधते. श्याम हा सर्वश्रेष्ठ वर्ण आहे. श्रीरामचंद्र व श्रीकृष्ण यांचा वर्ण श्याम होता. संबुद्ध सुषुप्तींचा ही तोच रंग आहे. आत्मतत्वाच्या प्रबोधानंतर व्यापिनींचे तेज:सलिल प्रस्त्रवू लागते व अमृतमेघांचा वर्षाव होतो. व्यापिनी विमर्शस्पृष्ट होऊन गतिमान झाली की इंद्रियांचे ठिकाणी चतुष्कोण निर्माण होतात व या चतुष्कोणांत अनेक देवदेवतांचे उद्भावन होते, मूलाधाराचे ठिकाणी श्रीगणेश, नाभीचे ठिकाणी श्रीसस्वती, हृदयाचे ठिकाणी श्रीविष्णू आज्ञाचक्रांचे ठिकाणी श्रीशंकर, ब्रम्हपद्माचे ठिकाणी श्रीकृष्ण इत्यादि विनियोग प्रसिद्धच आहेत. अमृतसिद्धीचा अनुभव मात्र ब्रम्हपद्माच्या मध्यबिंदूस्थलीच येतो. या बिंदूलाच ‘कूट’ अशी संज्ञा आहे.
आत्मगुरूविद्येच्या उपासनेत इतर सर्व देवदेवतांचे पूजन यथाक्रम अनुभवास येते. इतर सर्व उपासना या श्रीगुरूविद्येचे प्रास्ताविक पाठ होत. त्या उपासना काहीश्या कृत्रिम असल्याने अ-सहज आहेत. आत्मगुरूविद्या ही स्वभावसहज विद्या म्हणजेच सहजाचार होय.
------------------------------
‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामे जीवू जीवूचे निरवस्थान।।७।।
(७)
सातव्या ओवींत विमर्श किंवा प्रबोधशक्ती ही बीजत: साक्षात् चित्शक्तीच होय असे सांगितले आहे. पादुकोदय म्हणजे पुरूष व प्रकृती, आत्मा व ज्ञप्ती यांचे समाधि संजीवन अथवा साम्यरस स्थिती होय.
समाधि-संजीवन म्हणजे साम्यावस्थेत स्थिरलेल्या दोन्ही पदांचे सम्जीवन, संयुक्त-जीवन होय. गुरूकृपेने ही भाग्यश्री मिळते आणि गुरूकृपा म्हणजे जीवमात्राच्या समर्याद स्थितीचा निरास.
अवस्थातीत आत्मतत्वाचा साक्षात्कार.
------------------------------
‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचे उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।
(८)
आगम तंत्रांत पूजाविधानाचे चार विशेष सांगितले आहेत. ‘चार’ म्हणजे उपचारप्रधान पूजा, ‘राव’ म्हणजे विमर्शयुक्त आराधक वृत्तीचे नियोजन,
‘चरू’ म्हणजे काही ‘एवंगुणविशिष्ट’ द्रव्यांचे संपादन, ‘मुद्रा’ म्हणजे अभिप्रेत प्रतीकाचा, इष्ट देवतेचा साक्षात्कार कल्पून त्याला पूजा बांधणे, इष्ट देवतेची अष्टांगे, कल्पनेने सिद्ध करून त्यांना पूजा द्रव्यांचे अलंकार चढविणे, आत्मगुरूच्या पूजाविधानांत हे चतुर्विशेष सहजसिद्धच असतात.
------------------------------
चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हे ।।९।।
(९)
हे गुरूपादुकोदय स्तोत्र म्हणजे सहस्त्रार श्याम कमलाची एक उत्सवमूर्तीच आहे. हे आत्मतत्वांचे एक प्रत्यक्ष प्रतीक आहे. आत्ममाऊलीचा हा पान्हा आहे. दहराकाशांत फेसाळेलेली ही आकाशगंगा आहे.
------------------------------
श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्यांचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणु संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम् ।।१०।।
(१०)
वरील नऊ ओव्या हे नऊ शिंपले आहेत. आदिनाथासह नवनाथांच्या कृपेचे मोती प्रत्येक ओवींत आहे. या नऊ ओव्या म्हणजे वेदांवरील व वेदांतरूप दशोपनिषदांवरील एक प्रगूढ महाभाष्यच आहे.
हे स्तोत्र निरस्थव आत्मतत्वाचे एक ध्यान आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ या ‘ज्ञान'’वाणीचा प्रत्यक्ष अनुभव हे स्तोत्र, दर गुरूवारी एकवीस वेळा असे एकवीस गुरूवार वाचल्याने नि:संदेह होईल.
दीर्घायुरारोग्य, संतति, संपत्ती इत्यादी ‘धर्माविरूद्ध’ काम या उपासनेने सफल होतील. जीवमात्राने गीर्वाण मराठीत अवतरलेल्या या स्तोत्राचे एकवीस सप्ताहाचे एक तरी अनुष्ठान करावे.
ही उपासना निरपेक्षतेने आमरण करीत राहिल्याने देहपातानंतर सहज मोक्ष लाधेल.
।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------