२)
योग-वसिष्ठात `आकाश' या शब्दाचा अनन्त-तेचे प्रतीक म्हणून उपयोग करण्यात आला आहे.
`चिदाकाश' (चित्-आकाश) असा समास तेथे करण्यात आला आहे. चित्ताकाश व भूताकाश हे दोन शब्द या संदर्भामध्ये वापरण्यात आले आहेत. चिदाकाश हे चित्ताकाश व भूताकाश याहून निराळे आहे. भूताकाश म्हणजे पंचमहाभूतांतील एक. चित्ताकाश म्हणजे चित्ताला प्रतीत होणारे आकाश होय. चिदाकाश हे केवळ चैतन्याला अनुभूत होणारे आकाश होय.
सबाह्याभ्यन्तरस्थो य: सत्तासत्तावबोधक: ।
व्यापी समस्त-भूतानां चिदाकाश: स उच्यते ।।
सर्व पदार्थाच्या अन्तर्बाह्य राहून, त्यांची उत्पत्ती आणि विनाश यांना जाणणारे आणि सर्व भूतांना व्यापून राहणारे असे जे साक्षि-तत्त्व त्यालाच `चिदाकाश' म्हणतात.
या चिदाकाशाचे `स्वरूप' खालील श्लोकात सांगितले आहे.
देशात् देशान्तरप्राप्ती संविदो मध्यमेव यत् ।
निमेषेण चिदाकाशं तत् विद्धि वर-वर्णिनी ।।
अन्त:करण-वृत्ती ही एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जाताना जे मध्यन्तर, केवळ एक निमिषमात्र अनुभविले जाते, ते चिदाकाश होय. योगवासिष्ठातील चिदाकाशाचे हे वर्णन, अनन्ततेचे उत्तम प्रतीक आहे.
बृहदारण्यक उपनिषदामध्ये अनेक वेळा `अनन्त' शब्दाचा उल्लेख आला आहे. विशेष म्हणजे अनन्तता हा प्रत्यक्ष शब्दही एके ठिकाणी आढळला.
`का अनन्त-ता याज्ञवल्क्य ।' ४.१.५
याला `दिश् एव सम्राट ।'
असे याज्ञवल्क्यांचे उत्तर आहे.
कोणत्याही एका दिशेला मनुष्य जाईल. दिशेच्या अन्ताला तो कधीच जाऊ शकणार नाही. दिश् याचा अर्थ Space असा घेतला की, अनन्ततेचे सूचक म्हणून त्याचा प्रत्यय येतो.
अनन्त-तेची सर्वच प्रतीके सदोष आहेत, असणारच. पण त्यांनी, दिग्दर्शन होते एवढे मात्र खरे. बाहेरच्या space प्रमाणे Inner space मानणेही तर्कशुद्ध व अनुभवगम्य आहे!
बृहदारण्यक उपनिषदात खालील ठिकाणी अनन्ततेचा उल्लेख आहे.
अनन्तम् वै नाम । ३.२.१२
अनन्तम् वै मन: ।
अनन्ता विश्वेदेवा : । ३-१-७
नाम, मन व विश्वेदेव हे सर्व अनन्त आहेत कारण त्यांचा अन्त म्हणजे शेवट कोठेही, कल्पनेलादेखील, उपलब्ध होत नाही.
छान्दोग्य उपनिषदात आकाश हे अनन्त-तेचे प्रतीक सांगितले आहे. `स एष:अनन्त: । (१-९-२). आकाश हे अनन्त-तेचे सहज प्रतीक आहे. त्याचा अन्त कोठेही दिसत नाही.
........